ऑनलाइन वर्ग, work from homeच्या इंटरनेट वापरामुळे पालकांचे आर्थिक गणित बिघडले
मुंबई
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरातील शाळा ऑनलाइन वर्ग घेत आहेत. त्यासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे इंटरनेट कंपन्या मालामाल होत आहेत तर सर्व सामान्य नागरिकांचे खर्चाचे गणित बिघडत आहे. एका मोबाईल कनेक्शनला एक ते दीड जीबी इंटरनेट मिळते; मात्र ऑनलाइन वर्गामुळे दुपारपर्यंतच ते संपून जाते. परिणामी पालकांना रोजच्या कामासाठी पुन्हा नेट पॅक खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांना हा खर्च पेलवेनासा झाला आहे. कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सर्व कार्यालये आणि कामधंदे बंद असल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या; तर बहुतांश कार्यालयांमधील कर्मचारी घरुन काम करीत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये खासगी शाळांना शुल्कवाढीला मनाई करणारा अध्यादेश जारी केला होता. मात्र या निर्णयाविरोधात काही शाळा चालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने जूनमध्ये याचिका सुनावणीसाठी मंजूर केल्या आणि संबंधित निर्णयाला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती हटविण्यासाठी पालकांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. याचिकेवर सोमवार १० ऑगस्ट रोजी न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. न्या. उज्जल भूयान आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने शाळा संघटनेसह अन्य प्रतिवादींना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी २० ऑगस्टला होणार आहे. मागील वर्षीचेच शुल्क ठेवावे आणि पालकांना ते हप्त्यात भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
0 टिप्पण्या