घोडबंदर किल्ल्याच्या संवर्धनासाठीचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद - युवराज संभाजीराजे छत्रपती.
मिरा-भाईंदर
अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या घोडबंदर किल्ल्याच्या संवर्धनाचे, सुशोभीकरणाचे काम सुरु झाले आहे. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती हे घोडबंदर किल्ल्यात पाहणी करण्यासाठी आज ३ सप्टेंबर रोजी आले होते. त्यांनी घोडबंदर किल्ल्यात सुरु असलेल्या प्रत्येक कामाची बारकाईने माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या. हा किल्ला साधारण अडीच एकर जागेत असून किल्ल्यात होत असलेले उद्यान , म्यूजिकल फाउंटन व इतर कामाची त्यांनी माहिती घेतली. किल्ल्याच्या शेजारी असलेल्या जागेत शिवसृष्टी प्रकल्प नियोजित असून त्याचीही त्यांनी माहिती घेत यासाठी जेजे सहकार्य लागेल ते आपण करणार आहोत, अशी ग्वाही युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. तर रायगड येथे किल्ला संवर्धनाचे काम कशाप्रकारे सुरु आहे हे पाहण्यासाठी आपण मीरा भाईंदर पालिकेचे अधिकारी व संवर्धनाचे काम करणारे कर्मचारी यांना रायगड येथे घेऊन जाऊ, अशी ग्वाही आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. यावेळी मीरा भाईंदर पालिकेचे अधिकारी , युवासेना सचिव श्री पुर्वेश सरनाईक, स्थानिक ग्रामस्थ हे उपस्थित होते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, घोडबंदर किल्ल्याच्या संवर्धनातून गडाला उर्जितावस्था मिळेल असे दिसत आहे. खासदार, आमदार, मंत्री यांनी आपल्या परिसरातील एक एक किल्ला दत्तक घेतला व केंद्र, राज्य सरकारच्या सूचनांप्रमाणे किल्ला संवर्धनासाठी काम केले तर महाराष्ट्राचे वैभव , आपला गौरवशाली इतिहास जो या किल्ल्यात आहे हा इतिहास पुन्हा जिवंत होईल. छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला म्हणून किल्ला संवर्धन करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. अनेक शिवप्रेमी किल्ला संवर्धनासाठी काम करण्यास इच्छुक आहेत. किल्ला संवर्धनासाठी जे काम करू इच्छितात त्यांना योग्य ते मार्गदर्शन मी करीत आहे. 'फोर्ट फेडरेशन' स्थापन करण्याचा माझा संकल्प आहे. या क्षेत्रातील तज्ञ , विद्वान मंडळी , शिवभक्त , स्थानिक ग्रामस्थ हे या फेडरेशन मध्ये सक्रिय असतील . जे किल्ला संवर्धनासाठी काम करू इच्छितात अशा राज्यातील सर्व शिवप्रेमींना एकत्र करून मार्गदर्शन करण्याचा विचार आहे. फोर्ट फेडरेशन राज्यातील किल्ला संवर्धनासाठी काम करेल. किल्ला संवर्धनासाठी काम करू इच्छिणारे असे अनेक इच्छुक लोक राज्यात आहेत. किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी फोर्ट फेडरेशन नक्कीच यशस्वी होईल असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी घोडबंदर गावातील ग्रामस्थ हेही किल्ल्याबाबत किती जागरूक आहेत हे सांगितले. त्यावर संभाजीराजे म्हणाले की , घोडबंदर गावातील नागरिकांचे विशेष कौतूक करतो कि, त्यांनी संवर्धनाविषयी अतिशय जागृत राहून, गडावर कोणत्याही चुकीच्या प्रकारचे काम होऊ दिलेले नाही. काही वर्षांपूर्वी किल्ल्यात एका ठेकेदाराने सिमेंट वापरण्याचा प्रयत्न करताच, त्याला ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला व ऐतिहासिक पध्दतीने काम करण्याचा आग्रह धरला. आज तिथे दगडात, चुन्याचा, बेलफळाचा, आणी सुरकीच्या मिश्रणाचा वापर करुन काम सुरु आहे. प्रत्येक किल्ल्याच्या जवळील, लोकांनी यापध्दतीची सजगता व जागृकता दाखवण्याची गरज आहे. म्हणजे आपली अस्मिता असलेले किल्ले काळाच्या कसोटीवर टिकून राहतील घोडबंदर किल्ला संवर्धन करताना व शिवसृष्टी प्रकल्प उभारताना आपले जे जे सहकार्य लागेल ते सगळे सहकार्य करू , असे यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आमदार सरनाईक यांना सांगितले.
0 टिप्पण्या