खासगी बसवाहतूक 2 सप्टेंबरपासून बंद- मुंबई बस मालक संघटनेचा इशारा
ठाणे
कोरोनाच्या महामारीमुळे व्यवसाय ठप्प झालेला असतानाही शासनाकडून खासगी बसचालकांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली सुरुच ठेवली आहे. त्यातच कर्जाने बस खरेदी केलेेल्या असल्याने कर्जाचा डोंगर अधिकाधिक वाढतच चाललेला आहे. अशा स्थितीमध्ये आश्वासन देऊनही करमाफी केली जात नसल्याने मुंबई बस मालक संघटनेने आता बंदचे हत्यार उगारले आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी अत्यावश्यक सेवा पुरवणार्या बससेवा बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
कोरोनामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभर 21 मार्च पासून लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. या आदेशाचे पालन करीत राज्यातील बस मालकांनीही सरकारला साह्य केले. या काळातही बससेवेला आकारण्यात येणारे कर मात्र रोखण्यात आले नाहीत. या संदर्भात राज्य शासनाला अनेकवेळा निवेदने देण्यात आली. मात्र, केवळ आश्वासनाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना राबविण्यात आलेली नाही. आधीच कर्जाने घेतलेल्या बसगाड्यांच्या व्याजाच्या ओझ्याखाली बसमालक दबलेले असतानाच आता करवसुलीचा तगादा लावला जात आहे. एकीकडे आंतरराज्य एसटी सेवा सुरु केली जात असतानाही खासगी बसचालकांना मात्र अद्यापही बंदीचाच सामना करावा लागत आहे. त्यामुळे बसमालक मेटाकुटीला आले असून मुंबई बस मालक संघटनेने मुंबई परिक्षेत्रात (एमएमआरडीए क्षेत्र) 2 सप्टेंबरला बस बंद आंदोलन छेडले आहे. यामध्ये ई पास व अत्यावश्यक सेवेच्या बसगाड्यांनाही सामावून घेतले जाणार आहे, असे या संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
0 टिप्पण्या