Top Post Ad

उपविभागीय पोलीस अधिकारीसह पत्रकार व बिल्डरवर अट्रोसिटी  दाखल

आदीवासी इसमाला धमकविल्याने उपविभागीय पोलीस अधिकारीसह पत्रकार व बिल्डरवर अट्रोसिटी  दाखल

 


 

शहापूर

एका आदिवासी इसमाला जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे ठार मारून गायब करण्याची धमकी दिल्याने  शहापूर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यान्वये शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत, पत्रकार सनी उर्फ ओमकार पातकर तसेच बिल्डर आकाश सावंत व शिवतेज सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याने शहापूर तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

 

शहापूर तालुक्यातील मौजे चांदरोटी येथील रहिवासी हरिश्चंद्र बांगो खंडवी (३३) हे आदिवासी म ठाकूर समाजाचे असून आपल्या कुटुंबासह राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. शहापूर तालुका हा पेसा कायद्याच्या अंतर्गत आहे. सन २०१६ साली मौजे कोठारे तालुका शहापूर येथे राहणारे बेबीबाई मारुती खंडवी, जया विलास दरोडा, अनिबाई फसाळे, सुरेश बाळू वेहळे यांची कोठारे हद्दीतील जमीन सर्वे नंबर ११९/२,३,४ व इतर जमीन खरेदी विक्रीचा साठे करारनामा केला होता. सदर जागा शासनाने प्रस्तावित मुमरी धरणात संपादित करणार होते व त्याचा मोठ्या प्रमाणात मोबदला मिळणार असल्याचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत शहापूर यांना माहिती मिळाली होती. त्या कारणास्तव सावंत तसेच सनी उर्फ ओमकार पातकर, आकाश सावंत व शिवतेज सावंत यांनी हरिश्चंद्र खंडवी यांच्याकडे पैशाची मोठ्या प्रमाणात मागणी करून वेळोवेळी धमकवित असल्याने त्यांच्या सततच्या मागणीला कंटाळून 

हरिश्चंद्र  खंडवी यांनी पोलीस अधीक्षक अँटिकरप्शन ब्युरो ठाणे यांच्याकडे २२ मे रोजी लेखी तक्रार दाखल केली. त्याचा तपास श्रीमती कुलकर्णी उपअधीक्षक अँटिकरप्शन ब्युरो ठाणे या करत आहेत. 

 

दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजी हरिश्चंद्र खंडवी यांच्यावर किन्हवली पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत यांना माहीत असल्याने दिलीप सावंत यांनी सनी उर्फ ओमकार पातकर, आकाश सावंत व शिवतेज सावंत यांनी सनी उर्फ ओमकार पातकर यांचे करवी हरिश्चंद्र खंडवी यांना फोन करून उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत यांचे कार्यालयात बोलविले असता दिलीप सावंत यांनी हरिश्चंद्र खंडवी यांना किन्हवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून तुझी सहीसलामत सोडवणूक करतो त्याकरिता 

हरिश्चंद्र खंडवी यांना मिळालेल्या मुमरी धरण जमिनीच्या मोबदल्यातील खंडवी यांच्या बँक खात्यात जमा असलेल्या रक्कमेतून मोठ्या प्रमाणात रक्कमेची मागणी केली. जर हरिश्चंद्र खंडवी यांनी मोठी रक्कम देण्यास नकार दिल्यास हरिश्चंद्र खंडवी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करील अशी धमकी दिलीप सावंत यांनी दिली. तसेच मी उपविभागीय पोलीस अधिकारी असल्याने तुला आदीवासीला कुठे गायब करिन त्याचा थांगपत्ता लागणार नाही. खंडवी यांनी दिलीप सावंत यांना घाबरून प्रतिउत्तर न देता त्यांच्या कार्यालयातून निघून गेले. नंतर काही दिवसांनी शहापूर तालुक्यातील बांधकाम व्यवसायिक आकाश सावंत, शिवतेज सावंत यांनी त्यांच्या चेरपोली शहापूर येथील कार्यालयात हरिश्चंद्र खंडवी यांना बोलावून ठाकरा, माकडा अशी जातिवाचक शिवीगाळ करून आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत यांनी मागणी केलेल्या रक्कमेची पूर्तता लवकरात लवकर कर नाहीतर आमचेही गुंडांशी संबंध आहेत. तुला कुठे गायब करू ते सुद्धा कळणार नाही अशी धमकी दिली. तर अनेकवेळा समक्ष भेटल्यावर तसेच वारंवार फोन करून धमकी देत होते. 

 

दिनांक २० मे २०२० रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत, पत्रकार सनी उर्फ ओमकार पातकर, बांधकाम व्यावसायिक आकाश सावंत व शिवतेज सावंत यांच्या विरुद्ध खंडणी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल होण्याकरिता पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, पोलीस अधीक्षक अँटिकरप्शन ब्युरो ठाणे यांच्याकडे तक्रारदार हरिश्चंद्र खंडवी यांनी लेखी तक अर्ज दाखल केले होते.  हरिश्चंद्र खंडवी यांच्या अर्जातील तक्रारीनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न झाल्याने दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ९.५५ वाजता शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत, पत्रकार सनी उर्फ ओमकार पातकर, बांधकाम व्यावसायिक आकाश सावंत व शिवतेज सावंत यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ कलम ३(१) (१०) तसेच भारतीय दंड संहिता १८६० कलम ५०४, ५०६, आणि ३४ या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहापूर पोलीस निरीक्षक घनश्याम रामचंद्र आढाव हे करीत आहेत.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com