Top Post Ad

मी माझ्या समाजात फूट पाडणार नाही - आर.डी.भंडारे

मी माझ्या समाजात फूट पाडणार नाही असे निक्षूण सांगणारे
आर.डी.भंडारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ( ५ सप्टेंबर १९८८ ). 


विज्ञानाने प्रचंड प्रगती करूनही भारतात अद्यापही विषमतावाद, जातीवाद कायम आहे. मंगळावरून मानवाचा ध्वनी पृथ्वीवर ऐकू आला आणि जगभरच्या वैज्ञानिकांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र त्याचवेळेस आम्ही मंदीरातून घंटा वाजवत होतो. भारत देशातील या व्यवस्थेला सर्वप्रथम तथागतांनी विरोध केला. पुढे त्यांचा वैचारिक वारसा संत कबीर, क्रांतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांनी जोपासला.पण हा वसा समर्थपणे पुढे चालवण्याचे महान कार्य बोधीसत्व डॉ. बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या विचारांची पेरणी करुन केले. परंतु त्यांच्या पश्चात त्यांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना फोटोमध्ये बंदीस्त करून त्यांच्या वैचारिकतेला तिलांजली दिली. मात्र याला काही अपवादही होते; ज्यामध्ये आर.डी.भंडारे यांचे  नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.    महात्मा फुले व नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 साली मुंबई गिरणी कामगारांची संघटना बांधली होती हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपली समाजकार्याची सुरवात कामगार चळवळीने केली. डॉ. बाबासाहेब मजूरमंत्री व कायदेमंत्री असताना त्यांच्या सहाय्याने ट्रेड युनियन, मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचे सचिव व नवभारत मिल मजदुर सभेचे अध्यक्ष म्हणून अनेक कामगार हिताचे निर्णय मंजूर करुन घेतले.  

1956च्या धम्मदिक्षेनंतर बाबासाहेब म्हणाले होते `मी सारा भारत बौद्धमय करीन' परंतु त्यांच्या अकाली परिनिर्वाणानंतर साऱया नेत्यांना याचा विसरच पडला होता. सर्वजण रिपब्लिकन पक्ष आणि राजकारणात गुंतले होते. अशावेळी अनेक हितशत्रूंशी सामना करीत आर.डी.भंडारे यांनी गावोगावी धम्मदिक्षेचे कार्यक्रम राबवले. भारताला जगात मानाने जगायचे असेल तर त्याने बौद्ध झालेच पाहिजे या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले.बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक बौद्ध धार्मिय जगतात एकमेव धर्मग्रंथ म्हणून मानावे अशी मागणी जागतिक बौद्ध परिषदेत केलेली होती. बौद्धांच्या समस्यांचा गाढा अभ्यास करून त्यावर पुस्तिकाच लिहीली. बौद्धधम्माबद्दल त्यांना असलेला आदर आणि जिव्हाळा यातूनच प्रकट होतो. 

वरळीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची प्रचंड फौज, त्यांना मानणारे  त्यांच्या हाकेला धावणारे लोक असतानाही वरळी मतदारसंघ बी.सी.कांबळेंना सोडून देण्याचे औदार्य दाखविणारे केवळ आर.डी.भंडारेच असू शकतात. त्यानंतरही बी.सी.कांबळेंच्या विरोधात त्यांना उभे करण्याचा प्रयत्न केला असता मी माझ्या समाजात फूट पाडणार नाही असे निक्षूण सांगणारेही केवळ आर.डी.भंडारेच होत.  1956 नंतर त्यांनी विधानसभेत व लोकसभेत धम्मपदावर हात ठेवून शपथ घेण्यासाठी धम्मपदाची मागणी केली. पण विधान भवनाच्या ग्रंथालयात तेव्हा धम्मपदाची प्रत उपलब्ध नव्हती ती मुंबई विद्यापिठातून आणावयास लावली व धम्मपद मस्तकास लावून धम्मपदाची शपथ घेतली. समाज व्यवस्थेतील सर्वाधिक उपेक्षित घटकांतून त्यांनी आपल्या जीवनाला सुरुवात करुन कामगार नेते, नगरसेवक, आमदार, खासदार ते राज्यपाल पदापर्यंतचा प्रवास सुख दु:ख समान मानत यशापयशाची खंत न बाळगत अनेक महत्वपूर्ण टप्याने पूर्ण करत आपल्या छातीची ढाल समाजाच्या रक्षणासाठी केली. त्यांचे जीवन हे शिल, नितिमत्ता, शौर्य, दुरदृष्टी, सदगुणांचा आदर्श ठरले म्हणूनच त्यांचे कार्य आजही स्फुर्तीदायक ठरते. 


सुबोध शिवराम शाक्यरत्न 


 


 


जन्म : 11 एप्रिल 1916  
मौजे - विटा, तालूका- खानापूर, जिल्हा - सांगली 
वडीलांचे नाव : धोंडीराम हरीबा भंडारे व आईचे नाव : जाईबाई धोंडीराम भंडारे 
1926 साली मुंबईतील वरळी बावन चाळ येथे आई बरोबर आले. 
वरळी नॉर्थ अ. प्राथमिक शाळेत  अभ्यासाला प्रारंभ 
1930 साली मिडल स्कुल स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण 
1933 साली परेल पोयबावाडीत 7 वी ची परीक्षा उत्तीर्ण 
1934 साली दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पिंटोव्हिला शाळेत इंग्रजी पहिली उत्तीर्ण झाले. 
1935 साली सरस्वती विद्यालय परळ येथील इंग्रजी 4थी पर्यंत शिक्षण पूर्ण त्याच काळात बी.डी.डी.चाल क्र.57 वरळी येथे राहवयास आले. 
1937 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण. 
23 एप्रिल 1939 साली सुभेदार नामदेव सटवाजी वाघमारे राहणारे महू (मध्यप्रदेश), मुळगाव - मौजे-बाम्हणी, तालूका खानापूर, जिल्हा- सांगली, महाराष्ट्र यांची जेष्ठ कन्या शकुंतला यांच्याशी विटा येथे विवाह संपन्न झाला. 
1940 साली अजिंक्य पथकाच्या माध्यमातून अनेक व्यायाम शाळा व तालम्यांची स्थापना केली. 
1942 साली एल.एल.बी. ची परीक्षा उत्तीर्ण. 
1942 ते 1945 साली बॉम्बे म्युन्सिपल कामगार संघाचे सचिव. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बॅरिस्टर दळवी यांच्या मार्गदर्शनखाली वकिली व्यवसायात सुरुवात. 
1944 साली जयभीम चा नारा लोकाभिमुख केला. 
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढून त्यांचा वाढदिवस सार्वजनिक स्वरुपात करण्यात आला. 
वरळी मुंबई येथे जनता वाचनालयाची स्थापना. 
1946 साली मुंबई येथे महात्मा गांधीना काळा बावटा दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच खरे भारताचे नेते आहेत ही दाखवून दिले. 


नगर पिता  (नगरसेवक)  1948 ते 1957   
1948 साली मुंबई विद्यापिठाचे सिनेट सदस्य. 
28 नोव्हेंबर 1949 मुंबई महानगरपालिकेमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आचार्य अत्रें सोबत मांडला. 
1949 ते 1952 अध्यक्ष - इम्पीरियल व्हिलेज सर्व्हन्ट युनियन. 
नाईट हायस्कूल व मॉर्निंग कॉलेज ही पद्धत सुरु करुन हजारो होतकरु मुलांचे जीवन घडविले. 
निर्धार नावाचे साप्ताहिक सुरु केले. 
सिध्दार्थ कॉलेजात कॉमर्स व इकॉनोमिक या विषयांचे प्राध्यापक 
जनता वृत्तपत्र व प्रबृद्ध भारत चे संपादक. 
1948-53 साली स्थायी समिती सदस्य. 
1951-52 साली शिक्षण समितीचे सदस्य. 
1948-52 साली विधी समितीचे सदस्य. 
29 ऑक्टोबर 1954 रोजी पुरंदरे स्टॅडियम वर बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 1 लाख 18 हजारची थैली (मानपत्र) अर्पण केले. 


आमदार  (विधान सभा सदस्य) 
1957 ते 1962  (मतदार संघ -वरळी) 
आमदार म्हणून प्रथमत: धम्मपदावर हात ठेवून शपथ घेतली. 
महेश्वरी उद्यान ते भायखळा पर्यंतच्या रस्त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात आले. 
1957 ते 1964 संस्थापक सदस्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मुंबई प्रदेश अध्यक्ष 
चैत्यभूमीची जागा मिळविली 
दीक्षाभूमीची जागा मिळविली 
महाराष्ट्र सरकारकडून नवबौध्दांना शिक्षणासाठी (देशमुख कमिटीद्वारे) व नोकरीसाठी सवलती मिळवून घेतल्या 
महाराष्ट्र सरकारकडून डॉ. बाबासाहेबांचे तैलचित्र सर्व शासकिय कार्यालयामध्ये सक्तीने लावण्याचे आदेश दिले. 
विरोधी पक्ष नेता असताना महार वतनदारी बिल आणून, खालसा करुन गुलामगिरीची बेडी तोडली. 
1963 साली डॉ. बाबासाहेबांचे पोस्टल स्टॅम्प व केंद्रावरुन 14 एप्रिल जयंतीसाठी सुट्टी जाहिर करुन घेतली. 
बोधगयावरुन बोधीवृक्ष आणून चैत्यभूमीत लावण्यात आला. 
संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. 
महू या बाबासाहेबांच्या जन्म स्थळी जागा मिळवून स्मारक बांधण्यात आले. 
विधी मंडळासमोर डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. 
1 ऑक्टोबर 1964 ते 30 जून 1968 साली राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष पदी निवड. 


लोकसभा सदस्य  1967 ते 1973  
(मतदार संघ- मध्य मुंबई, भायखळा ते कुर्ला) 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र संसदेच्या सेन्ट्रल हॉलमध्ये लावून घेतले व त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा ठराव पास करुन घेतला. 
एक्झीक्युटीव्ह कौन्सिल बनारस हिन्दू युनिव्हर्सिटी, पंडीत जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी व अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे सदस्य. 
चेअरमन ऑफ प्रिव्हिलेज कमिटी. 
अॅडव्होकेट बिलची सिलेक्ट कमिटी अध्यक्ष. 
अध्यक्ष सिलेक्ट कमिटी ऑफ अॅन्टी-अनटचेबिलिटी ऑफेन्स अॅक्ट 1955 ह्या अंतर्गत त्यांनी हया अॅक्ट मध्ये सुधारणा करुन कठोर शिक्षेची तरतुद केली. 
मेम्बर ऑफ व पार्लमेंट कमिटी अपॉईंट टू रिव्हिव कोठारी कमिशनची भारतात नविन शैक्षणिक पॉलिसी ठरविण्यात आली त्याद्वारे केंद्रसरकारकडून नवबौध्दांसाठी शैक्षणिक सवलती मिळवून घेतल्या. 
व्हियन्नामध्ये झालेल्या आय.पी.यु. कौन्सिल परिषदेला त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. 
संयुक्त राष्ट्र सभेत (यु.एन.ओ.) भारताचे प्रतिनिधीत्व करत असताना त्यावेळेचे सेक्रेटरी जनरल यु. थांट यांची भेट घेऊन त्यांच्या समोर भारतातील बौध्दांच्या समस्या मांडल्या व प्रॉब्लेम ऑफ बुध्दीस्ट इन इंडिया हे पुस्तक त्यांना बहाल केले. 
23,24 ऑक्टोबर 1968 मध्ये आंबेडकर नगर, सेन्ट्रल रेल्वे स्पोर्ट ग्राउंड मुंबई येथे भव्य प्रमाणात भारतीय बौध्द धम्म परिषद भरविली त्यात पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी व परदेशातील अनेक बौध्द विद्वान हजर होते. 
1967 साली आचार्य अत्रें यांचा पराभव करुन लोक सभेवर निवडून गेले. 
1971 साली मनोहर जोशी यांचा पराभव करुन लोक सभेवर निवडून गेले. 


राज्यपाल  1973 ते 1976 (बिहार-आंध्रप्रदेश) 
बिहारचे राज्यपाल असताना लोकांना सहकाराचे महत्व पटवून सहकार चळवळीचे बी पेरले 
पुरातन उध्वस्त नालंदा विद्यापिठाचे पुर्न:जिवनाचे काम सुरु केले. 
जपानी बौध्द संघाच्या मदतीने राजगिरी येथे जागतिक किर्तीचे शांतिस्तूप बांधून घेतले. 
शीख समाजाचे संस्थापक गुरु गोविंद सिंग यांच्या गुरुद्वारासाठी जागा उपलब्ध करुन दिली (पाटणा) बिहार. 
भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्व प्रथम भारतामध्ये आवाज उठवून जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला एक नविन दिशा दिली. 
भारतामध्ये सर्व प्रथम लोकायुक्तांची नियुक्ती विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन केली. 
वरळी येथे दलित पॅन्थर व सवर्ण मध्ये उसळलेल्या दंगली मध्ये राज्यपाल असताना देखिल सर्व राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी धावून आले व पदयात्रा काढून व शांततेचे आवाहन करुन दंगल शमवली. 
1978 मध्ये सिडकोच्या अध्यक्षपदी निवड झाली. 
5 सप्टेंबर 1988 निर्वाण झाले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com