संशयित कोविड मृत्यू.... शेऱ्याचा नेमका अर्थ काय
मुंबई
मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येने १ लाखांचा टप्पा पार केला आहे, तर महाराष्ट्रात हा आकडा ३ लाखांच्या पुढे गेला आहे. आकडे वाढत असले तरी कोरोना मृत्यूचा दर कमी असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. विरोधकांना मात्र रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे आकडे दोन्हीवर संशय आहे. मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेकडे असल्याने येथील परिस्थितीवर विरोधी पक्षाचे विशेष लक्ष आहे. मुंबईतील आकडे लपवले जात असल्याचा आरोप नेहमीच केला जात आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात सोमवारी ट्विट केले आहे. ‘संशयित कोविड मृत्यू; या शे-याचा नेमका अर्थ काय आहे, याचा योग्य तो खुलासा मुंबई महापालिकेने करायला हवा,’ अशी मागणी त्यांनी ट्वीटद्वारे केली आहे.
‘कोरोनाच्या मृत्यूचे आकडे लपवण्याचा हा हुकूमी मार्ग दिसतो आहे. ‘संशयित कोविड’ असे लिहून अनेक मृत्यू आतापर्यंत लपवण्यात आले आहेत. हे सगळे करून मुंबईतील मृत्यूचा दर घटल्याचे श्रेय महापालिका मोठ्या हुशारीने घेत आहे. मुंबई महापालिका म्हणजे पुरती ‘गोलमाल गँग’ आहे, असा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे.‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत मात्र भारतातील महानगरांपैकी केवळ मुंबई शहरातील कोरोनाचे खरे आकडे सांगितले जात असल्याचे म्हटले आहे. आमदार नितेश राणे यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या या वृत्तालाही आक्षेप घेतला होता. या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना ही माहिती कुठून मिळाली की कार्यालयात बसूनच त्यांनी टेबल न्यूज केली, असा प्रश्न नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर सोमवारी नव्या मुद्यावरून त्यांनी महापालिकेला लक्ष्य केले आहे.
0 टिप्पण्या