कोविडचे सर्व नियम पाळून राज्यात एसटी सेवा सुरू करणार- वडेट्टीवार
चंद्रपूर
कोविडचे सर्व नियम पाळून राज्यात एसटी सेवा सुरू करणार येणार असून एका एसटी बसमध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी नेऊ न देता ही सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. सोबतच राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून सुरू करण्याची तयारीही सरकार करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून व्यवसाय आणि व्यापार ठप्प आहे. अशात आता राज्य अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनेक बाबींमध्ये नागरिकांना सूट देण्यात आली आहे. अशात आता राज्यात आंतरजिल्हा एस. टी. बस सेवा आणि कोचिंग पुन्हा सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
कोरोना संक्रमणाचा सर्वोच्च कालावधी पुढे येऊ शकतो. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये चंद्रपुरात उपचारासाठी रुग्णालयात जागाच नाही अशी स्थिती चंद्रपूरमध्ये होऊ नये यासाठी ३०० ते ४०० बेडच्या तात्पुरत्या स्वरूपातील कोवीड हॉस्पिटलची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही वडेट्टीवार यांनी दिले. ध्वजारोहणानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेचा आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते व इतर अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये अनेक शहरांत पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याची परिस्थिती येऊ शकते. जिल्ह्यामध्ये घुग्घुस, बल्लारपूर, गोंडपिंपरी याठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असून तातडीने लॉकडाउन करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सोमवारपासून याबाबत नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचे नियम काटेकोर पद्धतीने पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश दिलेत.
0 टिप्पण्या