मरणानंतरही यातना, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने प्रेतांची हेळसांड

स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने प्रेतांची होतेय हेळसांड ;
ठेकेदारांच्या अडमुठे धोरणामुळे ग्रामस्थांना त्रास

 

शहापूर (संजय भालेराव) :

 

गावात सुसज्ज स्मशानभूमी असून देखील मागील दोन वर्षांपासून स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने पावसाळ्यात मयताला आपल्या मरणयातना सहन करत प्रेतांची अक्षरशः हेळसांड होत असून चार खांदेकरुं ऐवजी चिखलातून दोनच व्यक्ती हातावर प्रेत कसे तरी स्मशानापर्यंत नेतात 

 

शहापूर तालुक्यातील नडगाव जिल्हा परिषद गटातील मौजे नडगाव येथील शिरगाव - नडगाव नदीजवळ नडगाव ग्रामपंचायतीने सुसज्ज अशी स्मशानभूमी बांधली आहे. या स्मशानभूमीचा लाभ शंभरपेक्षा अधिक कुटुंब घेत असतात. मात्र मागील दोन वर्षांपासून त्या स्मशानभूमी लगतच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेडचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ - शहापूर - मुरबाड- म्हसा - कर्जत - खोपोली या नवीन महामार्गाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. या कामाचा कार्यरंभ आदेश पीएसके इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीचे नावे असून यारस्त्याचे  काम सबठेकेदार मे. जिजाऊ कन्स्ट्रक्शन मु. झडपोली, जिल्हा पालघर या स्थानिक ठेकेदाराला दिले आहे 

 

रस्त्याचा कार्यारंभ आदेश ३० जून २०१८ आहे  हे काम पूर्ण करण्याचा कालावधी १८ महिने होता. दरम्यान या स्मशानभूमीत जाण्यासाठी पर्यायी रस्ता करून देऊ असे कोरडे आश्वासन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी नाडगाव ग्रामस्थांना दिले होते परंतु आज देखील प्रेत चिखलातून दोन व्यक्तिंना हातावर प्रेतांची हेळसांड करत न्यावे लागत आहे. 

                नुकतेच जून महिन्यात शहापूर नगरपंचायत हद्दीत शिवसेनेकडून काही लोकोउपयोगी कामांचे उद्घाटन सोहळे शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे हस्ते संपन्न झाले त्यावेळी आपल्या भाषणात त्यांनी मे. जिजाऊ कन्स्ट्रक्शन मु. झडपोली या ठेकेदाराचे कौतुक केले व या ठकेदारास ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. मात्र स्थानिक ठेकेदार जर ग्रामस्थांची अशी पिळवणूक करत असेलतर असा स्थानिक ठेकेदार आमच्या काय कामाचा असा सवाल देखील नडगावच्या त्रस्त ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या मुजोर ठेकेदारामार्फत महामार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हा करावे मात्र पावसाळ्यात मयतांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता स्मशानभूमीसाठी तात्काळ करून द्यावा . म्हणजे प्रेत नेण्यास सुखकर होईल तसेच मागील दोन वर्षांपासून  शिरगाव - नडगाव नदीजवळील गणेशघाटाचा थांबलेला वापर देखील गणेशोत्सवात करता येईल अशी मागणी नडगाव ग्रामस्थांकडुन केली जात आहे.

 

 पावसाळ्यात  प्रेत जिकरीने उचलून न्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी लक्ष्मण संगारे वारले त्यांना मुश्किलवर दोन जनांनी उचलून नेले. ही समस्या भयावह होत असून  लवकरच रस्ता करून द्यावा अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.

- अरविंद मांजे, ग्रामस्थ, नडगाव

 


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad