भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कट रचल्याचा दिल्ली विद्यापीठातील प्रोफेसर हनी बाबू यांच्यावर आरोप
नवी दिल्ली
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी दिल्ली विद्यापीठात इंग्रजी विषयाचे अध्यापक करणारे असोसिएट प्रोफेसर हनी बाबू मुसलियारविट्टील यांना NIA ने ताब्यात घेतले एल्गार परिषद आयोजित करून भीमा कोरेगांव इथे झालेल्या हिंसाचाराला खतपाणी घालणारी भाषणं केली, भीमा कोरेगांव प्रकरणी कट रचला तसेच नक्षलवादाचा प्रचार करून नक्षली कारवायांना हातभार लावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) त्यांची चौकशी करून नंतर अटक केली. देशात बंदी घातलेल्या CPI (माओवादी) या संघटनेचे ते पदाधिकारी असल्याची माहिती समजते. आता हनी बाबू यांना उद्या NIA च्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अधिक चौकशीसाठी त्यांना NIA कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात शनिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषद भरवण्यात आली होती. दलित अस्मितेचं प्रतिक असणाऱ्या भीमा कोरेगांव इथल्या लढ्याच्या स्मरणार्थ ही परिषद आयोजित करण्यात आली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी भीमा कोरेगाव इथे जातीय गटांत दंगल उसळली. एल्गार परिषदेमागे माओवाद्यांची संघटना असल्याचा संशय व्यक्त केला गेला आणि त्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या एल्गार परिषद प्रकरणी तेलुगू साहित्यिक वरवरा रावसुद्धा अटकेत आहेत. आता हनी बाबू यांना अटक करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या