प्रभागातील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्याचे ठामपा आयुक्तांचे आदेश
४ सप्टेंबरपासून होणार जोरदार कारवाई
ठाणे
ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांची प्रभाग समितीनिहाय यादी येत्या सोमवारपर्यंत तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी दिले असून या सर्व अनधिकृत बांधकामांवर ४ सप्टेंबरपासून जोरदार कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, कोरोना कोविड १९ च्या चाचणींची संख्या वाढविणे आणि मालमत्ता कर वाढविणे याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी आज सर्व उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत बोलताना महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी प्रत्येक सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या प्रभागामधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करून ती यादी सोमवारपर्यंत आयुक्त कार्यालयामध्ये सादर करण्याचे आदेश दिले. सदरची यादी प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रभागांमध्ये एकाचवेळी निष्काषणाची व्यापक मोहिम ४ किंवा ५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यासाठी प्रभाग समिती स्तरावरील सर्व यंत्रणा कार्यान्वित करावी व त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे सांगितले.गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची संख्या कमी झाली आहे ही चांगली बाब असली तरी गाफिल राहून चालणार नाही असे स्पष्ट करून महापालिका आयुक्त डाॅ. शर्मा यांनी यापुढे मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढावी यासाठी सहाय्यक आयुक्तांनी प्रयत्न करावेत असे सांगितले. यामध्ये शिथीलता खपवून घेतली जाणार नाही असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
0 टिप्पण्या