Top Post Ad

आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य सेनानी

आंबेडकरी चळवळीतील अग्रगण्य सेनानी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील अग्रगण्य सेनानी, थोर समाजसेवक, राजकीय, धार्मिक आणि कामगार नेते,  हरिभाऊ सैलाजी रूपवते यांचा आज  ( ५ सप्टेंबर ) स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.....

डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी दलितांच्या उद्धाराची चळवळ सुरू केली. महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी साहजिकच मंबई आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात तो वनवाही सतत पेटत राहिला. हिमालयाशी स्पर्धा करणारे नेतृत्त्व दलितांना कधीही मिळाले नव्हते. ते बाबासाहेबांच्या रूपाने मिळाले. या नेतृत्वाने पहिल्यांदा दलितांना अस्मिता दिली आणि त्या अस्मितेचा वणवा इतर जिल्ह्यापेक्षा नाशिक जिल्ह्यात फार लवकर पोहचला कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साथ देण्याकरिता कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या सारखे रन मिळाले. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र बाबासाहेबांनी दिला, आणि दादासाहेबांनी वादळी वाऱ्यासारखा हा मंत्र संपूर्ण जिल्ह्यात फिरविला. तालुक्यातील प्रत्येक दलित खडबडून जागा झाला आणि नवीन नेतृत्वाकडे तो आकर्षित झाला. तो झंझावात नाशिक जिल्हातील सिन्नर तालुक्यात असलेल्या हुबेरे या गावी देखील पोहचला. त्या गावात सैलाजी महादू रूपवते यांचा एक दहा बारा वर्षाचा चुणचुणीत  मुलगा हरिभाऊ हा देखील त्या झंझावातात ओढला गेला. झंझावातच तो मिळेल त्याला ओढणे हा त्याचा गुणधर्म.


दलित म्हटला की अठराविश्वे दारिद्रय आलेच, काबाडकष्ट करून पोटाची खळगी भरण्यापुरते फक्त मिळायचे अशा विपन्नावस्थेत देखील सैलाजी बाबांनी हरिभाऊला शाळेत घातले. वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत हरिभाऊंनी हुबेरे येथे राहून शिक्षण घेतले. त्याचवेळी डॉ. बाबासाहेबांनी एक आदेश दिला. खेडी सोडा आणि शहरात या! दलितांच्या मूर्तिमंत गुलामगिरीचा अड्डा हे खेडेगाव असते. संपूर्ण जीवन हे परावलंबी असते त्यापेक्षा शहरामध्ये नोकरी धंदा करून स्वावलंबी जीवन तरी जगता येते. हा बाबासाहेबांचा -आदेश बाबासाहेब गायकवाड यांनी कार्यान्वित केला. ऊन, वारा, पाऊस, डोंगर, दया,खोरी, दिवस रात्र कशाकशाची पर्वा न करता ते बाबांचा विचार खेड्यापाड्यात पोहचविण्याचे काम करीत. खेडी सोडून शहरात चला हे सांगण्याचे काम देखील याच जिद्दीने त्यांनी केले. हा संदेश डुबेरे येथेही आला आणि सैलाजी बाबा मुलाबाळांना घेऊन मुंबईला निघाले. 
हरिभाऊ आता १८ वर्षाचे झाले होते. कुटुंबाला माझ्या कडून काही आर्थिक मदत झाली पाहिजे असे हरिभाऊंना वाटणे स्वाभाविक होते.


आई वडिलांना न सांगता ते मिलिटरीमध्ये भरती झाले. तेथील नोकरी पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा मुंबईला आले आणि भारत बिजली किंग्जसर्कल इथे नोकरीला राहिले. उदरनिर्वाहाकरिता नोकरी करणे क्रमप्राप्तच होते, परंतु ज्या समाजात माझा जन्म झाला आहे त्यांची सेवाही करायला पाहिजे असे त्यांनी ठरविले आणि रिपब्लिकन पक्षाचे क्रियाशील सभासद झाले. भारत बिजलीमध्ये आर.जे. मेहता यांची युनियन होती तिथे ते कामगाराचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत झाले. कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी सातत्याने लढे दिले एवढेच नव्हे तर कामगाराच्या फायद्यासाठी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती देखील स्विकारली आजही भारत बिजलीचे कामगार त्यांना धन्यवाद देत आहेत. भारत बिजलीची नोकरी सोडल्यावर गोरेगांव पूर्वेला टेम्पो युनियन स्थापन करून त्यांना न्याय मिळवून दिला. विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुट्टी मान्य करून घेतली ती आजतागायत सुरू आहे.


१९५८ साली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्षाने झोपडट्टीतील रहिवाश्यांकरिता काम करावे असे सुचविले कारण झोपडपट्टीत राहणारा हा दलित आणि मागासवर्गीय समाज आहे, त्या करिता मुंबई शहरामध्ये ग्रेटर बॉम्बे रिपब्लिकन झोपडी संघ स्थापन करून त्यावेळचे नगरसेवक बी. बी. आशय्या हे अध्यक्ष व आनंदराव माने हे जनरल सेक्रेटरी झाले. हरिभाऊ आता रावळीकैंप कोळीवाडा येथे राहावयास आले इथेही बहुसंख्य समाज हा दलितांचा होता. झोपडी संघाचे लोक इथेही पोहचले आणि शाखाही- स्थापन झाली अशा प्रसंगी हरिभाऊ स्वस्थ बसणे शक्य नव्हते, वामनराव रंगारी, सुदाम थोरात, रमेश शिंदे, शंकर अडांगळे, पी. बी. जाधव, गणपत केदारे, एन. सी. जाधव, एस. जी. अडांगळे इत्यादी कार्यकर्ते एकत्र आले आणि हरिभाऊंनी या कार्याला वाहून घेतले.


हरिभाऊ सैलाजी रुपवते एक उतुंग व्यक्तिमत्व, उन्चधिप्पाड, पहाडी आवाज लाभलेले भाषण करण्यास उभे राहिले तर माईकची गरज पडत नव्हती. दलित पँथरचे त्यावेळचे व सध्या केंद्रात मंत्री असलेले रामदास आठवले या सारख्या कार्यकर्ते यांना अनेकदा मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. धम्म कार्य करतानाही अनेक बौद्धचार्य घडवले.  कामगार नेते, धम्मप्रसारक, राजकीय नेते असे समाजभिमुख नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.  कितीहि मोठा जनसमुदाय असला तरी हरिभाऊनी आवाज दिला "शांत व्हा "या आदेशाचे तंतोतंत पालन व्हायचे. सार्वजनिक, धार्मिक कार्य करताना त्यांचा आदर्श कायम लक्षात राहणारा म्हणजे समाजच्या कोणत्याही पैशाला हात न लावता स्व खर्चाने कार्यकर्त्यांना सांभाळणे. अशी आठवण आजही आबालवृद काढतात.  



मुंबई शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी झोपडया आहेत त्या नष्ट कराव्यात आणि त्याबद्ली त्यांना शासनाने पक्की घरे द्यावीत. आयुष्यभर झोपडपट्टीमध्ये राहण्याचा दलितांनी ठेका घेतला नाही, ते देखील चांगल्या घरात राहू शकतात हा त्या मागील रिपब्लिकन पक्षाचा उद्देश होता. झोपडपट्टीत मराय, कुणबी, गाबीत, भंडारी आदि सर्व जातीचे लोक होते. तत्कालिन युतीशासनाने ४० लाख झोपडीवाल्यांना मोफत घरे देण्याची योजना आज राबवित आहे पण हीच योजना रिपब्लिकन पक्षाने दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली १९५८ साली सुरू केली होती आणि रिपब्लिकन झोपडी संघाचे वतीने रावळी कॅपहून मोतीलाल नगर येथे १०१६ लोकांना पक्की घरे एकही पैसा न देता केवळ १३ रु. ५० पै. अशा भाडेपट्टीवर देण्यात आली शिवाय टागोर नगर, पंत नगर, रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी देखील पक्की घरे मिळाली रावळी कॅप मधील गोरगरिबांना गोरेगांवला आणण्यामध्ये हरिभाऊ कार्यकर्त्यांसमवेत दिवस आणि रात्रभर जीवाचे रान करीत होते, कुणावरही अन्याय होवू नये, चुकुनहीं कुणी राहू नये या बाबतीत हरिभाऊ दक्ष असत. रावळी कॅपमध्ये बरेच तामिळी लोक होते हरिभाऊंना तामिळी भाषा पण येत होती. तामिळीमध्ये ते चांगल्या पद्धतीने बोलायचे. मिलिटरीमध्ये असतांना बरीच वर्षे ते मद्रासमध्ये होते त्यावेळी ते ही भाषा शिकले.


१९६१ मध्ये मोतीलालनगर इथे आल्यावर हरिभाऊंनी सर्व कार्यकर्त्यांना एकत्र केले आणि १) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वार्डशाखा २) भारतीय बौद्ध महासभा, शाखा ३) प्रजासत्ताक भाडेकरू संघ आणि ४) समता सैनिक दल अशा चार कमिट्या स्थापना केल्या. हरिभाऊंना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तर मनोहर मोकल यांना सरचिटणीस केले, एस. के. देशमुख यांना भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष तर रमेश शिंदे यांना सरचिटणीस केले, प्रजासत्ताक भाडेकरू संघाचे अध्यक्ष पी. बी. जाधव तर सरचिटणीस एन. यू. पगारे यांना केले, समता सैनिक दलाचे काम बाबूराव बनसोडे, श्रीधर अढांगळे व बंडू घोरपडे यांच्यावर सोपविले. कार्यकर्त्यांचा संचही हरिभाऊंनी चांगला जमविला. कार्यकर्त्यांमध्ये एन. सी. जाधव, रावसाहेब बोढारे, मनोहर जाधव, दौलत बोढारे, पोपट राव तेल्हूरे, बी. आर. साळवे, के. आर. साळवे, बी. के. वाघमारे, शांताराम पगारे, पोपट साळवे, मधु गायकवाड, लाडुजी कर्डक, टी. जी. आहिरे, दिनकर जाधव, एम. एस., निरभवणे, बी. डी. गायकवाड, शंकर साळवे, प्रल्हाद साळवे, एस. आर. गवळीशेट , एस. एस. रामराजे, दामुजी पवार, पी.एस.वानखेडे,  रामदास जगताप, के. व्ही. सोनावणे, सार, जी. रोकडे, अॅड. के. आर. गांगुर्डे, वामन आहिरे, गंगाधर गवारे, के.बी. वाघ, पी. बी. ठेगे, आर. एस. लोखंडे, दामोदर निरभवणे, एन.जी. भोसलेदगुजी अढागळे, सी. एन. सुखाडे, एस. के. भालेराव, सर्जेराव चंदनशिवे, आर. एस. गवांदे आदिंचा समावेश होता. 


नाशिक जिल्हातील कार्यकत्यांना एकत्र आणण्यासाठी नाशिक जिल्हा सेवा संघाची स्थापना केली. त्याचप्रमाणे अंधेरी येथील दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंदाची जागा शासनाकडून मिळविण्याकरिता मधुकर तुपलोंदे यांच्याबरोबर हरिभाऊंनी विशेष मेहनत -घेतली. दुरूस्त नादुरूस्त गट असतांना हरिभाऊंना दादासाहेब गायकवाड यांनी रूपवते ऐवजी रिपोटे करा असे सांगितले बरीच वर्षे रिपोटे म्हणूनच त्यांना सर्वजण ओळखायचे. कालांतराने पुन्हा रूपवते झाले. मोतीलालनगर मध्ये उघड्यावर एक बुध्दमूर्तीची स्थापना केलेली होती. बरीच वर्षे त्या अवस्थेत होती. तिथे एखादे बिहार असावे. वंदनेसारी लोक एकत्र जमतात पण उघड्यावर बरे दिसत नाही मग हरिभाऊंनी पुढाकार घेतला आणि बांधकाम करून विहाराचे स्वरूप दिले. आज जे भव्य प्रमाणात विहार दिसते त्याचा पाया हरिभाऊनी घातला. स्वतः सैलाजी बाबा त्या विहाराच्या साफसफाईकडे जातीने लक्ष घालीत. स्वतः हरिभाऊ वरीच व श्रावस्ती बुद्ध विहाराचे अध्यक्ष होते


हरिभाऊंच्या निधनानंतर त्यांच्या कुवतीचा अध्यक्ष लाभला नाही हे गोरेगांवचे दुर्दैवच म्हणावे लागेल. ___सर्वसामन्यांशी समरस होणे त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे त्यांना अडचणीमध्ये मदत करणे हा हरिभाऊंच्या स्वभावाचा स्थायिभाव होता. नोकरी आणि कुटुंब संभाळून समाजकार्य करणे ही तारेवरची कसरतच असते. या बाबतीत हरिभाऊ कुठे ही कमी पडलेले नाहीत. मुलांना शिक्षण देऊन योग्य मार्ग दाखविण्यास हरिभाऊंनी खास काळजी घेतलेली आपणास दिसते. त्या मुलांच्याकडे पाहिल्यास वडीलांचा वारसा पुढे चालविण्याची क्षमता त्याच्यात आहे हे आढळ्याशिवाय राहत नाही. बौध्दसमाजातील पी. डी. सोनावणे आणि शामसुंदर कांबळे हे दोघेही धार्मिक क्षेत्रात अग्रगण्य आहेत किंवा वौध्दाचार्य झाले आहेत त्यामागची प्रेरणा हरिभाऊंची होती ही वस्तुस्थिती आहे. १९७३ साली नगरपालिकेची निवडणूक आली. शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष यांची युती होती. हरिभाऊंना रिपब्लिकन पक्षाने तिकीट दिले केवळ अल्प मतामुळे त्यांना अपयक्ष मिळाले. हरिभाऊ जर त्यावेळी निवडणूक जिंकले असते तर या मतदारसंघाचा चेहरामोहराच बदलला असता आपणा सर्वांचे दुर्दैवच हरिभाऊ निवडून आले नाहीत.


१९६४ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहीनाचा देशव्यापी सत्याग्रह सुरू केला. ब्राम्हणापासून कुणबी कोळ्यापर्यंत सर्वांनी या सत्याग्रहात भाग घेतला देशभरात ३ लक्ष ४० हजार सत्याग्रही तुरूंगात गेले देशातील तुरुंग अपुरे पडू लागले. रिपब्लिकन पक्षाने मुंबईतील कार्यकत्यांना सत्याग्रहात सामील होण्याचा आदेश दिला मग हरिभाऊ कसले स्वस्थ बसणार? कार्यकर्त्यांना एकत्र जमवून गोरेगांव कुठल्याही परिस्थितीत कमी पडता कामा नये प्रत्येकाने सत्याग्रहात भाग घेऊन पक्षादेश येईल त्याप्रमाणे सत्याग्रह करावा अशी सूचना दिली दररोज गोरेगांवातील तुकड्या सत्याग्रहात भाग घेऊ लागल्या. केंद्र सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यावरच सत्याग्रह स्थगित झाला. हरिभाऊ, राजकिय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असायचे कुठेही ते कमी पडले नाहीत, कार्य करीत असतांना अचानक दि. ५ सप्टेंबर १९८३ रोजी हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले हे निधन अकाली होते. त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होण्यापूर्वी करावयाच्या धार्मिक विधीप्रसंगी हलकासा पाऊस पडला. जणू निसर्गानेच त्यांना न्हाऊ घातले. सर्व विधी पार पडल्यानंतर संपूर्ण गोरेगाव परिसरातून त्यांची अंत्ययात्रा जात असताना कुठेही थेंबबर पाऊस पडला नाही हे विशेष. विविध जाती धर्माच्या लोंकाना मध्ये त्यांचा दांडगा सपंर्क होता.  श्रद्धांजली सभेत विविध राजकीय पक्षाचे, सामाजिक संस्थांचे व हजारो लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता. त्यावरून त्यांची  लोकप्रियता व समाज भिमुक्तता लक्षात येते. 


 थोड्याच दिवसात हरिभाऊंच्या पत्नी सखुबाई यांचेही २३ मे १९८८ रोजी निधन झालं अक्षरशः मुलांना कुणाही वडिलधान्यांचा आधार राहिला नाही परंतु त्यातही ते कुटुंब सावरलं ते केवळ एकच कर्तृत्वमान मुलामुळे तो म्हणजे नरेंद्र. आईवडिलांच छत्र हरपल्यानंतर केवढी भयानक परिस्थिती निर्माण होते याची कल्पनाच न केलेली बरी.  परंतु नरेंदाने दु:ख कवटाळले नाही तर त्यातून भविष्याचा मार्ग शोधला, हतबल होऊन घरात बसला नाही, जीवनाचा अर्थ त्याला गवसला आणि सावधपणाने सावरला. जीवनामध्ये येणाऱ्या, अनेक चढ-उतारांना त्याने समर्थपणे तोंड देऊन त्यावर मात केली आहे. त्यात त्यांच्या सौ. नीमा या सुशील पत्नीचा निश्चितच आधार मिळाला भाऊ सुरेंद्र आणि सतीश याचंही सहकार्य मिळाले काका रामकृष्ण आणि लक्ष्मण यांनीही आधार देण्याचं काम केले. हरिभाऊंची स्मृती कायम रहावी म्हणून मोतीलालनगर मधील काही तरुण एकत्र आलं त्यांनी नाविन्य मित्र मंडळाची स्थापना केली आणि हरिभाऊ रूपवते मोफत वाचनालय सुरू केले. वाचनालयाचे उद्घाटन ३१ मार्च १९९० रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.  मोतीलाल नगरमध्ये हरिभाऊंच्या स्मृती कायम रहाव्या म्हणून त्यांच्या मुलाने नरेंद्रने अखंड परिश्रम घेतले. त्यांच्या  ऋणातून मुक्त व्हावे याकरिता अनेक वर्षे पाठपुरावा करून मोतीलाल नगर नं.१ मधील पोस्ट ऑफिस पासून ते शेजलपार्क येथे जाणाऱ्या  मार्गाला हरिभाऊ सैलाजी रुपवते मार्ग हे नाव दिले. यासाठी माजी नगरसेवक सुहास सामंत आणि तत्कालिन नगरसेवक दिलीप शिंदे यांनीही सहकार्य केले.  विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाई व केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नामाभिधान दिनांक 5 सप्टेंबर 1997 रोजी  करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांपैकी पी.एल.लोखंडे मार्ग चेंबूर व हरिभाऊ सैलाजी रुपवते मार्ग मोतीलाल नगर नं.१ गोरेगाव अशा या दोन महामार्गाची मुंबईच्या इतिहासात अत्यंत महत्वाची नोंद मानली जाते. 


- रमेश शिदे 
४०/३२१ मोतीलाल नगर नं.१
गोरेगांव (पश्चिम)  मुंबई -१०४.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com