होराईझन रुग्णालयावर कारवाईचा बडगा, इतर रुग्णालयांवर कधी- मनसे
ठाणे
ठाणे शहरात कोव्हिड-१९ ची लक्षणे असणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांवर उपचाराकरिता घोडबंदर रोडवरील होराईझन प्राईम हॉस्पीटल २ एप्रिल पासून कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले, सदर रुग्णालयाद्वारे १२ जुलै पर्यंत एकुण ७९७ रूग्णांवर उपचार करण्यात आलेले असल्याचे दिसून आले आहे. मात्र रुग्णालयाने लेखा परीक्षणासाठी सादर केलेल्या एकूण ५७ देयकांपैकी तब्बल ५६ देयके ही गैरवाजवी दराने आकारण्यात आल्याचे विशेष लेखा परीक्षण पथकाच्या निदर्शनास आले. याबाबत ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी धडक कारवाई केली आहे. सदर रुग्णालयाची कोवीड रुग्णालय म्हणून असलेली मान्यता तात्काळ रद्द केली आणि रुग्णालयाची नोंदणी देखील आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्याकरिता निलंबित करण्यात आली असल्याचे २५ जुलै रोजी पालिकेच्या सुत्रांनी सांगितले.
ठामपा आयुक्तांनी जादा बिले आकारणा-या रुग्णालयांवर कारवाईचे आदेश देऊनही प्रशासन आकडेवारीचे घोडे नाचवत स्वत:ची पाठ थोपटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप या प्रकरणी मनसेने केला आहे. कोरोना काळात तीन महिन्यांपासून गोरगरिब रुग्णांच्या खिशाला काञी लावणार्या अंदाजे दोन कोटींच्या बिलांचा ‘हिशोब’ द्या, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. पीपीई घोटाळ्यादरम्यान मनसेने सर्व खासगी रुग्णालयांचा कारभार पारदर्शक होण्यासाठी लेखापरिक्षक नेमण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. ती पूर्ण होऊन रुग्णालयांचे ऑडिट सुरु झाले. माञ लेखापरिक्षकांनी कोरोनाच्या 1 एप्रिल ते 30 जून या 90 दिवसातील बिलांचे ऑडिट करावे. अंदाजे दीड ते दोन कोटी रूपयांची बिले यामध्ये आक्षेपार्ह आढळतील, त्यावर कोणती कारवाई करणार असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना काळातील खासगी रुग्णांची लूटमार सिद्ध झाल्यास वाढीव रक्कम तात्काळ रूग्णांच्या खात्यात परत जमा करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले होते. त्यासाठी मुख्य लेखा परीक्षकांच्या अधिपत्त्याखालील विशेष पथकाने शहरातील १५ कोवीड रूग्णालयांची तपासणी करून जवळपास २७ लाख रूपयांच्या १९६ आक्षेपार्ह बिलांची नोंद केली होती. या सर्व रूग्णालयांना नोटीस देण्याची कार्यवाही सुरू केली. माञ या काळातील उर्वरित बिलांची रक्कम अंदाजे दोन कोटींच्या घरात जाते, त्याचा लेखाजोखा कधी करणार असा प्रश्नही पाचंगे यांनी केला आहे.
0 टिप्पण्या