कोकणात जाण्याकरिता एस.टी.बसेसची व्यवस्था
ठाणे
कोकणात जाण्याकरिता १३ ते २१ ऑगस्ट अखेर एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र ही सेवा कोविड १९ ची चाचणी निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशांसाठीच आहे. शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या असून प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड चाचणी करणे अनिवार्य आहे. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकांवर बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या बसेस १० ऑगस्टच्या रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असतील. ६ ऑगस्ट पासून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महामंडळानं बसेस सुरु केल्या आहेत. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असून आज अखेर तब्बल १० हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे.
आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोविड – १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही. तसेच प्रवासासाठी स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही असे महामंडळाकडून कळविण्यात आले आहे. योग्य रीत्या सॅनिटाईझ केलेल्या बसेस महामंडळाने प्रवासासाठी उपलब्ध केल्या असून कोविड-१९ साथीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रवाशांना प्रवासामध्ये सामाजिक अंतर ठेवणे आणि तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासामध्ये केवळ महामंडळाच्या अधिकृत ठिकाणीच पिण्याचे पाणी आणि नैसर्गिक विधीसाठी वाहने थांबविण्यात येणार असून प्रवाशांनी त्यांच्या भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करावी अशी विनंती महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या