केरुमाता मंदिर वाचवल्याने नंतर तिचे रूपांतर "बुद्ध लेणीं" मध्ये होणार आहे का


केरुमाता मंदिर खरंच बुद्ध लेणी आहे का?


भारतीय राज्यघटनेने आम्हां सर्व भारतीयांना स्वतःच्या श्रद्धा, धर्मतत्त्व मानण्याचा व जपण्याचा अधिकार दिला आहे आणि म्हणूनच मी येथे सांगू इच्छितो कि कोणाच्याही धर्माला अथवा श्रद्धेला विरोध करत नाही. मात्र मला हे ही सांगणे येथे उचित वाटते कि "बौद्ध समाज" हा खूप भावनिक आहे आणि भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोणी आवाहन केले तरी तो लगेच भावनावश होऊन मदतीला धावून जातो. यामुळे या समाजाचा अनेक जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करून घेतला आहे असे इतिहासावरून दिसते.


आता बोलूयात "केरुमाता मंदिर" विषयी. मुळात येथे आज सकाळपासून (आणि पूर्वी ही) आवाहन करण्यात आले कि प्राचीन बुद्ध लेणीं उध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आहे आणि ही बुद्ध लेणीं तोडण्यात येत आहे. या वास्तूच्या मुळाशी न जाता आम्हीं लगेच भावनिक होऊन प्रतिक्रिया द्यायला किंवा विरोध करायला निघालो आहोत. मी या लेणीला अंदाजे ६ ते ७ वर्षांपूर्वी भेट दिली होती. मुळात ही लेणीं अंदाजे १०व्या ते ११ व्य शतकाच्या नंतरची असावी असे पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून जाणवते. (लेणीं या फक्त बौद्ध धम्माशी निगडित नसून त्या जैन आणि हिंदू धर्मियांच्या देखील पाहायला मिळतात). सदर लेणींचे स्थापत्य पाहता तिचा दगड हा सॉफ्ट बसाल्ट म्हणजे हलक्या प्रतीच्या दगडाचा असल्यामुळे या लेणीमध्ये कोणतेही कोरीव किंवा नक्षीदार शिल्प कोरण्यात आले नाही. एवढेच काय, या लेणीचे स्तंभ आणि भिंती देखील कोरीव नाहीत. या लेणीच्या दगडाची पोत पाहता, ही लेणीं सोडून देण्यात आली असावी, कारण यात कोणत्याही भिक्खूने अथवा कोणीही त्याकाळी वास्तव्य केल्याचे कोणतेही पुरावे सापडत नाही. त्यानंतर अलीकडच्या काळात येथे केरुमाता स्थापण्यात आली असावी. नंतर येथे प्रथेप्रमाणे पूजा अर्चना सुरु झाली. बौद्ध शिल्पकला आणि स्थापत्याचे येथे कोणताही संदर्भ लागत नाही. कारण मुळात ही लेणीं बुद्ध लेणीं नाही. ती फक्त कोरलेली लेणीं आहे. त्यामुळे या "केरुमाता मंदिर"ला बौद्ध लेणीं म्हणणे चूक आहे आणि अनैतिहासिक आहे. बौद्ध लेणी म्हटल्याने या केरुमाता मंदिराविषयी लोकांमध्ये संभ्रम वाढल्याचे दिसते.


येथे मी सांगू इच्छितो कि आयु. राजाराम पाटील यांच्या अभ्यासू वृत्तीचा मी आदर करतो. त्यांच्याशी माझे या आणि इतर विषयांवर चर्चा देखील झाली आहे. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र तरीही त्यांनी या केरुमाता मंदिराला "प्राचीन बौद्ध लेणीं" म्हणू नये कारण त्यात काहीही तथ्य नाही. ही बुद्ध लेणी आहे असे म्हणणे हे अतिशय चुकीचे आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडून मी अशा चुकीची आणि अनैतिहासिक माहितीची अपेक्षा करत नाही. मघाशी म्हटल्या प्रमाणे ही फारफार तर एक सोडून दिलेली (abandon) लेणी आहे.


दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही केरुमाता मंदिर वाचवल्याने नंतर तिचे रूपांतर "बुद्ध लेणीं" मध्ये होणार आहे का ? तर नाही, तसे शक्य नाही आणि सध्या तेथे पूजा अर्चना करणारे तसे होऊ देणार नाही. म्हणजे बुद्ध लेणी म्हणून आम्ही फक्त त्यासाठी लढायचे ? या केरुमाता मंदिर वाचवण्याचे प्रयत्न आयु. राजाराम पाटील यांनी जरूर करावेत मात्र ते एक मंदिर म्हणून, प्राचीन बुद्ध लेणी म्हणून नव्हे. वाटल्यास त्यांनी त्याला प्राचीन लेणीतील केरुमाता मंदिर म्हणावे. आम्हीं त्यांच्या श्रद्धेचा आदर करतो.


म्हणूनच बुद्ध लेणीं बद्दल आदर असणाऱ्यांनी हा विचार करावा कि आम्हांला नेमके काय वाचवायचे आहे....ही केरुमाता मंदिर कि महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या ९८० प्राचीन बुद्ध लेणीं ज्यांपैकी अनेकांवर सध्या अतिक्रमण झाले आहे. उदा. कार्ले येथील बुद्ध लेणीं, कऱ्हाड येथील जाखीणवाडी बुद्ध लेणी, कल्याण येथील लोणाड बुद्ध लेणी, शेलारवाडी बुद्ध लेणी आणि अशा अनेक बुद्ध लेणीं आहेत.


सोबत केरुमाता मंदिराचे फोटो देत आहे.


अतुल मुरलीधर भोसेकर -  ९५४५२७७४१०


-----------------------------------------------


 मित्रांनो,


मी ७वीत असताना (वय 12 वर्ष) माझ्या वडिलांनी (कालकथीत मुरलीधर भोसेकर) मला कार्ले व भाजा येथील बुद्ध लेणीं पाहायला नेले होते. त्यावेळेस एक छोटेसे दगडी मंदिर (जे एका चित्रात आपल्याला दिसते आणि आज ही आहे) होते जेथे एकविरा म्हणून देवीची पूजा केली जायची. त्यावेळेस काही लोके तेथे चौथऱ्यावर कोंबडे कापायची, कालांतराने ते चैत्यगृहाच्या दरवाज्याजवळ देखील कापायची. त्यावेळेस माझ्या वडिलांनी तेथील कर्मचारी यांना हे प्रकार बंद करण्यासाठी सांगितल्याचे आठवते. एवढेच नव्हे तर त्यांनी पुण्याचे कलेक्टर, त्या काळातील आपल्या समाजातील झाडून सारे नेते यांना प्रत्यक्ष भेटून, निवेदन देऊन हा प्रकार सांगितला.


छोटेसे मंदिर पुढे खूप मोठे होईल आणि बुद्ध लेणीला प्रचंड अडथळा निर्माण होऊन ती नष्ट किंवा अतिक्रमण करण्यात येईल हे त्यांनी आपल्या नेत्यांना सांगितले होते. याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार होतो. मात्र काही झाले नाही आणि आज आपण पाहतोय की भारतातील सर्वात सुंदर चैत्यगृह असलेली कार्ले बुद्ध लेणीं अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकलेली आहे. (तेथील दगडी मंदिर हे फारफार तर १८व्या शतकातील आहे मात्र बुद्ध लेणीं ही इ.स.पूर्व पहिल्या शतकातील आहे.) त्याच वेळेस जर आमच्या काही नेत्यांनी लक्ष घातले असते तर ही वेळ आली नसती. मात्र अजून वेळ गेली नाही. ASI ला पाठपुरावा करून, RTI टाकून आपण हे काम सर्वजण करू शकतो. बुद्ध लेणीं च्या नावाने गळे काढणे सोपे असते, त्याचे राजकारण करणे आणखी सोपे आणि बौद्ध धम्मीय यांच्या भावना भडकविणे तर आता सर्रास झाले आहे.


आज स्थिती अशी आहे की कार्ले बुद्ध लेणीं वर इतके अतिक्रमण झाले आहे की फक्त चैत्यगृह आम्हीं पाहू शकतो. पलीकडची संपूर्ण बाजू अतिक्रमण करून बंद करण्यात आली आहे. तेथेही लेणीं आहेत. त्या या अतिक्रमणामुळे आम्हीं पाहू शकत नाही. अतिक्रमण करून बांधलेले मंदिराची एक बाजू पार चैत्यगृहाच्या दाराशी जाते. बुद्ध लेणीं बद्दल गळे काढणारे इकडे लक्ष देतील का?


अतुल मुरलीधर भोसेकर-  9545277410 
 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1