दास्तान फाटा ते बेलपाडा गावापर्यंतचा रस्ता पावसाळ्यात जातो पाण्यात
नवीन रस्त्याची JNPT व तहसीलदारांकडे अजित म्हात्रे यांनी केली मागणी
उरण
दरवर्षी दास्तान फाटा ते बेलपाडा पर्यंतचा बेलपाडा गावात जाणारा मुख्य रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे पाण्यात जातो. गावांत येण्या जाण्यासाठी पावसाच्या पाण्यामुळे व समुद्राच्या भरती ओहोटी मुळे रस्ता पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे गावातील व्यक्तीचा इतर गावाशी संपर्क तुटतो. त्याचा परिणाम बेलपाडा गावातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर, व्यवहारावर होत आहे.या बंद होणाऱ्या रस्त्यामुळे गावातील सर्व व्यवहार ठप्प होत आहेत.त्यामुळे दास्तान फाटा ते बेलपाडा रस्ता नवीन बांधण्यात यावा व या रस्त्याची उंची वाढवावी अशी मागणी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते, बेलपाडा गावचे रहिवाशी अजित म्हात्रे यांनी JNPT प्रशासन व उरणचे तहसीलदार यांच्याकडे केली होती मात्र अद्यापपर्यंत या संदर्भात कोणतेही हालचाल झाले नसल्याने अजित म्हात्रे यांनी प्रशासनाच्या संथ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
दास्तान फाटा ते बेलपाडा हा गावापर्यंतचा रस्ता 60 ते 70 वर्षांपूर्वी सेझ मुळे मातीचा भराव केल्याने सदरचा रस्ता पावसाळ्यात पाण्याखाली जाऊन गावचा संपर्क तुटत आहे.समुद्राचे भरती ओहोटी मुळे पाण्याचे नीट निचरा होत नाही. पाणी एका ठिकाणी थांबून राहते. त्यामुळे येण्या जाण्याचा मुख्य रस्ता बंद होतो. त्यामुळे या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी अजित म्हात्रे यांनी तहसीलदार व JNPT प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून रस्त्याची उंची वाढवून नवीन रस्ता बांधण्यात यावा अशी मागणी केली आहे. 2018 मध्ये पत्रव्यवहार करूनही, सतत पाठपुरावा करूनही अद्याप पर्यंत प्रशासनाने कोणतेही दखल घेतले नसल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासनाने या समस्यांची दखल न घेतल्याने हा रस्ता वारंवार पाण्याखाली जात आहे. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या कोणाचे काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? प्रशासनाला जाग येणार तरी कधी ? असा सवाल आता नागरिक खुलेआमपणे विचारत आहेत.
0 टिप्पण्या