शहापूरात गढुळ पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात
नगरपंचायत विरोधात नागरिकांत संताप
शहापूर
शहापूर नगरपंचायतीकडून शहरातील नागरिकांसाठी मातीमिश्रित व केर कचरा असलेल्या अशुध्द अशा गढुळ पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा केला जात आसल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात नागरीकांत संतापाची एकच लाट पसरली आहे .नळाद्वारे पिण्यासाठी पुरविले जाणारे पाणी हे प्रचंड असे गढुळ व दुषित असल्याने या पाण्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून दुषित पाणीपुरवठ्यामुळे शहापूर शहारात साथीचे गंभीर आजार पसरण्याची भिती व्यक्त होत आहे .
दुषित पाण्याचा पाणीपुरवठा करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. गेल्या तीन वर्षांपुर्वी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झालेल्या शहापूर शहरातील नगरपंचायत ही नागरी सुविधा पुरवण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे समोर येत आहे. पाणी पुरवठा करण्यास नगरपंचायत प्रशासन कुचकामी ठरल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. शहापूरात नगरपंचायत प्रशासनाकडुन पाणी पुरवठा केला जातो या पाणी पुरवठ्याच्या मोबदल्यात नगरपंचायतीला कर म्हणून दर महिन्याला शहारातील रहिवासीयांना पाणीपट्टी भरावी लागते असे असतांना देखील पावसाळ्यात पिण्यासाठी अशुध्द व गढुळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
भातसा नदीपात्रातील पाण्याचे शुध्दीकरण न करता हे दुषीत मातीमिश्रित असे गढुळ पाणी टाकी मध्ये साठवून ते थेट नळाद्वारे नागरिकांना पिण्यासाठी पुरविले जात आहे. जल शुध्दीकरण योजना कार्यन्वीत नसल्याने पाण्याचे शुध्दीकरण न करता नागरिकांना पाणी पुरवठा केला जात असल्याचा संतापजनक प्रकार नगरपंचायतीकडून सुरु असल्याने नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. तत्कालीन शहापूर ग्रामपंचायतीने बसविलेला जलशुद्धीकरण प्लांट हा ३५ वर्षांपुर्वीचा जुना असल्याने तो कालबाह्य व नादुरुस्त अवस्थेत बंद पडून आहे नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प नगरपंचायतीकडून प्रस्तावित करण्यात आले आहे असे शहापूर नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
गढुळ पाण्यासंदर्भात शहापूरकर महिलांनी नगरपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र या सर्व तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचे काम आजमितीस नगरपंचायत प्रशासनासह नगरपंचायतीवर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी केले आहे असा नागरिकांचा आरोप आहे .एकिकडे करोडो रुपयांची रस्त्यांची व इतर विकासकामे शहरात सुरु असताना दुसरीकडे मात्र नगरपंचायत शहापूरकरांना शुध्द पाणीपुरवठा करण्यास पुर्णपणे अपयशी ठरली असून नगरपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे दरवर्षी पावसाळ्यात शहापूर शहरातील जनतेला मातीमिश्रित व दुषीत पाणी प्यावे लागत आहे. या प्रकारामुळे जनतेत संताप व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या