ओळख `राज्य कांदळवन वृक्षा'ची...
कांदळवने, खारफुटीची झाडे यांचे महत्त्व आपल्याला 2004 सालच्या त्सुनामीने पटवून दिले होते. अनेक सागरी वादळांना किनारपट्टीवरच थोपवून धरण्याची ताकद या झाडांमध्ये असल्याने खाडीकिनारी असणारी ही जंगले म्हणजे `वेस्ट-लँड' हा समज काही प्रमाणात तरी दूर होताना दिसत आहे. परंतु या वनस्पतीची, तिच्या प्रजातींची, सागरी परिसंस्थेतील त्यांचे महत्त्व या विषयाची नीटशी ओळख आपल्याला अद्यापपर्यंत तरी झालेली नाही. या वनस्पतीच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने `मॅग्रुव्ह सेल' हा स्वतंत्र कक्ष स्थापन केला असतानाच आता याचीच एक प्रजाती, `पांढरी चिपी' (Sonneratia alba) ही राज्य शासनाने `राज्य कांदळवन वृक्ष' म्हणून घोषित केली आहे. कांदळवनाच्या एखाद्या प्रजातीचा सन्मान करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे.
पांढरी चिपी ही प्रजाती मुळची अंदमान बेटावरची. पण महाराष्ट्राच्या सर्वच खाडी किनाऱयावर ही मोठ्या प्रमाणात आढळून येते. या वनस्पतीला पांढऱया रंगाची सुंदर फुले येतात. लॅटीन भाषेत `अल्बा' म्हणजे पांढरा रंग आणि फ्रेन्च वनस्पतीशास्त्रज्ञ पिअरे सोन्नेरेट (1748-1810) यांच्या कार्याचा गौरव म्हणून या प्रजातीचे नाव एदहहूग्a aत्ंa असे ठेवण्यात आले. याच्या झाडांना सुवासिक आणि चवीला गोड असणारी हिरवी सफरचंदासारखी फळे येतात. म्हणून हिला `ग्रीन अॅपल मॅग्रुव्ह' या नावाने देखील ओळखले जाते.
40 मीटर (130 फूट) पर्यंत उंच वाढणाऱया पांढऱया चिप्पीचे खोड व्यासासह 70 सेंटीमीटर (30 इंच) पर्यंत वाढते. तांबूस तपकिरी रंगाचे साल भरतीच्या वेळेस काहीसे करड्या रंगाचे होते. टणक लाकडामुळे ही वनस्पती सरपण म्हणून वापरली जाते. परंतु अशा जाळाऊ वापराने या प्रजातीचे खऱया महत्त्वाच्या उपयुक्ततेचीही राख होते, असे म्हणावे लागेल.
खारफुटीच्या इतर प्राजातीच्या लाकडांप्रमाणेच पांढऱया चिरीचे लाकूडही पाण्यात कुजत नसल्याने बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी तसेच जहाजे बांधण्यासाठी, रेल्वेचे स्लीपर्स तयार करण्यासाठी खूप उपयुक्त असते. कारण याचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही. इमारती बांधण्यासाठीही हे लाकूड अतिशय उपयुक्त आहे. तांबूस सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो. याचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, रंगविण्यासाठी आणि माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो. या वनस्पतीची फुले संध्याकाळी फुलणारी असल्याने वटवाघळे आणि इतर निशाचर कीटकांद्वारे परागीकरण मोठ्या प्रमाणावर होते. फुलांमधील मध गोळा करण्यासाठी मधमाशा आकर्षित होतात.
आफ्रिकेतील काही देशांमध्ये याच्या पानांचा उपयोग जेवणात केला जातो. पूर्व आफ्रिकेत ही पाने उंटांचे उत्तम खाद्य म्हणूनही उपयुक्त ठरतात. फळातील गरापासून उत्तम प्रकारचे अँटीबायोटिक मिळते. एकूणच सागरी परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱया या वनस्पतीमधून रोजगार देखील निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्रातील सर्वच सागरी किनाऱयांवर मोठ्या संख्येने आढळणाऱया अशा या सर्वगुणसंपन्न `पांढरी चिपी'चे संवर्धन आणि संरक्षण व्हावे म्हणून तिला दिलेला `राज्य कांदळवन वृक्षा'चा दर्जा, हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील कांदळवनांचा सन्मान म्हणावा लागेल.
- मनीष चंद्रशेखर वाघ
मुक्त पत्रकार: ठाणे
0 टिप्पण्या