अधिकाऱ्यांनी मुद्दामहून दुर्लक्ष केल्यामुळेच अनधिकृत बांधकाम होऊ शकले- महापौर
ठाणे
रस्त्यावरील खड्डे प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर आता ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामाबाबतही प्रशासनाला विचारणा केली आहे. चार ते पाच मजल्यांच्या इमारती आणि टॉवर केवळ लॉकडाऊनच्या काळात होऊ शकत नाही तर आधीपासून ही बांधकामे सुरु असल्याचा गंभीर आरोप ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी केला आहे. अनधिकृत बांधकामाकडे अधिकाऱ्यांनी मुद्दामहून दुर्लक्ष केल्यामुळेच हे होऊ शकले. यासदर्भात खुलासा करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहे. यासंदर्भात अतिक्रमण विभागाच्या आयुक्तांना पत्र देखील दिले आहे.२७ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या कारवाईनंतर आता कळवा, खारेगांव आणि दिवा परिसरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत प्रशासकीय यंत्रणा चांगलीच अडचणीत आली असून यासंदर्भात महापौर नरेश म्हस्के यांनी देखील अतिक्रमण विभागाकडे या बांधकामांबाबत खुलासा मागवला आहे.
प्रशासनाला दिलेल्या पत्रात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयीच संशय निर्माण केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये चार ते पाच मजल्यांच्या वाढीव बांधकामे झाली असून काही ठिकाणी टॉवरची कामे देखील सुरु असल्याच्या बातम्या प्रसीद्ध झाल्या असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याकडे लक्ष वेधले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तीन ते चार मजल्यांचे बांधकाम आणि काही ठिकाणी तर टॉवरचे बांधकाम देखील सुरु असून केवळ लॉकडाऊनच्या काळात ही बांधकामे होणे शक्य नसून याधीच काही महिने ही बांधकामे सुरु असावी , मात्र पालिका अधिकाऱ्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. यासंदर्भात त्वरित खुलासा करण्याचे निर्देश त्यांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागाला दिले आहे.
कोरोनाच्या काळात पालिकेची जवळपास सर्वच यंत्रणा गुंतल्याने याचा फायदा घेत या काळात अनधिकृत बांधकामे जोमाने सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकणी वाढीव बांधकामे देखील करण्यात आली असून या सर्व ही सर्व बांधकामे बेधडक सुरु असताना प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष कसे झाले असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अगदी कमी कालावधीत कळवा, खारेगांव परिसरात पाच ते सात मजल्यांचे मोठे टॉवर उभारून नागरिकांसाठी जीवघेण्या सापळ्यांची उभारणी झाली आहे. भविष्यात अशी बांधकामे पूर्ण करून त्यांचा अनधिकृत वापर सुरू होणार, हे उघड असूनही हे प्रकार वाढले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
0 टिप्पण्या