जुलै महिना ठरला "विवाह" महिना
ठाणे
कोरोनाच्या महामारीने सर्वच थरावर हाहाकार माजवला. लॉकडाऊनचा फटका विवाह मंडळांना देखील बसला. एप्रिल-मे सुट्टीतील लग्न अनेकांना रद्द करावी लागली. काहींनी ते कसेबसे उरकून घेतले असले तरी बऱ्याच जणांनी ती पुढे ढकलली. असे असले तरीही याच काळात नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात सर्वाधिक विवाह जुलैमध्ये झाले आहेत. महाराष्ट्राबाहेर विवाह केलेल्यांनीही ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणी केली आहे. २३ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत एकही विवाह झाला नव्हता. एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर विवाह नोंदणी सुरू केली असली, तरी लोकांच्या मनात भीती असल्याने या महिन्यात संख्या शून्य होती,
कोरोनाकाळात मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह संपन्न करण्याचे आदेश सरकारने दिले. लॉकडाऊनचे नियम जसे शिथिल होत गेले, तसे रद्द झालेल्या किंवा पुढे ढकललेल्या विवाह सोहळ्यांचे मुहूर्त साधू लागले. या काळात साधेपणाने आणि मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह करण्याचा पायंडा पडला. अनेकांनी तर आनलाइनचा आधार घेतला.ज्या नातेवाइकांना विवाह सोहळ्यासाठी दूर जाणे शक्य नाही, त्यांनी आनलाइन अक्षता टाकून जोडप्यास आशीर्वाद दिले. मोजक्याच लोकांमध्ये विवाह करायचा म्हणून बहुतांश लोक नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे वळू लागले. . लॉकडाऊन असतानाही ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने सांगितले.
0 टिप्पण्या