तुम्ही आज दिलेला किराणा पुढचे पंधरा दिवस ढकलेल, पुढे काय- सफाई महिलेचा अनलॉक प्रश्न

पुन्हा धान्य वाटप असेल  तेव्हा जरूर सांगा साहेब! - सफाई कामगार महिलेची विनवणीठाणे


साहेब, तुम्ही आज दिलेला किराणा पुढचे पंधरा दिवस ढकलेल. त्याच्यानंतर काय! हा लॉक डाऊन कधी संपेल? तुमचे अन्न धान्याचे वाटप पुन्हा असेल तेव्हा मला जरूर सांगा...कल्याण (बैलबाजार) येथील रहेजा कॉम्प्लेक्सजवळच्या स्मशानभूमीचा परिसर साफसफाई करणारी अविदा मस्तूद ही वृद्ध महिला हात जोडून याचना करत होती.


बहुजन संग्रामच्या वतीने मागील चार महिन्यापासून सुरु असलेले धान्य शिधावाटप आज २५ जुलै रोजी कल्याण परिसरात होते. अंबरनाथ येथे शिधा- किराणाचे वाटप करून बहुजन संग्रामची गाडी कल्याणमध्ये आली असता स्मशानभूमीजवळ सफाई करणाऱ्या महिलेलाही शिधा किराणा देण्यात आला. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांना तीने आपली कैफियत सांगितली.  ती गरीब महिला स्मशानभूमीपासून दीड किलो मीटर दूर असलेल्या पिसवली टाटा पॉवर हाऊस येथील झोपडपट्टीत राहते. आपल्याकडचा फुटका मोबाईल दाखवत ती म्हणाली,' यांच्यात बॅलन्स नाही. पण साहेब, माझा नंबर टिपून घ्या. पुन्हा धान्य वाटायला कल्याणला येणार असाल तर मला जरूर सांगा. 


इथे स्मशानभूमीसमोर का उभ्या आहात, काम धंदा काय करता, असे विचारले असता अविदा मस्तूद म्हणाली, सर्वोदय हाऊसिंग सोसायटीमध्ये मी सफाई कामगार आहे.पण लॉक डाऊनमुळे चार महिन्यांपासून काम बंद आहे. कोरोनाच्या भीतीने सोसायटीने मला प्रवेश बंद केला आहे. पण आजारी नवरा आणि दोन मुलेही लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घरीच आहेत. मग मला घरी बसून कसे चालेल ? मी रोज झाडू घेऊन इथे येते. सर्वोदय सोसायटीपासून स्मशानभूमीपर्यंतचा परिसर स्वच्छ करते आणि इथेच थांबून राहते. कुणाची अंत्ययात्रा आली की, शोकाकुल लोकांसमोर हात पसरते. पदरात जे काही दान पडेल, ते घेऊन घरी जाते, असे तिने डोळे पुसत सांगितले. प्रेत जर कोरोना रुग्णाचे असेल तर अंत्यसंस्काराला मोजकीच माणसे येतात. त्यातील काहीजण मदत करतात, असे ती पुढे म्हणाली.


अविदा मस्तूद हिला धान्य किराणा दिल्यानंतर  कल्याण स्मशानभुमीतील अत्यंविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यानां व हातावर पोट असलेल्यांना स्मशानभूमी बाहेरच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांच्यासोबत संघटन सचिव विनोद कांबळे, सचिव इंजि.जी.डी.मेश्राम, संघटक तेजस वाघ  हे पदाधिकारी उपस्थित होते.


बहुजन संग्रामतर्फे अंबरनाथ,कल्याणनंतर  ठाण्यात प्रजासत्ताक जनता, व जनता एक्सप्रेसचे संपादक सुबोध शाक्यरत्न यांनी गरजू महिलांची यादी दिल्यानुसार ठाण्यातील कापूरबावडी, माजीवडा, भागांतील हातावर पोट असणाऱ्या महिलांनाही धान्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार सुबोध शाक्यरत्न, पत्रकार विलास शंभरकर, पत्रकार मोहसीन भाई, संस्थेचे कार्यकर्ते विनोद कांबळे, तेजस वाघ आदीं उपस्थित होते.


अंबरनाथ एम.आय.डी.सी. कार्यकारी अभियंता राजाराम राठोड, सहाय्यक संदीप गोसावी, ठाणे तहसीलदार, अधिक पाटील, सर्कल ऑफिसर वंजारे, तलाठी महेन्द्र पाटील, इतर दात्यांनी या मदत कार्यासाठी हातभार लावला, येत्या १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर तीन टप्प्यात सुमारे पाच हजार गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून ठरलेले उद्दिष्ट पुर्ण करण्याचा संस्थेचा मानस आहे. या मानवतावादी कार्यास दात्यांनी व सुस्थितीत असलेल्या नागरिकांनी सढळ हाताने व उदार अंत:करणाने जीवनावश्यक वस्तूरूपाने किंवा ऑनलाईन सहकार्य  करावे.असे कळकळीचे आवाहन भीमराव चिलगावकर यांनी केले आहे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad