हितेंद्र ठाकूर यांनाही विजबिलाचा फटका, 5 लाख 50 हजारांचे विजबिल
वसई :
राज्यभरात विजबिलाबाबत प्रचंड असंतोष पसरत आहे. असंख्य तक्रारींचा महापूर सुरू असताना शासन मात्र काहीही करताना दिसत नाही. सततच्या तक्रारींनी राज्य सरकारचीही डोकेदुखी कमालीची वाढली आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय नेते, व्यवसायिकच नव्हे तर सेलिब्रिटींना देखील याचा फटका बसला आहे. अनेकांनी जाहीररित्या वाढीव व अवास्तव विजबिलाबाबत प्रंचड रोष व्यक्त केला आहे. यामध्ये आता हितेंद्र ठाकूर यांचाही समावेश झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात विरारस्थित शाळा, कॉलेज बंद असताना देखील माझ्या निवासस्थानासह अवास्तव आलेली साडेपाच लाखांची विजबिले मी अजिबात भरणार नाही. किंबहना जी विजबिलं योग्य आहेत.ती त्यांनी जरूर भरावी.मात्र अवास्तव बिले तुम्हीही भरू नका, असे जाहीर आवाहनच आता वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसईतील जनतेला केले आहे.
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरारस्थित विवा कॉलेज,शाळा व घराचे विजबिल भरमसाठ आले असून त्यांना पाच बिलं मिळून चक्क 5 लाख 50 हजारांचे विजबिल आले असल्याची माहिती स्वतः आम हितेंद्र ठाकूर यांनी शनिवारी दिली. याबाबत त्यांनी महावितरण व राज्य सरकारवर टीका करत प्रचंड रोष व्यक्त केला आहे. सर्वसामान्य नागरिक हैराण असून महावितरण नागरिकांना अवास्तव विजबिलं पाठवत असून अशी अवास्तव विजबिलं नागरिकांनी अजिबात भरू नये मी तुमच्या सोबत आहे. मात्र विजबिलं योग्य असतील तर जरूर भरा,असे आवाहन आता या निमित्ताने हितेंद्र ठाकूर यांनी वसईकरांना केले आहे
कोरोना संकटात आधीच जनता हैराण आहे. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरु नये. कंपनी, उद्योगधंदे बंद आहेत. नोकऱ्या नाहीत, कुठं पगार नाहीत तर बहुतांश वेतन कपात देखील सुरू आहे. त्यातच लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद असून विजबिले अवास्तव कशी येऊ शकतात तर मुंबईत अदानी व अंबानी यांच्या युनिटच्या दरापेक्षा आपल्या शासनाचे वीजदर अधिक आहेत तर लॉकडाऊन सरकारने केला त्याची चूक हकनाक नागरिकांना का? असा सवाल हितेंद्र ठाकूर यांनी राज्य सरकारला विचारला आहे. तर यावर तोडगा काढा जनतेला दिलासा द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या