वसई :
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे या विषयावर चर्चा न करता महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी.हे मनमानी कामकाज चालवत आहेत, असा सूर नुकत्याच झालेल्या बैठकीत होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वसई-विरारची परिस्थिती चिंताजनक होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयाला भेट देत सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात विविध सूचना केल्या. या आढावा बैठकीत चर्चेदरम्यान खुलासा करताना महानगरपालिकेत कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार झालेला नाही व तसे विधान मी केले नसल्याचा दावा आयुक्त गंगाथरन यांनी केल्याने उपस्थित लोकप्रतिनिधी व पत्रकारांना धक्का बसला.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला खासदार राजेंद्र गावित, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तसेच वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर,आमदार क्षितिज ठाकूर,आ.रवींद्र फाटक,आ.श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबई, ठाणे यासारख्या ठिकाणी जास्त खर्च करून उपचारासाठी दाखल होतात. मात्र, वसई तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. असा आरोप वसई-विरार महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आला.
0 टिप्पण्या