एकलव्य विद्यार्थ्यांनी मिळवले एस.एस.सी.त स्पृहणीय यश
ठाणे
एस एस सी चा निकाल आला आहे. हाती आलेल्या निकाल माहितीनुसार एकलव्य विद्यार्थ्यांच्या शाळांचे निकाल अतिशय चांगले लागले आहेत. कळवा रात्र शाळेचा ८६.६%, कळवा ठा.म.पा. शाळेचा ९१% आणि मानपाडा ठा.म.पा. शाळेचा ७२% निकाल लागला आहे. काही विद्यार्थ्यांनी या परीक्षेत स्पृहणीय यश मिळवले आहे.
राहुल हनुमंत माने ठामपा कळवा शाळेत पहिला आला. आई रस्त्यावर माकडाचा खेळ करते. वडील सोडुन गेलेत गावाला
करोना काळात राहुल ने construction वर काम केली. श्रुती रमेश केदारे या मानपाड्याच्या शाळेतील विद्यार्थिनीला ८४.८ % गुण मिळाले आहेत. तिला आई वडील नाहीत, आत्याकडे राहते, अत्यंत गरीब परिस्थिति. श्रुती राजू बावस्कर या मानपाड्याच्या शाळेतील विद्यार्थिनीने ८३.४ % मार्क मिळवले आहेत. तिची आई घरकाम करते, वडील वॉचमनचे काम, हलाखीची परिस्थिति, कोविड काळात सगळ्यांची कामे बंद होती. जीवन राठोड या मानपाड्याच्या विद्यार्थ्याला ७९% मिळाले आहेत. त्याचे वडील पेंटर, आई घरकाम, कोविड काळात सर्व काम बंद झाल्यामुळे आणखीनच वाईट परिस्थिती. कळवा रात्र शाळेच्या सायली विजय दळवी हिला ६६.६% मिळाले आहेत. दिवसभर कालहेर येथील गारमेंट कंपनीत काम करून संध्याकाळी शाळेत शिकत होती.
कळवा रात्र शाळेच्या दीपक थोरात याने दिवसभर केमिकल कंपनीत काम करून, संध्याकाळी शाळा करत ४२% मार्क मिळवले आहेत. आई वडील नसल्याने मामा कडे राहून तो शिकतो आहे. निशा राजा गुंजाळ ही कळवा रात्र शाळेतील विद्यार्थिनी वडील नसल्यामुळे आई बरोबर दिवसभर घरकामे करून संध्याकाळी शाळेत शिकत असे. तिला ३७.४ % मिळाले आहेत. पूजा रमेश सोनवणे, या कळवा ठा म पा शाळेतील हिला आई वडील नाहीत, आजी आजोबांकडे रहाते, आजोबा वॉचमनचे काम करतात. घरातील सर्व काम करुन तिला ६४% मिळाले आहेत. अंजली पासवान या कळवा ठा म पा शाळेतल्या विद्यार्थिनीने ४६% मार्क्स मिळवले आहेत. तिची आई घरकाम करते आणि वडील पेस्ट कंट्रोलचे काम करतात.
गेली २८ वर्षे समता विचार प्रसार संस्थेच्या वतीने, घरातील प्रतिकूल आर्थिक - सामाजिक परिस्थितीशी दोन हात करत केवळ जिद्द, चिकाटी व मेहनत यांच्या जोरावर दहावी एस एस सी परीक्षेत यश मिळवणा-या आधुनिक एकलव्यांना, एकलव्य गौरव पुरस्कार देण्यात येतो. प्रामुख्याने महापालिकेच्या माध्यमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी यात असतात. घरात कुणी शिकलेलं नाही. आई - वडील मोल मजुरी करणारे. विद्यार्थ्याला दहावीच्या वर्षीही क्लास, गाईड, पुस्तकं यांची नीट सोय नाही, अशी ही मुली - मुलं.
गेल्या दोन वर्षांपासून संस्थेच्या एकलव्य सक्षमीकरण योजने अंतर्गत महापालिका माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना नववीत असतांनाच शाळेमार्फत संपर्क करण्यात येतो. त्या मुलांचे दर शनिवारी व रविवारी सर्व विषयांवर तज्ञ शिक्षकाचे मार्गदर्शन वर्ग घेण्यात येतात. यंदा कळवा येथील ठाणे महापालिका माध्यमिक शाळा क्र. २, रात्रशाळा क्र. ४९ व मानपाडा येथील शाळा क्र. ७ येथे हे वर्ग आयोजित केले होते. या मुलांसाठी व्यक्तीमत्व विकासासाठी आय पी एच संस्थेतर्फे व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रम, ईद दिपावली संमेलन, हिरजी गोहिल क्रिडा महोत्सव, वृक्षारोपण, अभ्यास सहली आयोजित केल्या गेल्या.
या मुलांसाठी जानेवारी महिन्यात, पास कसे व्हावे हे शिबिर घेतले होते. कळवा व मानपाडा येथील शाळांप्रमाणे शाळा क्र. १८, कोपरी शाळा क्र. ३ येथेही ही शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात व वर्षभर शिकवण्यात लतिका सु. मो., मनिषा जोशी, हर्षलता कदम, उत्तम फलके, शैलेष मोहिले, सुप्रिया कर्णिक, चैताली कदम, सुमेधा अभ्यंकर आदी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. या मुलांना बेस्ट ऑफ लक देण्यासाठी, फेब्रुवारी महिन्यात कार्यकर्त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या घरी भेटी दिल्या. त्यांना परीक्षेकरता पेन भेट देण्यात आले.
0 टिप्पण्या