रस्त्याशेजारचे कचऱ्याचे ढिगारे देत आहेत आजाराला आमंत्रण

रस्त्याशेजारचे कचऱ्याचे ढिगारे देत आहेत आजाराला आमंत्रण

 

शहापूर

शहापूर तालुक्यातील वासिंद शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. दुरावस्था झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ते वासिंद , शेरे, आंबर्जे रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर रस्ता मागील तीन वर्षांपासून अर्धवट राहिल्याने तसेच वासिंद भातसई रस्ता देखील खड्डेमय झाला आहे. त्यामुळे वासिंदच्या संतप्त नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच जागोजागी रस्त्याच्या कडेला वासिंद ग्रामपंचायतने ठेवलेल्या कचऱ्याच्या कुंड्या शेजारी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे साठले आहेत त्यामुळे कोरोना महामारीत ग्रामपंचयतकडून आजाराला आमंत्रण दिले जात असल्याचे दिसून येत आहे. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

 

       दुरावस्था झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ते वासिंद , शेरे, आंबर्जे रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थे अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला असून यामध्ये  काँक्रीटीकरण लांबी १.८५० की.मी. होती.  कामाची एकूण किंमत ९ कोटी ३६ लाख रुपये असून कार्यारंभ दिनांक २९ एप्रिल २०१७ होती. कामाचा कालावधी १२ महिने होता तर दोष दायित्व कालावधी ५ वर्षे आहे. हे कंत्राट ठेकेदार सौरभ कन्स्ट्रक्शन, कल्याण  यांना देण्यात आले होते.   

या ठेकेदाराने भातसा नदीवरील पूलापासून काही मीटर अंतर अर्धवट सोडून पाटील नगर पर्यंत रस्त्यावर काँक्रीटीकरण केले, मध्येच १० मीटर अंतर सोडून विवेकानंद नगर मधील गडेंचे घर ते खाटीक गुरुनजींचे घर इथपर्यंत काँक्रीटीकरण केले परंतु पुढे अंदाजे ४० मीटर अंतर सोडून काँक्रीटीकरण केले ते वासिंद पूर्व- पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे पुला पर्यंत. मध्यनंतरी जून अखेरीस या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली मात्र एकाच महिन्यात हा रस्ता जैसे थे झाला असून अनेक खड्डे पडले आहेत. तर वासिंद भातसई रस्त्याची सुद्धा चाळण झाली असून याच रस्त्याने  गणेश घाटावर गणपती विसर्जनासाठी जावे लागत असल्याने सालाबादप्रमाणे चालूवर्षी देखील वासिंद मधील गणपती आगमन व विसर्जन खड्ड्यातून  होणार असेच दिसून येत आहे.

 


 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या