दिल्लीहून लंडनला जाण्यासाठी  १५ लाख रुपयांचा खर्च 

 दिल्लीवरून लंडनला जाण्यासाठी  १५ लाख रुपयांचा खर्च नवी दिल्ली
दिल्लीवरून लंडनला जाण्यासाठी आत्तापर्यंत विमान हा एकमेव पर्याय होता. पण आता रस्त्यानेही दिल्लीहून लंडनला जाता येणार आहे. गुरगावमधली खासगी प्रवास कंपनीने १५ ऑगस्टला बस सेवा लॉन्च केली आहे. 'बस टू लंडन' असं या सेवेचं नाव आहे. या बसने ७० दिवसांमध्ये तुम्ही दिल्लीवरून लंडनला पोहोचू शकता. एका व्यक्तीला या प्रवासासाठी १० देशांचा व्हिसा लागणार आहे. प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये, म्हणून कंपनीच व्हिसाची संपूर्ण सोय करणार आहे. 'बस टू लंडन'चा प्रवास ४ भागांमध्ये विभागण्यात आला आहे. प्रवाशांकडे वेळ कमी असेल आणि त्यांना लंडनपर्यंतचा प्रवास करता येत नसेल, तर ते ठराविक देशही फिरू शकतात. यासाठी प्रवाशांना वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे पैसे द्यावे लागतील. दिल्लीपासून लंडनपर्यंतचा प्रवास करण्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी ईएमआचा पर्यायही देण्यात आला आहे. जग फिरण्याची हौस आणि खिशात पैसा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. 


७० दिवसांच्या दिल्ली ते लंडन या प्रवासात तुम्हाला १८ अन्य देशांमधून जावं लागेल. भारतातून सुरू होणारा हा प्रवास म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किर्गिजस्तान, उजबेकिस्तान, कजकिस्तान, रशिया, लातविया, लिथुआनिया, पोलंड, चेक रिपब्लिक, जर्मनी नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स मधून युकेमध्ये पोहोचेल. दिल्लीचे रहिवासी असलेले तुषार आणि संजय मदान हे याआधीही रस्त्यामार्गे दिल्लीहून लंडनला गेले आहेत. या दोघांनी २०१७, २०१८ आणि २०१९ साली कारने हा प्रवास केला होता. अशाच पद्धतीने यंदा २० जणांना सोबत घेऊन बसने प्रवास करण्याचा प्लान आहे. 'बस टू लंडन'च्या या प्रवासामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा देण्यात येणार आहेत. या प्रवासासाठी खास बस तयार करण्यात आली आहे. या बसमध्ये २० प्रवाशांच्या बसण्याची सोय आहे. बसमधल्या सगळ्या सीट बिजनेस क्लासच्या असतील. दिल्ली ते लंडनच्या या प्रवासात बसमध्ये २० प्रवाशांसोबत इतर ४ जण असतील. यामध्ये एक ड्रायव्हर, एक असिस्टंट ड्रायव्हर, कंपनीचा एक केयरटेकर आणि एक गाईड यांचा समावेश असेल. १८ देशांच्या या प्रवासात गाईड बदलले जातील. 


ऍडव्हेंचर ओव्हरलँड ट्रॅव्हलरचे संस्थापक तुषार अग्रवाल म्हणाले, 'मी आणि संजय मदान २०१७, २०१८ आणि २०१९ साली कारने लंडनला गेलो होतो. त्यावेळी आमच्यासोबत आणखी काही जण होते. आम्ही प्रत्येक वर्षी अशाप्रकारची ट्रीप करतो. अनेकांनी आमच्यासोबत प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून १५ ऑगस्टला आम्ही बस टू लंडन लॉन्च केलं. मे २०२१ पासून आमचा हा प्रवास सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या कोरोनामुळे आम्ही फक्त नोंदणी सुरू केली आहे. भारतासोबतच अन्य देशांमधली परिस्थिती बघून प्रवास सुरू करू.'  '७० दिवसांच्या या प्रवासात हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था असेल. यासाठी फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेलची निवड केली जाईल. प्रवाशांना दुसऱ्या देशात भारतीय जेवण हवं असेल, तर तेदेखील दिलं जाईल,' अशी प्रतिक्रिया तुषार अग्रवाल यांनी दिली

 


 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या