‘ए अँड जी’ या खासगी रुग्णालयाचा कोवीड दर्जा काढून घेतला
कल्याण
ठाण्यातील होरायझन या खाजगी रुग्णालयावर ठामपाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने शासकीय दरांपेक्षा अधिक दर आकारणी करून कोवीड रुग्णांची लूट केल्याचा ठपका ठेवत कल्याण पश्चिमेच्या मुरबाड रोड परिसरात असणाऱ्या ‘ए अँड जी’ या खासगी रुग्णालयाचा कोवीड दर्जा काढून घेतला आहे. मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायद्याखाली केलेली नोंदणीही ३१ ऑगस्टपर्यंत निलंबित केली आहे. तसेच जोपर्यंत रुग्णालय प्रशासन या सर्व अनियमितता दूर करून संबंधित रुग्णांना आकारलेले जास्तीचे पैसे परत करत नाही तोपर्यंत नोंदणीचे निलंबन राहणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.
महापालिकेच्या भरारी पथकाने केलेल्या चौकशीत या रुग्णालयाने 19 रुग्णांच्या बिलांमध्ये 9 लाख 36 हजार 618 रुपये जादा आकारणे, टोसीलीझुमॅब इंजेक्शनसाठी एमआरपीपेक्षा अधिक पैसे उकळणे आदी गंभीर अनियमितता आढळून आल्या. त्याबाबत केडीएमसीच्या नोटीसीना रुग्णालय प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले. या अति गंभीर स्वरूपाच्या अनियमिततांमधून रुग्णालयाने कोवीड रुग्णांची आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवत महापालिका प्रशासनाने या रुग्णालयावर ही कारवाई केल्याचे सांगितले. रुग्णालयात कोवीडचे नविन रुग्ण घेण्यावरही मनाई आदेश लागू करण्यात आले असून सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांवर शासकीय दरात उपचार होण्याचे निश्चित करण्यासाठी केडीएमसीतर्फे वैद्यकीय अधिकारी समीर सरवणकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या