लॉकडाऊन विरोधात सोमवारी गटई कामगारांचे धूर आंदोलन
*भिक मागून पालिका मुख्यालयासमोर चुलीवर अन्न शिजवणार
ठाणे
ठाणे जिल्ह्यात वारंवार लॉकडाऊन करण्यात येत असल्याने हातावर पोट असणार्यांची आता उपासमार होऊ लागली आहे. चप्पल आणि छत्री दुरुस्ती करुन पोट भरणार्या वर्गाचे गटई स्टॉल दोन तासांसाठी सुरु करण्याची मागणी करुनही प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त झालेल्या गटई चर्मकार समाज कामगार संघटनेने ‘धूर आंदोलनाचा’ इशारा दिला आहे. या संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
गटई कामगारांच्या स्टॉलवर कधीच गर्दी होत नसल्याने फिजीकल डिस्टन्सींगचेही पालन योग्य रितीने होऊ शकते. तरीदेखील गटई स्टॉल उघडण्यास मनाई करण्यात येत असल्याने या वर्गाची उपासमार होत आहे. त्यातच या स्टॉलचा कर, वीजबिल भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. ही सक्ती रद्द करुन वीजबिल आणि मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी करुन 19 जुलै 2020 पर्यंत या मागण्यांवर निर्णय न घेतल्यास 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शेकडो चर्मकार बांधव भिक मागून आणलेला शिधा ठामपा मुख्यालयासमोर चूल पेटवून शिजवतील तसेच याच ठिकाणी ठाण मांडून बसतील, असा इशारा गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या