आता मुंब्रा-कौसा भागातील नागरिकांना मिळणार टीएमटी बससेवेचा अधिक लाभ

आता मुंब्रा-कौसा भागातील नागरिकांना मिळणार टीएमटी बससेवेचा अधिक लाभ


ठाणे
मुंब्रा-कौसा भागातील नागरिकांना टीएमटी बससेवेचा फारसा लाभ मिळत नव्हता. याबाबत बुधवारी ठाणे परिवहन समिती व्यवस्थापकाांंसोबत झालेल्या बैठकीमध्ये शमीम खान यांनी कोपरी ते घोडबंदर दरम्यानच्या प्रवासी थांब्यांची दुरुस्ती; मुंब्रा ते शिळफाटा दरम्यान टीएमटी सेवेकरिता आरक्षित असलेल्या भूखंडांवर आगार निर्माण करणे, मुंब्रा येथे 16 प्रवासी निवारे बांधणे आदी विषय मांडले. तसेच, मुंब्रा- कौसा येथून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईत जात असल्याने मुलुंडपर्यंत बसफेर्‍या सुरु करण्याची आग्रही मागणी केली.  परिवहन समिती व्यवस्थापकांसोबत बैठकीमध्ये त्यांनी भारत गिअर्स ते मुलूंड चेकनाका आणि मुलुंड चेकनाका ते भारत गिअर्स अशा सुमारे 40 फेर्‍यांना मंजुरी मिळवून घेतली आहे.  गुरुवारपासून या फेर्‍यांना सुरुवात झाली आहे.


 ठाणे महापालिका परिवहन समितीचे सदस्य शमीम खान यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीचे सदस्य नितीन पाटील, प्रकाश पाटील, मोहसीन शेख यांनी या भागातील परिवहन सेवा सक्षम करण्यावर भर दिला आहे.  ह्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे सदस्य नितीन पाटील, प्रकाश पाटील, मोहसीन शेख यांनीही आग्रह धरल्याने तत्काळ मंजुरी मिळाली. त्यानंतर परिवहन व्यवस्थापकांनी सदर मार्गाची पाहणी करुन ही बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला.  त्यानुसार, मुलुंड ते भारत गिअर्स मार्ग क्र. 79 या मार्गावर 16 तर भारत गिअर्स ते मुलुंड चेकनाका या मार्गावर 24 बसफेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत.


दरम्यान, टीएमटीच्या बसफेर्‍यांची माहिती सामान्य प्रवाशांना तत्काळ व्हावी, यासाठी शमीम खान यांनी हेल्पलाइन सुरु करण्याची मागणी केली होती. ही मागणीदेखील व्यवस्थापकांनी मान्य केली आहे.  त्याशिवाय, सभापतींच्या दालनाची दुरुस्ती, सदस्यांसाठी दालनाची व्यवस्था,   रेती बंदर मुंब्रा ते  मुंबई या मार्गावर  टी.एम.टी बस सेवा सुरु करणे,  मुंब्रा कोविड19 हॉस्पिटलला परिवहनची रुग्णावाहिका देणे, परिवहन समिती सभापतींची निवड करणे,  परिवहन समितीची सभा आयोजित करणे आदी मागण्यांवरही सकारात्मक प्रतिसाद व्यवस्थापकांनी दिला असून या मागण्या लवकरच मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे.    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या