उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी कोविड सेंटरमध्ये पाणी गळती
ठाणे
दोन दिवसांच्या पावसाने ठाण्यातील अनेक भागात पाणी साचले आहे. वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पावसाचा फटका रुग्णालयांनाही बसला आहे. भाईंदर येेथील 'स्व. मीनाताई ठाकरे' मंडई येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील सभागृहाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या शेडमध्ये पावसाची पाणी गळती सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मीरा भाईंदरमधील रुग्णांना उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा पुरेशी नव्हती. राज्य शासनाच्या मदतीने पालिकेने दोन कोविड सेंटर तयार केले. या कोविड सेंटरचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी ई-लोकार्पण पद्धतीने करण्यात आले. मात्र, जोरदार पाऊसामुळे दुसऱ्याच दिवशी स्व. मीनाताई ठाकरे सभागृहाबाहेरील आवारात बनवण्यात आलेल्या खोलीत पाणी गळती सुरू झाली. यामुळे सभागृहातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. शेवटी कर्मचाऱ्यांना हातात झाडू, खराटे घेऊन पाणी काढावे लागले. या सभागृहाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या शेडच्या आतील खोल्यांमध्ये पावसाचे पाणी पडून सामान, आरोग्याचे साहित्य भिजले आहे.
मोठा गाजावाजा करून उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये पाण्याची गळती होऊ लागल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे बोलले जात आहे. करोडो रुपये खर्चून काम करत असताना अधिकारी व ठेकेदार यांच्या नियोजनशून्य कारभारामुळेच असे प्रकार घडत असल्याची चर्चा सुरू आहे. या सेंटरमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेंटरमध्येच राहण्याची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रामदेव पार्क परिसरातील स्व. मीनाताई ठाकरे सभागृहाच्या आवारात पत्र्याचे शेड उभारून तेथे खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, मुसळधार पावसाने कोविड सेंटरमधील या खोलीत पाण्याची गळती सुरू झाल्याने तेथील डॉक्टर व कर्मचारी यांचे हाल झाले. या निकृष्ट केलेल्या कामाची चौकशी करून अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आरोग्य विभागाकडे माहिती विचारली असता कोविड सेंटरमध्ये पाणी गळत असल्याची माहिती घेऊन ते लगेच दुरुस्त करण्यात येईल असे आरोग्य विभागाचे उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या