स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतर देखील ठाकूरपाड्यातील ग्रामस्थांना वाहतुकीचा रस्ताच नाही

ठाकूरपाडा एक भयावह सत्य 

चार-पाच पिढ्यांपासून येथे रस्ताच नाही ; स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतर देखील उपेक्षितच

 


 

शहापूर

शहापूर तालुका धरणांचा तालुका म्हणून परिचित असून संपूर्ण मुबईची तहान भागवत आहे. त्यापैकी एक तानसा धरण. या धरणातून मुंबई महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. तानसा पाईपलाईनच्या लगत असलेल्या अनेक वाड्यावस्त्यांचा विकास झाला. मात्र अघई जवळ असलेल्या १०० टक्के आदिवासी असलेल्या ठाकुरपाडा या वस्तीकडे लोकप्रतिनिधींचे स्वातंत्र्याच्या ७३ वर्षाच्या कालखंडात लक्षच गेले नाही.  मागील चार ते पाच पिढ्यांपासून ही आदिवासी वस्ती रस्त्याविना उपेक्षितच राहिली असल्याची खंत येथील आदिवासी कुटुंब व्याकुळपणे "प्रजासत्ताक जनता" प्रतिनिधीकडे व्यक्त करीत असल्याने हे भयावह सत्य समोर आले आहे.

 

या समस्येकडे आजही कोणी आजी तसेच माजी खासदार, आमदार, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचे लक्ष जाऊ नये ही बाब मोठी खेदजनक असून फक्त मताचा जोगवा मागण्यासाठीच हे निष्ठूर राजकारणी येथे येत असल्याचे वृत्त समोर आले आहे तर प्रशासकीय यंत्रणा डोळे असून अंधळी झाली आहे.ठाकूरपाडा ही १०० टक्के आदिवासी वस्ती असून यथे सर्व 'क' ठाकूर समाजाचे कुटुंब स्वातंत्र्याच्या आधीपासून येथे वास्तव्यास आहेत. या पाड्यात एकूण ७२ घरे असून ३०० च्या वर लोकसंख्या आहे. शहापूर वाडा या मुख्य रस्त्यापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर ही वस्ती वसली आहे. मागील १५ वर्षांपूर्वी एक किलोमीटर पर्यंत खडीकरण करून तसाच अर्धवट सोडलेल्या या खड्डेमय रस्त्यावरून महिला, पुरुष, वृद्ध, अपंग, शाळकरी विदयार्थी ये जा करत असतात तर दुचाकी, चारचाकी चालकांची येथून तारेवरची कसरत करत गाडी चालवावी लागत असून हाडे खिळखिळी झाल्याने अनेकांना कंबरेच्या आजराने ग्रासले आहे.  अनेकदा गरोदर मातेला, आजारी वृद्धांना, रुग्णांना रुग्णालयात नेतांना घोंगडीची डोली करून चालत न्यावे लागत असल्याची खंत येथील आदिवासी बांधव व्यक्त करीत आहेत.

 

 गरोदर मातेला डॉली करून न्यावे लागत आहे. ग्रामस्थांनी अनेकवेळा आमदार, सरपंच यांच्याकडे पत्रव्यवहार केल पण अनेक आमदार होऊन गेले फक्त पोकळ आश्वासने देतात व मतदान झाले की इकडे फिरकत देखील नाहीत. या पाड्यात आमच्या ४-५ पिढ्या गेल्या परंतु आजपर्यंत आम्हाला रस्ता नाही.

- रामा कमळू पडेल, ग्रामस्थ, ठाकूरपाडा 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या