Top Post Ad

माझा नमीन र धरती री मातालं

माझा नमीन र धरती री मातालं


नियतकालिकांच्या संदर्भात एक अभ्यासक म्हणतो, भारतातील अनेक प्रांतात पसरलेल्या माझ्या अगणित सहकाऱयांच्या मनात आदिवासी प्रजेबद्दलचा असलेला जिव्हाळा म्हणजे ही नियतकालिके होत. कारण शतकानुशतकांचा अत्याचार , अन्याय आणि उपेक्षेचा सामना करता करता वाचा हरवून बसलेल्या, मुक्या बनत गेलेल्या आदिवासीला आपला चेहरा आणि आपला आवाज देण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते नियतकालिकांनी होय. त्यांची ब्रीदवाक्येची विचार करायला लावणारी होती. उदा. `कष्टकरी जनता, भूषण भारता, वंदन करितो पददलिताः' 


सर्वप्रथम चळवळींच्या माध्यमातून आदिवासी समाजसेवक एकत्र आले व प्रचार करताकरता त्यांनी नियतकालिकांचाही विचार केला. 1980-85 सालापासून आदिवासींच्या नियतकालिके निर्मितीला जोर चढला आणि आत्मोद्धाराचा मार्ग दाखविण्यासाठी आदिवासींच्या नियतकालिकांच्या संख्येतही भर पडत गेली. हिंदू धर्मातील चालीरीती, जातिव्यवस्था, दुष्ट रुढी, अनिष्ट पद्धती यांनी आदिवासींना शतकानुशतके शैक्षणिक, ार्थिक आणि मानसिक गुलामगिरीत जखडून ठेवले होते. या गुलामगिरीतच ते मुकपणे अपमान, अवहेलना, दास्य, गरीबी यांनी ग्रासलेले जीवन कंठत होते.  


अशा या सर्व आदिवासींच्या व्यथा समाजाच्या वेशीवर टांगण्याचे आणि त्यांना त्यांच्या हक्कासाठी, उन्नतीसाठी जागृत करण्याचे कार्य या नियतकालिकांनी हाती घेतले आणि हिंदू धर्मातील प्रस्थापितांचा त्यांनी निषेध केला. आदिवासींच्या समस्यांची विविधांगे आणि उन्नतीविषयी मतांची अनुकुलता प्रतिकलता अशी चर्चा या नियतकालिकांच्या रकान्यांतून झाली. महाराष्ट्रभर चाललेल्या आदिवासींच्या चळवळीचे साद-पडसाद त्यातून चांगलेच उमटले आणि ह्या चळवळींना यशस्वी करण्यात त्यांचा वाटा अतुलनीय आहे, हे ठामपणे म्हणता येऊ लागले. अशा नियतकालिकांची नावे उदा. `आदिवासी टाइम्स',` सा. क्रांति पत्र', `ट्रायबल वेलफेअर', `आदिवासी संघर्ष', `कालतरंग', `आदिवासी संशोधनपत्रिका', `नाहारकंद', `जागृती',` एकजूट', `महासंघ वार्ता', `वनराज', `जव्हार वार्ताहार', `सा. गोंडवाना कोईतूर', `जगोराईताड', `शब्दमशाल', `महाराष्ट्र आदिवासी दर्शन', `आदिवासी भारत', `तारपा', `बलवान सह्याद्री', `आदिरंग', `एकलव्य प्रेरणा',` देवधनू', `मर्मस्पर्श', `मूलनिवासी', `गोंडवाना', `रानव्यथा', `हुंकार', `कोकणा दर्पन', `आदिवासी नगारा', `ढोल', `हाकारा', `गोंडवाणा संदेश', `जयसेवा' आणि `फडकी' अशी कितीतरी साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, षण्मासिके, त्रैमासिके,  वार्षिक, स्मरणिका या काळात उदयाला आली.....


या  नियकालिकांपैकी बरीच नियतकालिके केवळ संपादकांच्या नेतृत्वाखाली निघत आहेत. केवळ एकाच व्यक्तीच्या आधाराने चाललेल्या नियतकालिकांना म्हणावे तेवढे आयुष्य लाभणे तसे कठीणच. अशी बरीच नियतकालिके चालवणारे सां. स्वतच्या खिशाला झळ पोहचवून फक्त समाजोन्नतीसाठी त्यांनी केलेला स्वार्थ-त्याग हा आदिवासी नियतकालिकांच्या इतिहासातील गौरवपूर्ण घटना म्हणारी लागेल. अशा संपादकांना धनवंतांचा, जाहिरातदारांचा, श्रीमंतांचा पाठींबा असता तर एक दोन वर्षातच बंद पडण्याचे दुर्भाग्य या नियतकालिकांच्या नशिबी आले नसते.  


आजही वणवण भटकणारा, जंगलात काही मिळते का याचा शोध घेणारा आदिवासी मधमाशांचे पोळे शोधण्यासाठी तो संपूर्ण दिवस भटकंती, सायळ, घोरपड, खेकडे, रानकोंबडी, ससा,  खार या प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्याला तासन्तास पळावे लागत असले तरी 21 व्या शतकातही त्याने काही आपला ठेका सोडला नाही. त्याच्यावर कितीही संकटे आली तरी निसर्गानेच जणू काही त्याला कवेत घेतल्यामुळे तो बिनधास्तपणे येणाऱया संकटांचा सामना करतो आहे. जंगलातून अनेक औषधी वनस्पती मिळत असल्यामुळे तो त्याच्यावर प्रयोग करू पाहत आहे. जंगलातील मोहाची फुले गोड व रसाळ असतात. परंतु प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली की त्याने भूल चढते. पोटात काहीच नाही,  कावळे ओरडतात. मग अशावेळी स्त्रिया व पुरुष मोहाची फुले खाऊन काही तास भूल चढवून घेतात.  


आदिवासींना अन्नातून विषबाधा होणे हा प्रश्न काही नवा नाही. 15 ऑगस्ट 2007 या भारताच्या स्वातंत्र्यदिनी  अमरावती येथे अन्नातून विषबाधेने अनेक गरीब आदिवासी लोकांचा मृत्यू झाला, ही भयंकर शोकांतिका नाही का? अहो! ज्यांना स्वातंत्र्य कधीच मिळाले नाही, अशांचा मृत्यू स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तोही अन्नाच्या विषबाधेतून व्हावा? यापेक्षा अजून कोणते महाभयंकर दुःख असू शकेल? अशा विषबाधेने मरण पावलेल्या दुर्दैवी माणसांच्या सामुदायिक अंत्ययात्रा पाहूनही सरकारचे विषण्ण होत नाही. काय म्हणावे अशा सरकारला?  


आदिवासींबाबतची अशी कितीतरी प्रकरणे सांगता येतील? या समाजाची खरी स्थिती न्याहाळली तरी लक्षात येईल. मुक्या जनावरांना अन्न, पाणी मिळेल पण आदिवासी, दलितांना मिळेलच याची शाश्वती नाही. एवढेच कशाला, सरकारच्या गोदामात कितीही वर्षांचे धान्य साठवून ठेवले जाते. त्याला किड लागते, ते उतरून जाते, शेवटी एक दिवस फेकून द्यावे लागते, परंतु गोरगरीब आदिवासींना ते मोफत तर जाउद्याच पण सवलतीच्या दरात विकावे असे सरकारच्या मनात कधीही येत नाही. निवडणुका जवळ आल्या की स्वार्थी पुढारी मोठ्या उड्या मारत लंब्या चौड्या गप्पा हाणत आदिवासींच्या थेट झोपड्यांपर्यंत पोहचतात. अशावेळी कंबरेपासूनच काय पण अक्षरश लोळण घेऊन नमस्कार करायलाही त्याला अजिबात शरम वाटत नाही.  


नेहमीच सोबतीला पंचपक्वान्नांची मेजवानी असणाऱयांच्याही चुली पेटत नाहीत आणि आदिवासींच्याही बऱयाचदा चुली पेटत नाहीत. पण या दोघांत फरक एवढाच की, श्रीमंतांना रोज घरचे जेवण कसेही बनवले तरी गोड लागत नाही. कारण त्यांना नेहमी बदल हवा असतो. म्हणून ते घरची चूल बंद ठेवून महागड्या पंचतारांकित हॉटेलात जाऊन अपचन होईल तोवर खातात. आदिवासींचे तसे कसे असेल? जवळ काहीच नाही, मडके, गाडगे रिकामे झाल्याने त्यांच्या चुली पेटत नाहीत. त्यामुळे त्यांना उपाशीपोटीच रहावे  लागते. रोज अन्नात बदल करणारे गर्भश्रीमंत आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नाना युक्ती शोधत असतात. त्यांना कसली चिंता असणार? आदिवासी जनतेला अन्नाचे तर सोडाच  पण पाणी मिळविण्यासाठीही मैलोन्मैल कसरत करावी लागते. या बांधवांच्या पुटत्या तुटक्या घागरी कधी भरणार आहेत का? शहरातील मस्तवाल लोक स्पर्धेच्या नावाखाली `स्विमिंग टँक' मध्ये मनमुराद डुंबत आहेत. ही मोठी तफावच सरकारच्या ध्यानी कधीच येणार नाही का? 


स्थापत्यशास्त्राचा आणि वैद्यक शास्त्राचा पाया घालणारा पहिला हक्कदार आदिवासी आहे. तसाच मद्याचा शोधही आदिवासीनेच लावला, म्हणजे पहिला इंजिनियर आणि डॉक्टर असण्याचा मानही आपोआपच आदिवासीकडे जातो. मात्र त्याने लावलेल्या शोधाची समस्या त्यालाच रसातळाला नेईल असे कधी त्याला स्वप्नातही वाटले नसेल. पूर्वी आदिवासीची दारू म्हणजे नुसतीच ताडी असे. ती फार मादक तर नसेच, उलट तिच्यात पोषणाचा बराच अंश असल्याने आदिवासींच्या दृष्टीने फायद्याचे होते. पण आज काळ्या गुळाने आणि नवसागराच्या माऱयाने अनेक वाड्या-पाड्यांनवरच्या आदिवासींना झुलवत ठेवले आहे. आज `आदिवासी म्हणजे दारु' आणि `दारू म्हणजे आदिवासी' असे चुकीचे समीकरण केले जात आहे. एवढेच कशाला, 1938 साली तत्कालिन ब्रिटीश शासनाने जॉन सिमिंग्टन या वरिष्ठ अधिकाऱयाची आदिवासींच्या विविध समस्यांची पाहणी करण्यासाठी नियुक्ती केली होती. पाहणी केल्यावर त्याने आपल्या जे नमुद केले आहे ते विचार करायला लावणारे आहे. सिमिग्टन म्हणतो, ``दे ड्रिंक अॅज अ रेस'' थोडक्यात दारू त्याचे विश्व व्यापून दशदिशांत पुरून उरली आहे. अशा आदिवासींची लग्ने दारुशिवाय होत नाहीत, जातपंचायत दारूशिवाय बसत नाही, मर्तिकापूजाही दारू शिवाय पार पडत नाही. म्ह णजेच मूल जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत दारू त्याला सोडत नाही.  


समाज कोणताही असला तरी त्याचा सुधारणेचा पाया `शिक्षण'  हाच आहे. आपल्या देशाला शिक्षणाची फार जुनी परंपरा असली तरी आजही अज्ञान आणि दारिद्र्य ही जणूकाही आदिवासींच्या मानगुटीवर बसलेली भूतेच होत. शिक्षणाने आपण काय साध्य करणार आहोत? याचे उत्तर आदिवासींना आजही न मिळाल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहिले आणि दुसरे म्हणजे आई-वडिल मोलमजुरीसाठी जातात तेर्हा तान्हूल्याला सांभाळायला कोणीच नसते. अशा आई-बाबांना शिक्षणापेक्षा आपल्या रोजीरोटीचीच चिंता असते. जिथे रोजीरोटीचा प्रश्न आहे तिथे शिक्षण हे दुय्यम दर्जाचे समजले जाते. अशा कुटुंबातील शिक्षण न घेण्याची कारणे त्यांच्याच तोंडून ऐकलेली बरी ती अशी 1) शिकायला जायचजा... आय-बा मजुरीने जातात तवा धाकल्या बाबल्याला सांभाळणार कोण? म्हणू आठ वर्षांचा पांडू व दहा व,ा&ंची राणू घरीच बाळगी म्हणून राहातात. 2) शाळत जाऊन शान काय करणार? पोटाला दोन घास कोण घालणार? अशी कितीतरी दारिद्र्य व अज्ञानमूलक कारणे दिसून येतात.  
सर्वात वाईट म्हणजे आदिवासींची नको तेवढी टिंगल, टर उडवली जाते. बायकांच्या जेवणाविषयीच्या आस्वादक चर्चेत ``एवढ्या लवकर जेवायला आम्ही काही आदिवासी आहोत का? '' असे संवाद नेहमी ऐकायला मिळतात. एखादा माणूस बसमध्ये लवकर चढत नसेल तर बस कंडक्टर त्याला ओरडतो, ``आदिवासी आहेस का? तुला काहीच कसे समजत नाही?'' वृत्तपत्रात एक कार्टून आले होते त्यात लिहिले होते 
खबरदार! या पुलाववून कोणी जाल तर? 
कारण हा पूल आदिवासींच्या पैशातून बांधला आहे'' 
मग त्यांची परवानगी नको का घ्यागा ? आता पुलाचे आणि आदिवासींचे काही देणे-घेणे आहे का ? पण थट्टा करण्याची अशीही रेंड ओलांडली जाते. याचा अर्थ पृथ्वीवरील सर्व दोष, सर्व वाईट गोष्टी यासाठी पर्यायी समानार्थी शब्द म्हणजे आदिवासी  असा तर खुळा गैरसमज नसेल करून घेतला? एक मात्र खरं... आदिवासींच्या दोषांची जेवढी चर्चा होते. तेवढी गुणांची का बरे होत नाही? 


आदिवासींना रागरागिणीचे अजिबात ज्ञान नसते. असे काही उपटसुंभ मोघमपंचे ओरडतात. मात्र त्यांच्या गायनात मेघ-मल्हारचे स्वर हजेरी लावून जातात, इतकेच काय पण संगीत-रत्नाकराच्या संकेताची आठवणही करून देतात. अशा आदिवासींनी एकदा गायनाला सुरुवात केली की मेघ आणि वरूण कितीही त्यांच्या वैयक्तिक कार्यात मग्न असले तरी त्यांना पावसाची बरसात करावीच लागते. मग पाऊस आल्यावर त्यांचा आनंद गगनात मावत नाही. ते अन्नधान्य पिकविणाऱया मातेला मनोभावे वंदन करतात... 
``माझा नमीन र धरती री मातालं 
माझा नमीन र पानिया देवाला'' 


हे आदिवासींचे भूमिवंदन म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून मला वाटते ते `वंदे मातरम् 'च असले पाहिजे.  
अशा कितीतरी व्यथा, वेदना, विवंचना आणि थोड्या बहुत अंशाने चांगुलपणा ह्या गोष्टी नियतकालिकांत ज्या आल्या, त्या केवळ आदिवासींच्याच आहेत असे नाही तर समाजाच्या विविध स्तरांतील प्रतिबिंब त्यात पडलेले दिसते, एवढे मात्र निश्चित.  
प्रा.तुकाराम बारकू रोंगटे 
पुणे विद्यापीठ टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com