Top Post Ad

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सल्लागार समितीमधील  "श्रीवास्तव" वर्चस्व समाप्त

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सल्लागार समितीमधील  "श्रीवास्तव" वर्चस्व समाप्त


मुंबई


राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या पाच सदस्यीय सल्लागार समिती मध्ये तीन  श्रीवास्तवचा समावेश करण्यात आला होता. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग श्रीवास्तव प्रायवेट लिमिटेड बनविण्यात आल्याचा आरोप करीत याबाबत  राष्ट्रपतीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर केंद्र सरकारच्या अप्पर सचिवांनी २० ऑगस्ट रोजी समिती रद्द करण्याचा आदेश काढला. त्यामुळे अनुसूचित जाती आयोगामध्ये योग्य प्रतिनिधी नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची सल्लागार समिती ५ ऑगस्ट रोजी जाहीर झाली होती. अनुसूचित जातीच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी पाच जणांची समिती निवडण्यात आली. त्यामध्ये सदस्य सचिव कॅप्टन प्रभान्शु श्रीवास्तव यांच्यासह सदस्य म्हणून हर्ष श्रीवास्तव व पलश श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली होती. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या नावावर "श्रीवास्तव प्रायव्हेट लिमिटेड " गठीत करण्यात आला असून ही निवड रद्द करण्यात यावी, अशी तक्रार  राष्ट्रपतींकडे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली होती.


 जाहीर केलेल्या सल्लागार समिती मध्ये सदस्य म्हणून निवडलेल्या हर्ष श्रीवास्तव व पलश श्रीवास्तव यांच्या वडिलांचे नाव निवड यादीत दिलेले नव्हते. त्यांची केवळ नावे व आडनाव नमूद होती. त्यामुळे आयोगाचे सदस्य सचिव कॅप्टन प्रभान्शु श्रीवास्तव यांचे व सदस्यांचे नाते उमगत नाही. तथापि पाच सदस्यीय समिती मध्ये तीन "श्रीवास्तव" असणे यातून अनुसूचित जाती आयोगाचे कामकाज प्रभावित होत असल्याने अनुसूचित जातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाबाबत शंका उपस्थित होत होती. अखेर याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. सोबतच सेवानिवृत्त सनदी अधिकारी शारदा प्रसाद हे आयोगाचे अध्यक्ष तर डॉ सत्य श्री यांचा पाच सदस्यीय समिती मध्ये समावेश होता. डॉ सत्य श्री हे नेमके 'श्री' च आहेत की  श्रीवास्तव हे देखील स्पष्ट नसल्याचा आक्षेप होता.


आयोगाच्या नियुक्त्या संशयास्पद व घराणेशाही असून एकजातीय सदस्य निवडण्यात आले होते. अनुसूचित जाती आयोगावर बहुमताने ब्राह्मण सदस्य निवडण्यात आल्याने हा "राष्ट्रीय ब्राम्हण आयोग" बनविला होता, केंद्र सरकारने अनुसूचित जाती आयोग हा अनुसूचित जाती आयोग राहू द्यावा त्याचे ब्राम्हणीकरण करू नये, असा इशारा देखील पक्षाच्या वतीने देण्यात आला होता. श्रीवास्तव प्रायव्हेट लिमिटेडची निवड होणे धोकादायक असल्याने समितीमध्ये अनुसूचित जातीच्या कायदेतज्ज्ञ तसेच अनुसूचित जातीसाठी कार्यरत अराजकीय व्यक्ती निवडण्यात याव्या अशी पक्षाने मागणी केली होती. यावर अनुसूचित जाती आयोगाच्यावतीने २० ऑगस्ट रोजी सल्लागार समिती रद्द करण्यात आल्याचा आदेश अप्पर सचिव किशन चंद यांनी काढला आहे.


मुळात कमिशनच्या सचिवालयीन ३३ पदांपैकी १५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे केंद्र सरकारची अनुसूचित जातीबाबतची नेमकी मानसिकता या रिक्त पदा मधून स्पष्ट होते. अनुसूचित जातीची लोकसंख्या प्रमाणात अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद न करणे, अनुसूचित जाती आयोगाला अनेक वर्षे  अध्यक्ष व सल्लागार समिती नसणे, अनुसूचित जाती जमाती वरील अन्याय अत्याचार यांची माहिती लोकसभा राज्यसभेच्या पटलावर ठेवली न जाणे, अट्रोसिटी गुन्ह्याकरीता विशेष जलदगती न्यायालये जाहीर होऊन त्यांची अंमलबजावणी न होणे या व अश्या अनेक बाबी भाजप सरकारचे अनुसूचित जातीबद्दल असलेला मनुवादी दृष्टीकोन स्पष्ट करीत असल्याने जाणीवपूर्वक या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप देखील तक्रारीत केला होता..



 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com