पालिकेच्या नियोजन शून्य कारभाराविरोधात गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालय बचाव संघर्ष समितीचा लढा
मुंबई
मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असल्याने मुंबईतील सर्व रुग्णालये सुरु ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले. मात्र पालिकेचेच मुंबईतील गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय दुरुस्तीच्या नावाखाली मागील दीड वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. पालिकेच्या या अनागोंदि कारभारामुळे गोरेगाव, मालाड व जोगेश्वरी भागातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. इमारत मोडकळीस आलेली असुन इमारतीचे तातडीने नवीन बांधकाम करणे गरजेचे आहे. मालाड, गोरेगाव व जोगेश्वरी परिसरातील नागरिकांसाठी हे जवळील रुग्णालय असून कोरोनाच्या संकटसमयी हे सुरु करणे गरजेचे होते. पालिकेच्या आरोग्य विभागाने सिद्धार्थ रुग्णालय सुरु करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरुन लढा दिला जाईल. पालिकेच्या नियोजन शून्य कारभाराविरोधात गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालय बचाव संघर्ष समितीने आवाज उठवला असून रुग्णालय पुन्हा सुरु करावे, यासाठी प्रसंगी रस्त्यावरची तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.
सिद्धार्थ रुग्णालय ही पाच मजली इमारत ए विंग व बि विंग पालिकेने उभी केली. ए विंग- तळमजला – केसपेपर नोदणी , एक्स – रे विभाग , रक्त चाचणी विभाग – पहीला मजला – बाहा रूग्ण कक्ष, तिसरा मजला – महिला विभाग 50 बेड पाचवा मजला पुरुष विभाग 50 बेड तसेच दुसरा व चौथा मजला हा खाजगी संस्थेला वापरण्यास देण्यात आला असून असे 100 खाटां सहीत रुग्णालय सुरू करण्यात आले होते. बि विंग अजूनही रिकामी आहे. कालांतराने ए विंग तळमजल्यावर एका खाजगी संस्थेला ( प्रबोधन ) अत्याधुनिक ना नफा ना तोटा तत्वांवर रक्तपेढी चालवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. येथे कुठल्याही प्रकारच्या दुरुस्तीचे काम पालिकेने सुरू केले नाही. या उलट रुग्णालयाच्या आवारात बंद अवस्थेतील भंगार आणून टाकली आहेत. रूग्णालयची ईमारत सन 1995 ते 1997 या काळात उभारली गेली आहे. इमारत बांधून तयार झाल्यानंतर या रुग्णालयाचे उद्घाटन कोण करणार या कारणास्तव काही वर्षे बंदच होती. त्यानंतर कालांतराने रुग्णालये सुरु झाले. परंतु 2019 मध्ये दुरुस्तीचे कारण देत पुन्हा बंद केली आहे. या दीड वर्षांत ना इमारतीची दुरुस्ती झाली ना डागडुजी, त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग नेमके करते काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
0 टिप्पण्या