धारावी आणि कोरोना 

धारावी आणि कोरोना 


मागच्या वेळस धारावीतील कोरोनाची बातमी आली तेव्हा कोणीतरी लिहलं होतं की त्या वस्तीवर बाँब टाकावा... हे वाचून मी खुपच उदास झालो होतो... बातम्या येत होत्या आणि मी माझ्या नवीमुबईच्या घरात बसून सतत निराशेत जात होतो.
ते काही दिवस, मजुराचे तांडे आणि धारावीतील नातेवाईक आणि मित्रांची काळजी आणि आपण काहीही करू शकत नाही याची हतबलता माझ्या मानसीकतेवर परिणाम करीत होती. असो... तो काळ कसा तरी गेला...
आज धारावी हे कोरोनाशी लढण्याचे मॅडल म्हणून जागतीक पातळीवर स्तुतीस पात्र झाले आहे आणि हे लिहतांना मन भरून येत आहे. माझे नातेवाईक आणि मित्र स्वताची काळजी घेण्यात यशस्वी झाले आहेत...


धारावीची प्रतीमा
धारावीत लोक दाटीवाटीने राहतात, पण त्यांच्या घरात कधी गेलात का? मग मी सांगतो, धारावीत अनेक घर आतून अतिशय स्वच्छ असतात, घरात टिव्ही, फ्रिज आणि कंप्यूटर असे अनेक मध्यमवर्गातील लोकांच्या घरात सापडणाऱ्या जिवनावश्यक वस्तु असतात... प्रश्न घराबाहेरील साफसफाई आणि सार्वजनिक संडासाचा असतो... आणि ती जबाबदारी महापालिकेची/सरकारची असते. वरून गजबजलेली धारावी आतून अतिशय कष्टाळू आणि स्वप्ने पाहणारी आहे, माझ्या सकट अनेक लोक धारावीत राहून शिकून सावरून आपले करियर बनवून जगभरात नोकऱ्या करून परदेशात व मुंबईत मोक्याच्या ठिकाणी स्थलांतरीत झालेले अनेक लोक व मित्र परिवार मला माहीत आहे. (एका मित्राची अमेरीकेत छोटी IT कंपनी ही आहे) त्यामुळे आपल्याला जशी आपल्या आरोग्याची काळजी आहे तशीच त्यांनाही आहे. फक्त धारावीत राहतात म्हणून त्यांच्याकडे हेटाळणीने बघून उपयोग नाही.


स्वयंसेवी संघटनांचे जाळे
धारावीत अनेक स्वयंसेवी संघटना आहेत ते लोकांशी जोडले गेलेले आहेत, तेथील लोक त्यांना आदराने वागवतात अनेक सरकारी कार्यक्रम लस टोचण्यापासून मोहल्ला कमिटी पर्यंतचे कार्यक्रम धारावी गेली अनेक वर्षे होत आहेत... १९९२-९३ च्या दंग्यानेतर धारावीत अतिशय चांगलं काम झालं आणि हिंदु मुस्लीम दाटावाटीने करून राहत असलेल्या वस्ती त्यांनंतर दंगे झाले नाहीत. मी स्वतः भीमराव रासकरांनी (Bhim Raskar) सुरू केलेल्या श्रमिक युथ गृप मधून आलो आहे, माझ्या बरोबर अनेक लोक अशा संस्थामधुन जागची ओळख, चळवळीची ओळख, वाचन, धारावी बाहेरचं जग आणि स्वविकासातून समाज विकास वगैरे प्रबोधन चालूच असते... समतेच्या चळवळीतील अनेक कार्यकर्ते धारावीतून येतात... अनेक अभ्यास केंद्रे चालू असतात...


प्रत्येक वस्तीत डॉक्टरचा दवाखाना.
धारावीत एखाद्या डॉक्टरचा दवाखाना चालणे म्हणजे सोन्याची खाण हातात लागणे आहे, माझ्या आजूबाजूचे डॉक्टर धारावीत दररोज मुंबईच्या पॉश घरातून यायचे आजही येत आहेत, काही लोक तिथेच राहून शिकून डॉक्टर झालेत आणि दवाखाना चालवत आहेत (यात माझा जवळचा मित्र डॉ संजय सोणवणे आहे)


हे का लिहतो आहे?
धारावीने कोरोनाला आवाक्यात आणले आहे, त्याची कारणे धारावीत राबणाऱ्या अशा अनेक स्वसंसेवी संघटना आणि त्यांनी महानगर पालिकेशी केलेलं सहकार्य आणि प्रत्येक गल्ली बोळात असलेली मंडळे, डॉक्टर्स आणि इथल्या लोकांनी दाखवलेली शिस्त आणि दुर्दम्य इच्छाशक्ती... या सगळ्यांनी कंबर कसून केलेली मेहनत यामुळे धारावीत कोरोना आवाक्यात आला आणि WHO त्याची नोंद घ्यावी लागली...


कोण्यातरी महाभागाने RSS धारावीत कोरोना आवाक्यात आणले म्हणून ठोकून दिलं आहे... ते असत्य आहे... खरं तर धारावीत माझी प्राथमिक शाळा असलेली जागृती विद्यामंदीर इमारत शाळा बंद झाल्यानंतर ८०च्या दशकातच RSS ने ताब्यात घेतली होती... आणि आम्हाला लहानपणापासूनच ते लाठी-काठी शिकवायचा प्रयत्न करीत होतो... अगदी आमच्या सोनरी गार्डन मधेही... तेथून काही जाणकार लोकांनी तेव्हा त्यांना हाकलून लावले होते... आणि आमचा ह्या द्वेष पसरवणाऱ्या विचारधारेपासून संरक्षण केले होते... पण त्या वास्तूत ते सतत दिसायचे... त्यांनी कोणाला मदत केल्याची आम्ही पाहीलेलं नाही... त्यांमुळे असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका...


राज्यसरकार, महापालीकेतील धाडसी कर्मचारी, सफाई कर्मचारी, तेथील मंडळे, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर्स आणि धारावीतील सतत स्वत:चे हित समजावून घेणाऱ्या जनतेचं हे श्रेय आहे... हे ही विसरून चालणार नाही... 
---
माहिती: धारावीत जवळजवळ १५०च्या वर सोनारांचे दुकाने आहेत बरं का…. ते तिथे का आहेत? पैसा आहे म्हणून आहे ना?


---- सुनिल गजाकोशटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad