सरकारी धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जय आनंद फूड कंपनीला श्रमजीवी संघटनेचा दणका
ठाणे
महाराष्ट्रातला चांगला भात काळ्या बाजारात विकून त्या बदल्यात स्वस्त आणि निकृष्ट, असा जुना तांदूळ सार्वजनिक व्यवस्थेत पाठवत असल्याचा घोटाळा श्रमजीवी संघटनेने उघड केला आहे. आदिवासी विकास महामंडळाने हमी भाव केंद्रात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाची मिलिंग करून तोच तांदूळ रेशनवर देण्याची जबाबदारी मिलर्सवर दिली आहे. मात्र, तसे न करता या धान्याची आदलाबदल करून रेशन व्यवस्थेला हलक्या प्रतीचे धान्य पोच करणारे पाच ट्रक भिवंडी तालुक्यातील पडघा येथे पकडून ही काळाबाजारी उघडकीस आणली आहे. राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष तसेच याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याशी चर्चा करून त्यांना या सर्व प्रकाराची माहिती दिली. आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेतर्फे करण्यात आली.
जय आनंद फूड कंपनीने महामंडळाच्या गोदामातला तांदूळ गुजरातच्या एक व्यापाऱ्याला काळ्या बाजारात विकला आणि त्या बदल्यात चक्क २०१८-१९ चा पंजाब आणि हरियाणा सरकारच्या खाद्य निगमचा तांदूळ हा हुबळी मार्केटच्या माध्यमातून पडघा मिलवर आणून तो पुन्हा शहापूर गोदामात पाठविण्याची तयारी होती. सुमारे १ हजार २३० टन निकृष्ट तांदूळसाठा या ट्रकमधून होता. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या गाड्या पकडून संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. पंचनामा जबाब नोंदवून तब्बल १२९ टन माल असलेले पाचही ट्रक पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईत श्रमजीवी संघटनेचे कातकरी घटक राज्य प्रमुख गणपत हिलम, तालुका अध्यक्ष सुनील लोणे, युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, कातकरी घटक जिल्हा जयेंद्र गावित, केशव पारधी, आशा भोईर, आदींचा सहभाग आहे. हे सर्व रात्री उशिरापर्यंत या कारवाई प्रक्रियेत होते. तर शहापूर येथे जिल्हा सचिव दशरथ भालके, तालुका सचिव प्रकाश खोडका यांनीही शहापूर येथे २ गाड्या पकडून तहसीलदार यांच्या ताब्यात दिल्या. भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनीही घटनास्थळी भेट दिली. सरचिटणीस बाळाराम भोईर यांनीही या ठिकाणी भेट देऊन संताप व्यक्त केला. यावेळी पुरवठा निरीक्षक पी.यु. चव्हाण, राऊत आणि संजीवनी वानखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे, पोलीस भरत शेगर, पी. एन देसले इत्यादी उपस्थित होते.
0 टिप्पण्या