शेतीची कामं करणारी नगरसेविका, नवी मुंबईतील कुतूहलाचा विषय
नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेतील कोपरखैरणे प्रभाग क्रमांक ४७ मधून सौ लता भालचंद्र मढवी या पाच वर्षापूर्वी नगरसेविका म्हणून बहुमताने निवडून आल्या.
सौ. लताताई यांची मुरबाड तालुक्यातील चिरड म्हसा येथे शेत जमीन असून येथील शेतजमिनीत त्या राब, पेरणी, आवनी, लावणी, बेननी, कापणी अशी शेतीची सर्व प्रकारची कामे त्या स्वतःच करतात. यात त्यांना कसल्याही प्रकारचा कमीपणा वाटत नाही. त्यांना शेजारणी, मैत्रिणी म्हणतात मॅडम, तुम्ही नगरसेविका आणि तुम्ही शेतीची कामे करता? तेव्हा त्या म्हणतात "अहो शेतकऱ्याच्या मुलीला शेतीची कामे करायला कसली आली लाज!" साधी राहणी आणि उच्च विचार अंगी बाणलेल्या सौ लताताई यांच्या विचारांचं हे सौंदर्य आज समाजात आदर्श निर्माण करतात. नवी मुंबई सारख्या शहरातील एक सुखवस्तू घरातील सुशिक्षित, सुसंस्कारित नगरसेविका चिरड म्हसा येथील आपल्या शेतात लावणीची कामे करताना आज सर्वांचंच लक्ष वेधून घेताना दिसते.
नगरसेवक म्हटला म्हणजे तो त्या विभागाचा एक सामान्य सेवेकरी असतो परंतु नगरसेवकाची ही व्याख्या आज पुरती कालबाह्य होताना दिसते. निवडणूक होई पर्यंतच नगरसेवक हा सेवेकरी असतो निवडून येताच तो त्या प्रभागाचा स्वतःला मालक समजू लागतो. रिक्षा चालविणारा किंवा भाजी विकणारा माणूसही नगरसेवक होतो आणि मग तो कोटीच्या कोटी उड्डाणे घेतो आणि त्याचं सारं आयुष्यच राजेशाही होऊन जातं. माणसाकडे सत्ता आली की तो वेगळ्या दुनियेत रममाण होतो. अहंकार मनाला शिवतो आणि मग तो हवेत उडू लागतो. परंतु नगरसेविका सौ. लताताई यांच्याकडे पाहिलं तर याचा कुठेही लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही की त्यांच्या दैनंदिन जीवनातील साध्या राहणीत जराही फरक पडलेला पहावयास मिळत नाही. एक सेवेकरी म्हणूनच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात त्या आपला संपूर्ण दिवस व्यतीत करतात. त्याच बरोबर आजही एक उत्तम गृहिणी म्हणून घरातील सर्व प्रकारची कामे त्या स्वतःच करतात.
0 टिप्पण्या