Top Post Ad

(वि) स्मरणातले ठाणेकर - स्मृती चित्रे एका गावाची

(वि) स्मरणातले ठाणेकर - स्मृती चित्रे एका गावाची


      इसवी सनाच्या सातव्या शतकापासूनचा लिखीत इतिहास लाभलेल्या गावात जन्माला येणं हा जसा भाग्ययोग त्याचप्रमाणे या गावाचे शहर आणि शहराचे महानगर होताना झालेले परिवर्तन टिपण्याचा प्रयत्न करताना ते परिवर्तन घडण्यास कारणीभूत झालेल्या आणि आता काळाच्या पडद्याआड झाकल्या गेलेल्या व्यक्तिमत्वांचा शोध घेण्याची संधी मिळावी हा त्या भाग्ययोगातील पर्वणीचा काळ . आपल्या गावाबद्दलच्या कथा - दंतकथा, वदंता, आख्याइका ऐकून ठाण्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या माझ्यासारख्या अस्सल ठाणेकराच्या मनातील स्वग्रामाविषयीच्या अभिमानाचे रुपांतर गर्वात होणं स्वाभाविकच होतं.मात्र ठाण्याच्या इतिहासाचा शास्त्रशुध्द धांडोळा घेणाऱ्या तज्ञांकडूनही काही जागा राहून गेल्याचे जाणवत होते.मुळात इतिहास हा जसा वास्तू,वस्तू आणि ठिकाणांमध्ये सामावलेला असतो तितकाच तो माणसांमध्येही सामावलेला असतो.मात्र माणसे इतिहासजमा झाली की त्यांची स्मृती फिकट होऊ लागते आणि हळू हळू पुसली जाते.पण म्हणून त्यांनी त्यांच्या काळात केलेलं कार्य, घेतलेले परिश्रम, उभारलेल्या संस्था आणि निर्माण केलेले आदर्श विसरून चालत नाहीत.माझ्या जन्माच्या आधीचं म्हणजे १९७० पूर्वीचं ते ही शंभर वर्षे पूर्वीचं ठाणे ज्यांनी घडवलं,वाढवलं ते ठाणेकर कोण होते ? त्यांनी नेमकं काय केलं?  त्यांच्या कार्याचा,विचारांचा ठसा आजच्या ठाण्यात शिल्लक राहिलेला आहे का ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची कल्पना मनात रुजली ती नाट्य संमेलनाच्य़ा निमित्ताने ठाणे शहरातील नाट्य चळवळीच्या इतिहासाचे संकलन करताना आणि त्यातूनच सुरू झाली शोधयात्रा


( वि) स्मरणातल्या ठाणेकरांची. विस्मरणाच्या काळोखात दडलेल्या या ठाणेकरांचा परिचय करुन द्यायची कल्पना महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस पुरवणीचे समीर कर्वे आणि  श्रीकांत सावंत यांनाही पसंत पडली आणि जानेवारी २०२० पासून दर रविवारी हे ठाणेकर पुन्हा प्रकट होऊ लागले.मध्यंतरी कोरोना साथीमुळे काही काळ खंड पडला पण गेल्या महिन्यापासून (वि)स्मरणातले ठाणेकर दर रविवारी महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस पुरवणीत दर्शन देत आहेत.
       ……..पेशवाईच्या अस्तानंतर ब्रिटिशांच्या ताब्यात आलेल्या ठाण्याचा पहिला मॅजिस्ट्रेट होता स्टिफन बॅबिंग्टन सन १८१८ मध्ये ठाण्यात न्यायाचे राज्य प्रस्थापित करणाऱ्या या उमद्या,सहृदय कर्तव्यदक्ष न्यायाधिशाने ठाण्यातील  एका घराला लागलेली आग विझवताना जीव गमावला........
        ……….विद्यार्थी दशेत उनाडक्या करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या भाव्यांच्या विनायकाने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी सन १८९३ मध्ये भारतातले पहिले मराठी ग्रंथांचे सार्वजनिक वाचनालय ठाण्यात  सुरू केले जे आज सव्वाशे वर्षांचा प्रवास करुन ठाण्याची शान बनले आहे ... 


  …….महाराष्ट्रातले पहिले मराठी व्यंगचित्र साप्ताहिक ‘हिंदुपंच’ ठाण्यात सन १८७२ मध्ये गोपाळ गोविंद दाबक यांनी सुरू केले आणि कृष्णाजी काशिनाथ उर्फ तात्या फडके यांनी ते मोठ्या झोकांत चालवले....
      ….. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे मराठीतले पहिले नाटक  सन १८९० मध्ये लिहीले ते ठाण्याचे आद्य नाटककार आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी, पुढे बावीस वर्षे या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रातील गावोगावच्या नाटक मंडळींनी केल्या नंतर लोकांना चिथावणारे नाटक म्हणून इंग्रज सरकारने त्यावर बंदी आणली .....
      ..... सन १८६६ मध्ये स्थापन झालेल्या ठाणे नगरपालीकेचे लोकांनी निवडून दिलेले पहिले नगराध्यक्ष होते सर गोविंद बळवंत प्रधान जे पुढे १९२८ साली मुंबई प्रांतांचे अर्थमंत्री झाले आणि लीग ऑफ नेशन्सवर भारताचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त झाले.....


      .....  अभियांत्रिकी किंवा वास्तुकलेचे औपचारिक शिक्षण न घेता ही मुंबईतील ‘जनरल पोस्ट ऑफिस’,‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’,‘कावसजी जहांगिर हॉल’, ‘ रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ अशा भव्य वास्तू उभारणारे विठ्ठल सायन्ना ठाण्याचेच.....
      ..... सन १९०८ मध्ये ठाण्यात पहिले स्वदेशी स्टोअर्स काढणारे हरिभाऊ घाणेकर सच्चे समर्थ भक्त होते म्हणून तर १९१६ मध्ये त्यांनी समविचारी सहकाऱ्यांसोबत श्री समर्थ सेवक मंडळ या संस्थेची स्थापना केली.आज या संस्थेचे शिव समर्थ विद्यालय, हनुमान व्यायाम शाळा,नि.गो.पंडीतराव वक्तृत्व स्पर्धा, स्त्री कल्याण मंडळ असे उपक्रम अव्याहत सुरू आहेत.....
     ..... सुरत येथे जन्मलेले डॉ. थॉमस वेल्स ठाण्यातील युनायटेड फ्री चर्च ऑफ स्कॉटलंडच्या मेडिकल मिशनचे प्रमुख म्हणून आले काय आणि ठाण्याच्या नगर पालिकेत सतत १४ वर्षे नगरसेवक( तेंव्हा नगर पिते) म्हणून निवडून येण्याइतके ठाण्याचेच झाले काय.ठाण्यात क्रिकेटचे वेड रुजवणाऱ्या ठाणे फ्रेंडस युनियन क्रिकेट क्लबचे ते अध्यक्ष होते....

  ...... ठाण्यात जन्माला येऊन ठाण्याबाहेर कर्तृत्व गाजवणारे ठाणेकर म्हणजे रावसाहेब बाळकृष्ण गुप्ते एथ्नॉलॉजी( लोकजीवन शास्त्रा)चे अभ्यासक असलेल्या रावसाहेब गुप्तेंचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व पाहून खुद्द इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया प्रभावित झाली होती आणि त्यांचा लोकजीवन शास्त्राचा अभ्यास पाहून प्रिन्स ऑफ वेल्स प्रभावित झाला होता. झूऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनची फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होते.लंडनच्या रॉयल ॲग्रीकल्चरल सोसायटीने त्यांना मानद सदस्यत्व दिले होते.तर इंदौरच्या होळकर महाराजांनी त्यांना ‘रेव्हेन्यू सेक्रेटरी’ आणि ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस’ या पदांवर नेमले होते....        आज विस्मरणात गेलेल्या ठाणेकरांची यादी अशी बहुरंगी आणि मोठी आहे. आत्ता पर्यंत फक्त २० व्यक्तींचा परिचय करून झालाय. ही तर फक्त सुरुवात आहे ... 


महाराष्ट्र टाइम्सच्या ठाणे प्लस पुरवणीत हा ठाण्याचा इतिहास उलगडला जात आहे.वर उल्लेख केलेले ठाणेकर म्हणजे त्या त्या कालखंडाचे प्रतिनिधीच म्हणावे लागतील. या सगळ्यांनी आपली संसारिक कर्तव्ये पार पाडून आपल्या शिक्षणाचा,अनुभवाचा, आवडीचा,कौशल्याचा उपयोग ठाण्याचे सामाजीक- सांस्कृतीक- शैक्षणिक- राजकीय जीवन समृध्द करायला केला. त्यांनी रचलेल्या पायावर आजचे ठाणे उभे आहे याचे विस्मरण होऊ नये म्हणून ही लेख मालिका.      
दर रविवारी महाराष्ट्र टाइम्स मध्ये अवश्य वाचा
( वि) स्मरणातले ठाणेकर आणि अनुभवा ठाण्याची स्मृतीचित्रे .
-------- मकरंद जोशी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com