देशातील फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर 'कंट्रोल' कोणाचे
मुंबई
'भाजप आणि आरएसएस भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला चालवतात. ते याद्वारे खोटे वृत्त आणि द्वेष पसरवतात. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी त्याचा वापर करतात. अखेर, अमेरिकी मीडियाने फेसबुकबाबत सत्य समोर आणले.' असे विधान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी केले. कॉंग्रेसने माध्यमांच्या वृत्तांचा हवाला देत या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेचे वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकच्या नि:पक्षपातीपणावर सवाल केले आहेत. वृत्तपत्राने दावा केला आहे की, फेसबुकने भाजप नेते व काही गटाच्या ‘हेट स्पीच’ असणाऱ्या पोस्टविरोधातील कारवाईकडे मुद्दाम दुर्लक्ष केले. या पोस्ट हिंसाचार पसरवणाऱ्या होत्या.
फेसबुकच्या दक्षिण व मध्य आशियाच्या धोरण संचालक आंखी दास यांनी भाजप नेते टी. राजासिंहविरोधात फेसबुकचे हेट स्पीच नियम लागू करण्यास विरोध केला होता. त्यांना भाजपसोबतचे संबंध बिघडतील व भारतात कंपनीच्या व्यवसायाचे नुकसान होईल अशी भीती होती. टी. राजा तेलंगणातून आमदार आहेत. वृत्तात म्हटले आहे की, आंखी दास यांनी निवडणूक प्रचारात भाजपला मदत केली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी फेसबुकने म्हटले होते की, त्यांनी पाकिस्तानी सेना, भारतातील राजकीय पक्ष काँग्रेसचे अप्रमाणित फेसबुक पेज व भाजपद्वारे खोटे वृत्त असलेले पेज हटवले होते. मात्र, सिंह आणि भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या अनेक फेसबुक पोस्ट तोपर्यंत हटवल्या नाहीत, जोपर्यंत वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत इशारा दिला नाही. या सर्व पोस्ट मुस्लिमांबाबत द्वेष असलेल्या होत्या.
याप्रकरणी फेसबुकने आपले स्पष्टीकरण दिले आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले की, ''आम्ही द्वेषयुक्त भाषणे आणि हिंसाचार भडकवणारा कंटेंट प्रतिबंधित करतो. आम्ही कोणताही पक्ष किंवा राजकीय हितसंबंध पाहिल्याशिवाय आमच्या धोरणांची अंमलबजावणी करतो. आमच्या बाजूने आणखी काम बाकी असल्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु आम्ही या धोरणांची अंमलबजावणी करण्यास आणि आमच्या प्रयत्नांचे नियमित मूल्यांकन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जेणेकरुन निष्पक्षता आणि अचूकता कायम राहील.''
0 टिप्पण्या