रिपब्लिकन राजकारणाचे आठवले लाभार्थी

रिपब्लिकन राजकारणाचे आठवले लाभार्थी-भाष्यकार नाहीत. -अॅड. डॉ. सुरेश माने


महाराष्ट्रातील भाजपा पुरस्कृत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष श्री रामदास आठवले यांनी अलीकडे राज्याच्या राजकारणात रिपब्लिकन पक्षाला काहीही भवितव्य नाही असे प्रस्थापित राजकीय पक्षांना पोषक विधान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर बहुजन महापुरुषांची विचारधारा प्रणित राजकीय अस्तित्वाला मुळापासून उपटून काढण्याचे जे अक्षम्य वर्तन केले आहे त्याचा सर्वप्रथम प्रत्येक आंबेडकरी वैचारीक भूमिकेच्या व्यक्तीने व समुहाने धिक्कारच केला पाहीजे, म्हणून आम्ही आठवले यांच्या या ब्राम्हणी पोषक मांडणीचा जाहीर धिक्कार व निषेध करतो.


गेली १०-१५ वर्षे स्वतापुरते मर्यादित सत्तेच्या राजकारणात व अलिकडे मोदी-भाजपा-आर.एस.एस. च्या मेहरबानीवर बिगरखात्याचे केंद्रातील मंत्रीपद मिरविणाऱ्या व भारताच्या संसदेत एका विदूषकी नेत्याची भूमिका पार पाडणाऱ्या आठवले यांच्याकडून देश-राज्यातील आंबेडकरी रिपब्लिकन जनतेला फारशी अपेक्षा नव्हती आणि नाहीही परंतू त्यांच्या अशा विधानाने आंबेडकरी राजकारणाचे अस्तित्वच समूळपणे नायनाट करण्याचे कृष्णकृत्य स्वता आठवले करीत आहेत की आजकाल ज्यांचे ते मीठ खातात तेच त्यांचे बोलविते धनी आहेत याचाही शोध घेणे ही काळाची गरज आहे. वर्ष २००४-२००५, देशातील राज्यातील निवडणूकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनीही राजकीय नैराश्यापोटी-विफलतेपोटी अशाच प्रकारची वैचारीक दिवाळखोरी घोषित करताना "आंबेडकरी चळवळ संपली आहे, आंबेडकरी चळवळ या देशात फार काळ चालेल असे दिसत नाही व ती जी काही चालेल, ती फक्त माझ्या पिढी पुरतीच" अशी मांडणी केली होती.


महाराष्ट्रातील या दोन रिपब्लिकन नेत्यांच्या गेल्या १५-२० वर्षातील वैचारिक दिवाळखोरीमुळे, स्वयकेंद्रित स्वार्थी व अहंकारी नेतृत्व पध्दतीमुळे व बहुतांशी वेळा आंबेडकरी राजकारणाचा बळी देवून प्रस्थापित राजकीय पक्षांच्या हुजरेगिरीपूरक भुमिकामुळे महाराष्ट्रात निवडणूकीच्या राजकारणात, मतांच्या गोळाबेरजेत रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व जरी नाममात्र राहीले आहे, तरी रिपब्लिकन शोषितांच्या सामाजिक मुक्तीची चळवळ म्हणून तिचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे व त्यासाठी आजही राज्यात मरणारे आणि मारणारे लाखो अनुयायी तयार आहेत, समर्थक आहेत. त्या लाखो अनुयायांच्या समर्थकांच्या शक्तीला मतामध्ये परिवर्तत करण्यात अपयशी ठरलेल्या कर्तृत्वहिन राजकीय वांझ नेत्यांनी आंबेडकरी राजकारणाचेच अस्तित्व नाकारावे व रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही अशी इतर पक्षांना सोईस्कर विधाने करून डॉ. आंबेडकरांच्या राजकीय भुमिकेची हत्या करणाऱ्या अशा रिपब्लिकन, पँथर, आंबेडकरी राजकारणाचा मलींदा खाऊन माजलेल्या नेत्यांचा वेळीच राजकीय बंदोबस्त आंबेडकरी जनतेनेच करने हाच उपाय आहे.


आठवले यांच्या या विधानामुळे राज्यातील रिपब्लिकन नेत्यांचे खरे रूप जनतेसमोर आले आहे ही त्यातही समाधानाची बाब आहे. परंतू गेल्या १५-२० वर्षात ज्यांनी रिपब्लिकन-बहुजन आंबेडकरी चळवळीचा - राजकारणाचा साधा पाच-दहा कलमी एंजेडा मांडून, एखादया सामाजिक राजकीय प्रश्नांसाठी टोकाचा संघर्ष करून त्याची तड लावावी हे ज्यांना जमले नाही, ज्यांनी पक्ष म्हणजे मीच हीच स्वंयकेंद्रीत स्वार्थी भूमिका ठेवून कधी रिपब्लिकन पक्षाला वाढवले नाही, त्याचा पाया व्यापक केला नाही व जे आज बिनधास्तपणे कुणी पंढरपूरचे विठोबा मंदिर उघडावे म्हणून कासावीस आहेत तर कुणी उत्तर प्रदेशात मायावती, रामाच्या आव्हाणाचा मुकाबला करण्यासाठी बेमूवर्तपणे परशुराम समर्थकाची भूमिका घेऊन बहुजन - रिपब्लिकन राजकारणाचा - व चळवळीचा संवग सत्तेलालसेपोटी मांडणी करून स्वताच्या अपयशी कर्तुत्वाला झाकण्याचे कार्य करीत आहेत अशा दिशाहीन व भ्रष्ट समजूत झालेल्या नेत्यांकडून रिपब्लिकन - बहुजन जनतेने अपेक्षाच न ठेवणे हेच योग्य होय. आठवलेनी आपलेही स्थान या मालीकेत पक्के केले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, व जर त्यांच्याच मतानुसार रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही असेच वाटते तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नावातून रिपब्लिकन शब्दाला हद्दपार करूण दाखवण्याची हिम्मत दाखवावी.


-----------------------


 


"रामदास... तू रामदासच राहा !"नामदार रामदास आठवले सडक ते संसद नियमित चारोळ्या पेश करत त्यांना अधुन-मधून आरोळ्यांची फोडणी देऊन शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांना कुणी फारसं गांभीर्याने घेत नाही; किंबहुना या धावत्या जगात त्याची गरजच नसते. परंतु 'लोकसत्ता'शी बोलताना त्यांनी नुकतीच ओकलेली गरळ प्राशन करत 'लोकसत्ता'ने ती छापली, हे मात्र विचारणीय होय. 'लोकसत्ता' एवढ्यावरच थांबले नाही; तर आंबेडकरवादी चळवळीतील या अदखलपात्र माणसावर चक्क अग्रलेख लिहिला आहे. सफाईदार शब्दच्छलाचा अप्रतिम नमुना म्हणून हा अग्रलेख कायम ध्यानात राहील. असाच एक लेख लोकसत्ताचे तत्कालिन संपादक माधव गडकरी यांनी लिहून रिडल्स प्रकरणाला दिलेली हवा अजूनही आठवते.
'लोकसत्ता'ने काय लिहावं, हा त्यांच्या संविधानदत्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याने त्याची कीव करून अधिक भाष्य करण्याची गरज नसली तरी 'लोकसत्ता'ला रामदासजी आजच का आठवले, हा प्रश्न कायम राहील.
न्यूज व्ह्याल्यू हा पत्रकारितेच्या संहितेमधील एक भाग मानला जातो . आठवलेंच्या चारोळी- -कम-आरोळीमध्ये त्यांना काय व्हॅल्यू आढळलं हे तेच जाणोत.
खरं तर रिपब्लिकन ऐक्य संकल्पनेच्या शिळ्या कढीला फोडणी देऊन ऊत आणणारे आठवले स्वतःच एक कढीपत्ता होत ! खरं तर एके काळचा लढाऊ पॅन्थर 'वापरा आणि फेका' चं उत्तम उदाहरण बनला याचं वाईट वाटतं. विधानभवनाच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नसताना मार्च 1990 मध्ये आठवलेंना शरद पवारांनी थेट कॅबिनेट मंत्री केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी 'लोकमत'मध्ये लगेच स्तुतीसुमनयुक्त लेख लिहिला होता. लेखाचं शीर्षक होतं- "रामदास... तू रामदासच राहा !". लेखाचं शीर्षकच पुरेसं बोलकं असल्याने सामाजिक न्यायमंत्री असूनही ते पुढील पाच वर्षे सामाजिक न्यायावर काही बोललेच नाहीत! !तर हे सारं चालायचंच. आता समाजानेच हंसक्षीर न्यायाचा विवेकी प्रत्यय देत दूध का दूध पानी का पानी केलं पाहिजे असं वाटतं...


चलो #राजगृह की ओर...
अपने सामाजिक राजधानी के ओर...!


समस्त ओबीसी बांधवांचा सखा, मंडल आयोगाचा सर्वेसर्वा,
संविधानाचा सच्चा रक्षक बी.पी. मंडल यांच्या 102 व्या जयंतीच्या समस्त भारतियांना शुभेच्छा !


जय भीम !     जय संविधान !!      जय भारत !!!


@ भीमप्रकाश गायकवाड,
'मूकनायक',   रविराजपार्क, परभणी,  ( 25 ऑगस्ट, 2020)


 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या