जातीच्या मंत्र्याकडे कार्यभार हा नवा जातिवाद - राजकुमार बडोले

हा नवा जातिवाद : माजी मंत्री राजकुमार बडोले


मुंबई


ज्या जातीसाठी संस्था कार्यरत आहे, ती संस्था त्याच जातीच्या मंत्र्याकडे असावी, असा घातक पायंडा सारथीच्या आजच्या निर्णयामुळे पडला आहे. हा नवा जातिवाद आहे. सारथीचे पालकत्व घेतले मग चर्मकार महामंडळ, साठे महामंडळ, नाईक महामंडळ, फुले महामंडळ यांचे काय, असा सवाल भाजप नेते व माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केला आहे. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत ‘सारथी’ संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासातंच सदर निधी उपलब्ध करुन देण्यात आला. 


 


मराठा संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि इतर मागासवर्ग विभागाचे मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी त्यांच्या विभागाच्या अखत्यारित असलेल्या दोन संस्था व महामंडळावर गुरुवारी पाणी सोडले. आणि ते विभाग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवले. हा प्रकार जातीयवादाला खतपाणी घालणारा व चुकीची प्रथा पाडणारा आहे, अशी टीका माजी मंत्री आणि अधिकाऱ्यांनी केली आहे.


आघाडी सरकारमध्ये हा विभाग विदर्भातील काँग्रेस नेते विजय वड्टेटीवार यांच्याकडे आला. मात्र, वडेट्टीवार ओबीसी असल्याने त्यांना सारथी संस्थेवरून लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे त्यांनी वैतागून हा विभाग आपल्याला नको अशी भूमिका घेतली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा समाजाच्या उद्योजकता वाढीसाठी कार्यरत आहे. हा विभाग कौशल्य विकास मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. हे मंत्रालय सध्या नवाब मलिक या मुस्लिम मंत्र्यांकडे आहे. वडेट्टीवारांना लक्ष केलेले पाहून मलिक यांनी महामंडळाचा कारभार सोडण्याची तयारी दर्शवली. पवारांककडे असलेल्या नियोजन विभागाच्या अखत्यारित दोन्ही संस्था सामील केल्या जातील. पवार हे मराठा आहेत. परिणामी, या दोन्ही संस्था-महामंडळावरून आरोप कमी होतील, असा सरकारचा अंदाज आहे.


कौशल्य विकास विभाग हा उद्योजकता निर्माण करणारा विभाग आहे. तर नियोजन विभाग निधीचे वाटपाचे नियोजन करणारा आहे. हा विभाग उद्योजकता कशी निर्माण करणार, अशी प्रश्न उपस्थित करत मंत्रालयाची फोडाफोडी चुकीचा पायंडा असल्याची टीका निलंग्याचे भाजप आमदार व कौशल्य विकास विभागाचे माजी मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर यांनी केली आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA