Top Post Ad

नवी शिक्षण निती आणि मोदींचे आमंत्रण !

नवी शिक्षण निती आणि मोदींचे आमंत्रण !
ज्ञानेश वाकुडकर

शेवटी एकीकडे राम मंदिराचा शिलाण्यास आणि मोदी सरकारची नवी शिक्षण निती यांचा मुहूर्त एकाच पंधरवाड्यात सापडला. यानंतर कदाचित २०२४ च्या निवडणुकीच्या आधी मंदिर पूर्ण करतील किंवा प्रभू रामचंद्राचा वनवास आणखी लांबवतील हे पंतप्रधान मोदी यांच्या शिवाय कुणीही सांगू शकणार नाही.  पण नवी शिक्षण निती मात्र देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. देश मागे जाणार की पुढे, हे शिक्षण धोरणातून ठरत असते. अर्थात अशी निती वेगवेगळी सरकारं बनवतच असतात. आधी मोठमोठ्या घोषणा केल्या जातात आणि नंतर त्याच कागदांच्या पुंगळ्या करून सोयीस्कररीत्या उपयोगात आणल्या जातात. जनतेला कळत सुद्धा नाही. तात्पर्य काय की, असली धोरणं केवळ जनतेला गुदगुल्या करण्याच्या कामाची असतात.


या नव्या धोरणामध्ये काही गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात. उदा. सहावी पासून व्यावसायिक शिक्षण, वेगवेगळे विषय निवडण्याची मुभा, एम. फिल. रद्द करणे, शिक्षणावरील खर्चाचे बजट वाढविणे वगैरे वगैरे..! असल्या गोष्टी म्हणजे 'थाली ठोको' संप्रदायासाठी नवा धंदा आहे. आपण हुरळून जाण्यात अर्थ नाही. अशा प्रकारची 'पुडीबाज निती' आणि राजकीय पक्षांचे निवडणूक जाहीरनामे, ह्यात फारसा फरक नसतो. त्या जाहीरनाम्यातील घोषणांचं पुढं काय होते ? साप आणि मुंगसाच्या लढाईतील गारुडी हातवारे करत सांगतो त्याप्रमाणे, मुंगसानं सापाचे केलेले तुकडे आजपर्यंत कुणी पाहिले आहेत का ? आणि नंतर तेच तुकडे गारूड्यानं मंत्र सामर्थ्यानं जोडलेले कुणाला दिसलेत का ?  बहुधा, मागच्या जन्मातले सारे गारुडी या जन्मात सद्याच्या केंद्र सरकारमध्ये सामील झाले असावेत ! एकापेक्षा एक नग आहेत !  त्यांच्याकडे सापांची अंडी उबवण्याची जुनी फॅक्टरी आहे. शिवाय बाहेरचे आणि विविध रंगाचे साप पाळण्यातही ते वस्ताद आहेत. सापही त्यांचेच, मुंगुसही त्यांचेच. आपण फक्त गारुड्याचा खेळ पहायचा. 'बच्चेलोग ताली बजाव' म्हटलं, की टाळी वाजवायची ! 
-
आपण मुलगी पाहायला जातो, तेव्हा नीटनेटक्या कपड्यात, छानसा मेकअप वगैरे करून अतिशय शालीन पद्धतीनं मुलीला दाखविण्याची पद्धत आहे. त्यात काही चूकही नाही. प्रत्यक्षात थोडाफार फरक असणार, हे आपणही गृहीत धरूनच असतो. पण काही लोक खानदानी बिलंदर असतात. इतर गोष्टी, चमक दमक, पाहुण्यांची वरवर करणे, बडेजाव, गाडी घोडे, भविष्याचे पॅकेज, मुलीचे कपडे, दागिणे याचा एवढा मारा करतात, की तेव्हा दाखवलेली मुलगी आणि नंतर घरी आणलेली मुलगी, एकच आहे यावर विश्वास ठेवणं कठीण जाते ! काही तर बिचारे पहिल्याच रात्री वेडे होऊन जातात. २०१४ ला घरी आलेली मुलगी, ही अशी दुसऱ्या प्रकारातली आहे. २०१९ नंतर तर ती आणखीच भयानक दिसायला लागली आहे. बापाला जाब विचारायला जावं, तर तो सापडत नाही. पत्ताच कुठं नोंदवला नाही. भारतीय लोकशाही सोबत अशा तऱ्हेचा विश्वासघात या आधी कधीही झालेला नव्हता !

अशा पार्श्वभूमीवर ही नवी शिक्षण निती जाहीर झालेली आहे. मेकअप मध्ये कुणाला कितीही आकर्षक वाटत असली तरी तिच्या बापांचा खानदानी इतिहास कपट, कारस्थान, विश्वासघात असाच आहे, हे विसरता येणार नाही. मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास' याचं काय झालं ? ( बाकी 'सब' जाऊ द्या..पण खुद्द अडवाणी सद्या काय करतात ?), 'न खाऊंगा, न खाने दुंगा'चं नेमकं काय झालं ? 'देश नहीं बिकने दुंगा' कुठल्या भंगारात जाऊन पडला आहे ? किती कंपन्या अजून विकायच्या बाकी राहिल्यात ? 'मेक इन इंडिया' च्या पुड्या सोडत सोडत राफेल मधून  'हाल' लाच बाहेर कसं काढलं गेलं ?  हे सारं समजून घ्यायला हवं. शिक्षणाच्या निमित्तानं जे काही सिल्याबस तयार करण्यात येणार आहे, ते महत्त्वाचं असेल. कोरोना पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम कमी करतांना लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्याचा इतिहास, सामाजिक सुधारणांचा इतिहास अशा प्रकारच्या गोष्टी या सरकारनं मुद्दाम वगळल्या आहेत. त्यावरून नव्या शिक्षण नीतीचा हा वर्णवादी अजगर भविष्यात कुणाकुणाला गिळणार आहे, याचा सहज अंदाज येतो.  शिक्षणावरील बजट वाढलं, ही आपल्याला वरवर चांगली गोष्ट वाटत असली, तरी उद्या जादू टोना, चमत्कार, कर्मकांड, दैववाद, पुराणातली वांगी, असल्या भाकड गोष्टीवर तो उडवला जाणार नाही, याची कुणी खात्री देवू शकतो का ? विज्ञानाला मातीत घालणारं शिक्षण देणं हे या लोकांचं मुळ धोरण आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. शेवटी ते आपल्या औकातीवरच येणार याबद्दल संशय नाही. तरीही आपण नुसते चर्चाच करत बसणार आहोत, की काही कृती करणार आहोत, हा खरा प्रश्न आहे. त्यावरच उद्याचं भवितव्य अवलंबून आहे, एवढं लक्षात ठेवा.

आपण त्यांच्या धोरणावर कितीही टीकाटिपणी केली, तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. सत्ताधारी आपले ऐकणार आहेत का ? आणि ते ऐकणार नसतील तर त्यासाठी आपल्याकडे काही पर्यायी योजना आहे का ?  याच विषयावर लोकजागर अभियान कार्य करत आहे. कृपया आमचा अकरा कलमी_कार्यक्रम समजून घ्यावा, अशी विनंती आहे.

मित्रांनो, कृपया परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या. ठोस आणि विचारपूर्वक कृती करा. सध्याच्या प्रस्थापित राजकीय पक्षांकडे केवळ शिक्षणच नव्हे, तर कोणत्याही बाबतीत ठोस आणि स्पष्ट धोरण नाही. त्यांच्या नेत्यांचे सारे हितसंबंध एकमेकात गुंतलेले आहेत. ते गरिबांच्या, तुमच्या - आमच्या मदतीला धाऊन येणार नाहीत. शेवटी सारे सख्खे मावसभाऊ आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काही चांगलं, सकारात्मक व्हावं असं वाटत असेल, स्वत: काही चांगलं करावं, असं वाटत असेल, तर अशा पक्षापासून त्वरित वेगळे व्हा. उगाच भ्रमात राहू नका.

तसे, हे सारे नंतरचे प्रश्न आहेत. पण सद्या कोरोना मुळे शाळा, कॉलेजेस बंद आहेत. ऑनलाईन वर्गाचा घोळ सुरू आहे. संचालक विद्यार्थ्यांना फी साठी तगादा लावत आहेत. खाजगी किंवा विना अनुदानित शिक्षक / प्राध्यापकांचे हाल आहेत. हे एक सार्वत्रिक संकट आहे. यातून मार्ग काढणं गरजेचं. पण तेवढंच जिकिरीचंही आहे. या विषयावर आम्ही लोकजागरची निती आणि पुढील दिशा ठरवत आहोत. त्या संदर्भात इच्छुक व्यक्तींनी खालील नंबरवर संपर्क साधावा. आपल्या समस्या आणि सूचना सांगाव्यात. सक्रिय होऊन सहकार्य करावं.. अशी विनंती आहे !


• प्रतिभा बुक्कावार - 9325589603  प्रदेश अध्यक्ष, लोकजागर पार्टी, महाराष्ट्र 
• समीर देसाई - 9004048002  संयोजक, मुंबई प्रदेश, लोकजागर
• रविंद्र रोकडे - 9773436385 संयोजक, कोकण विभाग, लोकजागर 
• डी. बी. पडिले - 9890585705  सचिव, महाराष्ट्र प्रदेश,( मराठवाड़ा विभाग )
• मनीष नांदे - 9545025189 सचिव, महाराष्ट्र प्रदेश, ( विदर्भ विभाग )
• राजकुमार डोंबे - 7378583559 संयोजक, पश्चिम विभाग 
• अंबादास गावंडे - 9975374566 प्रदेश अध्यक्ष, युवा लोकजागर

महाराष्ट्रात नवा दूरदर्शी पर्याय उभा व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. तशी आम्ही सुरुवात केली आहे. आमचे सारे मुद्दे, आमचा अकरा कलमी कार्यक्रम आपणही आपल्या कसोटीवर तपासून बघा. आपापल्या पक्षांना देखील तपासा आणि विचारपूर्वक बाहेर या. ठामपणे निर्णय घ्या ! सर्व विचारवंत, बुद्धिजीवी, लेखक, कवी, पत्रकार, विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, नेते यांनीही गांभीर्यानं विचार करण्याची ही वेळ आहे. निव्वळ टीकाटिपणी करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची ही वेळ आहे. सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आहे.
बाकी आपण सर्व सुज्ञ आहातच !
तूर्तास एवढंच..


ज्ञानेश वाकुडकर, 
अध्यक्ष-  लोकजागर अभियान
संपर्क - 9822278988 /  9325589603 /  8055502228 / 9004397917 / 9545025189टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com