डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रूपात एक संघर्षशील आणि शिस्तप्रिय नेतृत्व गमावले - मंत्री. विजय वडेट्टीवार
मुंबई
“माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस पक्षाचे नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या रूपात काँग्रेस विचारधारेचे खंदे समर्थक, एक संघर्षशील आणि शिस्तप्रिय नेतृत्व, गमावले. इश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो, असे भावपूर्ण उद्गार मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शोक व्यक्त केला.
त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले की, निलंगेकरांना मुख्यमंत्री म्हणून फार मोठा कालावधी मिळाला नसला तरी अत्यंत अल्पकाळातदेखील त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या पदाचा समर्पकपणे वापर करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्यमंत्री म्हणून काम करताना केवळ आपल्याच जिल्ह्याचा विचार करून चालत नाही, याची पुरेपूर जाणीव निलंगेकरांना होती. त्यामुळे जिल्ह्याच्या बाहेर जाऊन मराठवाडा व महाराष्ट्र पातळीवरही विकासाचे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले. एक आमदार ते मुख्यमंत्री या दीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी नेहमी सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. देशाचा विकास साधायचा असेल तर तळागाळापासून सुरुवात केली पाहिजे, हे राज्यशास्त्राचा विद्यार्थी या नात्याने त्यांना ज्ञात होते. जनतेला केंद्रस्थानी ठेऊन विकासाभिमुख कामे करणे हे त्यांचे खास गुणवैशिष्ट्य होते. महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये निलंगेकर हे पहिलेच डॉक्टरेट झालेले मुख्यमंत्री होते. या गोष्टीचा आजही अभिमान वाटतो. पुढील काळात त्यांची उणीव आम्हाला नक्कीच जाणवत राहिल, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.
अनिल राठोड यांच्या रूपात सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व गमावले - मंत्री. विजय वडेट्टीवार
शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री आणि माजी आमदार अनिल राठोड यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शोक व्यक्त करतांना म्हणाले, “शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री आणि माजी आमदार अनिल राठोड यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या रूपात सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व गमावले. इश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो.” राठोड हे ८० % समाजकारण व २० % राजकारण हे ब्रीद घेऊन काम करीत. नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यासाठी अनिल राठोड यांचा सिंहाचा वाटा होता. अहमदनगरच्या राजकारणावर दबदबा असलेल्या अनिल राठोड यांची नगरमधील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख होती. अनिल भैया म्हणून ते सर्वसामान्यांच्या हृदयात होते. त्यांच्या निधनानं सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.
0 टिप्पण्या