कोरोनाबाधित महिलेला चक्क रस्त्यावर झाडाखाली लावले ऑक्सिजन
औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील वाळूज परिसरात रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे कारण देत एका महिलेला चक्क रस्त्यावर झाडाखाली ऑक्सिजन लावण्यात आले. वाळूज परिसरातील गरवारे कम्युनिटी सेंटरच्या बाहेर रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार घडला. दोन दिवसांपूर्वीच महिलेच्या पतीचं कोरोनामुळे निधन झालं. याशिवाय महिलेच्या घरातील इतर सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. विशेष म्हणजे कोविड सेंटरमध्ये 40 बेड उपलब्ध असतानाही महिलेला बेड देण्यात आला नसल्याची माहिती मिळाली आहे.
महिलेची प्रकृती ढासळत असल्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली जात होती. तोपर्यंत झाडाखालीच ऑक्सिजन लावल्याची सफाई आरोग्य विभागाने दिली. सदर महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. सोशल मीडियावरुन टीकेची झोड उठल्यानंतर संबंधित महिलेला घाटी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोग्य प्रशासनाकडून झालेल्या या बेजबाबदार कृतीचा नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणामुळेच कोरोनाबाधित आजींना झाडाखाली ऑक्सिजन लावण्याची वेळ आल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, ऑगस्टच्या शेवटी कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार 24 तासांत देशात पहिल्यांदाच 78 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 लाख 42 हजार 734 वर पोहोचला आहे. तर मृत्यू झालेल्यांचा आतापर्यंतचा आकडा 63,498 वर पोहोचला आहे. 24 तासांत 64 हजार 935 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. केंद्रीय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 21. 72 टक्के कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेस आहेत. रिकव्हरी रेट 76.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 12 हजार 878 अॅक्टिव्ह केसेस जास्त सापडल्याचंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. ICMR कडून मिळेल्या माहितीनुसार भारतात शनिवारी 10,55,027 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 78 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या देशात 7 लाख 65 हजार 302 लोकांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.
0 टिप्पण्या