मिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकानांसह मॉल्सना ५ ते ७ पर्यंत उघडण्यास परवानगी
मुंबई
मिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकांनाना 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे दुकाने उघडण्याची वेळ यापूर्वी कमी होती. यासोबतच ऑड इव्हन तत्त्वावर ही दुकाने उघडली जात होती. पण, आता 5 ऑगस्टपासून मुंबईतली सर्व दुकाने खुली राहतील. दारुची दुकानही सुरू केली जाणार आहे. त्यानुसार काऊंटरवर दारू मिळेल. यादरम्यान सर्व गाईडलाईन्सचे पालन करणे गरजेचे आहे. दुकानांसोबतच 5 ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सलाही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.मुंबई महापालिकेने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
यानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू ठेवता येतील. परंतू, यावेळी मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्तरॉ बंदच राहतील. परंतू, होम डिलीव्हरी सुरू ठेवता येईल. मद्य घरपोच देता येण्याची सुविधाही देण्यात आलीय. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. कोणत्याही नियमाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे. मॉल्स आणि कॉम्प्लेक्समधली दुकानंही उघडण्यास संमती देण्यात आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या. या अंतर्गत काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून ५ ऑगस्ट २०२० पासून सुरु करण्यास संमती देण्यात आली. तसंच खेळाडूंचा संघ नसलेल्या काही आऊटडोअर खेळांना काही अटींच्या अधीन राहून ५ ऑगस्टपासून संमती देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाचा वाढता संसर्ग हा मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला आहे. शिवाय रुग्णसंख्या वाढीचा कालावधीही वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढण्याच्या वेगात लक्षणीय घट आल्यामुळं हे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नाना आलेलं यश असल्याचं स्पष्ट होत आहे. मुंबईत रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1 टक्क्यापेक्षाही कमी झाला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवसांच्या पार गेला आहे. एवढेच नव्हे तर, मुंबईत कोरोनाची लागण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांनी 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे दिनांक 28 जुलै 2020 रोजी एकाच दिवसात 11 हजार 643 चाचण्या करण्यात आल्या असून हा मुंबईतील एका दिवसातील चाचण्यांचा आतापर्यंतचा उच्चांकदेखील आहे.
0 टिप्पण्या