दोन सख्या भावांचा सेल्फीच्या नादात आईसमोर मृत्यू
भिवंडी
कामावरी नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे. बुडालेल्या दोन्ही भावांचा मृतदेह शोधण्यात अग्निशमक दलाला यश आलं आहे. मासेमारी करताना सेल्फी काढण्याचा मोह या दोघांना आवरला नाही आणि त्यात या दोघांचा मृत्यू झाला. शहबाज अन्सारी आणि शाह आलम अन्सारी अशी मृतांची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहबाज आणि शाह आलम हे दोघे भाऊ काल (२९ ऑगस्टला) संध्याकाळी ४ वाजता भिवंडी येथील कामवारी नदीत चाविंद्रा पेट्रोल पंपाच्यामागे मासे पकडण्यासाठी आले होते. यावेळी या दोघांची आई देखील त्यांच्यासोबत होती. मासेमारी करताना सेल्फी घेण्याच्या नादात एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. भावाला बुडताना बघून दुसऱ्या भावाने पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. आईसमोर ही दोन्ही मुलं पाण्यात वाहून गेली. आईने केलेल्या आरडाओरडीमुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरूणांनी तातडीने पाण्यात उतरून शोधकार्य सुरू केलं. रात्री साडे सातला शाह आलम यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. या दुर्दैवी घटनेमुळे मिल्लत नगर भागात शोककळा पसरली आहे.
0 टिप्पण्या