ज्यादा दर लावणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे संकेत

*येत्या दहा दिवसात कोरोनाच्या अनुषंगाने सर्व सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करून  देणार - आरोग्यमंत्री टोपे*

*बदलापुर-अंबरनाथ येथील कोरोना साथीच्या संदर्भात घेतली  आढावा बैठक*

*अंबरनाथ-बदलापुर साठी हर्णे येथील आयुर्वेदिक महाविद्यालय घेणार ताब्यात*

 


 

ठाणे

कोरोनाची साखळी शक्य तितक्या लवकर तोडण्यासाठी शासन प्रयत्नशील असुन बदलापुर अंबरनाथ  ग्रामीण भागासाठी पाच चाचणी केंद्र सुरु करण्यात येतील.तसेच  दहा दिवसात कोविड संदर्भातील सर्व सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याबाबतच्या स्पष्ट सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिल्या. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बदलापुर-अंबरनाथ येथील कोरोना साथीच्या संदर्भात  आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी जगत सिंग  गिरासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, उपसंचालक गौरी राठोड, डॉ. मनीष रेगे, पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे, अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद  मुख्याधिकारी दीपक पुजारी,  डॉ. प्रशांत रसाळ आदी यावेळी उपस्थित होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बदलापूर पालिकेत सर्व संबंधित अधिकारी, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून सर्व अडचणी समजून घेतल्या.

 

 बदलापूर अंबरनाथ मधील रुग्णांना  शहरातच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील  जेणे करून येथील रुग्णांना मुंबईवर अवलंबून रहावे लागणार नाही.  बदलापूर जवळील हर्णे आयुर्वेदिक कॉलेज जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेत असून तेथे पन्नास बेड्चे आय सी यु सुविधा असलेले रुग्णालय लवकर सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी.  एम एम आर रिजन मध्ये कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची रोजची अपडेट जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून देण्याच्या सूचना  त्यांनी यावेळी दिल्या.  जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी  डॅशबोर्ड तयार करून त्यावर माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश टोपे यांनी  दिले. 

 

कोरोनाचे रुग्ण सापडल्यावर त्यासलंग्न असलेल्या रुग्णांची ट्रेसिंग करण्याबाबतही  पालिका प्रशासनास सुचना दिल्या. तसेच त्या अनुषंगाने कडक व तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.   अलगीकरण कक्ष वाढवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन  या परिसरातील महाविद्यालय, हॉटेल आदी सर्व आस्थापनांशी चर्चा करून त्या जागा ताब्यात घेण्यावर भर देण्यात यावा. रुग्णवाहिन्यांबाबत  राज्य शासनाने आदेश काढले आहेत त्याप्रमाणे खाजगी वाहने व रुग्णवाहिन्या ताब्यात घेऊन रुग्णांना विनामूल्य सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे ही टोपे यांनी सांगितले. ज्यादा दर लावणाऱ्या खाजगी हॉस्पिटल वर कारवाई करण्याचे  संकेत त्यांनी यावेळी दिले. 

 

         अंबरनाथ प्रमाणेच बदलापूर मध्येही खाजगी डॉक्टर रोज तीन तास आपली सेवा कोविड सेंटर साठी देणार असल्याची माहिती टोपे यांनी यावेळी दिली. अंबरनाथ येथील डॉ. बी जी छाया उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न  तातडीने मार्गी लावण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असेही  टोपे यांनी स्पष्ट केले. कोविड केअर " सेंटर मध्ये डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी  नवीन पदवी प्राप्त डॉक्टर तसेच बी एम एस  डॉक्टरांची सेवा घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या