‘समता विचार प्रसारक संस्थेतर्फे जेष्ठ नाटककार रत्नाकर मतकरींना मानवंदना

‘समता विचार प्रसारक संस्थेतर्फे जेष्ठ नाटककार रत्नाकर मतकरींना मानवंदनाठाणे 


ठाण्यातील ‘समता विचार प्रसारक संस्थेतर्फे वंचितांच्या रंगमंचाचे प्रणेते दिवंगत जेष्ठ नाटककार, साहित्यिक रत्नाकर मतकरींना मानवंदना देण्यासाठी ‘मतकरी स्मृती माला’ कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमामध्ये मतकरींच्या विविध अंगी स्पर्श करणार्‍या कलागुणांवर प्रत्येक महिन्यात एक, असा वर्षभर चालणारा आदरांजली कार्यक्रम वंचितांचा रंगमंचावर सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ठाण्याचे महापौर मा. नरेश म्हस्के यांनी केले.


यावेळी म्हस्के म्हणाले, वंचितांचा रंगमंच ठाण्यातील वस्तीतील मुलांना चांगले संस्कार, चांगले विचार आणि त्यांच्या कलांना वाव देण्याचे स्तुत्य काम करीत आहे. मतकरींनी नाटक हे रंगमंचावरून वस्तीत आणण्याचे आणि वस्तीतील मुलांना रंगमंचावर नेण्याचे काम या चळवळीतून केले आहे. ही या चळवळीची उपयुक्तता व यश आहे. मतकरींच्या स्वप्नातील नाट्य - चित्र संस्था ठाण्यात उभी करून साऱ्या राज्याचे लक्ष आपण वेधून घेऊया, असे ते शेवटी म्हणाले.


समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ यांनी स्वागत केले आणि एकलव्याला कार्यकर्ता अनुजा लोहार हिने प्रास्ताविक केले. प्रकाश आंबेगावकर, सुनंदा परब, सौरभ करंदीकर, समीर परांजपे, मकरंद तोरसकर, विजू माने, प्रकेत ठाकुर, नीलिमा कढे, सुरेन्द्र दिघे असे अनेक चित्रकार, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर मतकरीना मानवंदना द्यायला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ‘नाट्यजल्लोष’ च्या संयोजक हर्षदा बोरकर यांनी केलं. आभार प्रदर्शन मीनल उत्तुरकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यास संस्थेच्या सचिव हर्षलता कदम, विश्वस्त जगदीश खैरालिया, अजय भोसले, सुनील दिवेकर, शैलेश मोहिले, दुर्गा माळी, दीपक वाडेकर आदी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून या कार्यक्रमाचा लाभ पाच हजाराहून अधिक रसिकांनी घेतल्याचे संजय निवंगुणे यांनी सांगितले. 


‘रत्नाकर मतकरींची नाटकं, कथालेखन, दिग्दर्शन चित्रकला आदी सर्वच कला क्षेत्रातील झेप फार उत्तुंग होती. त्यांनी संकल्पित केलेला वंचितांचा रंगमंच म्हणजे एक मोहिमच आहे, ज्यात लोक वस्तीतील मुलांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी त्यांचं स्वतःचं व्यासपीठ उपलब्ध केलं आणि या मुलांना त्यात मुक्तपणे विहरण्याची संधी दिली,’ असे सुप्रसिद्ध नाट्य – चित्रकर्मी मुक्ता बर्वे या कार्यक्रमात संगितले. त्या पुढे म्हणाल्या या मुलांना पुस्तकांबरोबर माणसं वाचायची संधी मिळते आहे, ही त्यांच्यासाठी फार मोलाची बाब आहे. 


या वेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व जन आंदोलनांच्या नेत्या मेधा पाटकर मतकरींच्या सामाजिक बांधिलकीबद्दल बोलताना म्हणाल्या, मतकरींनी त्यांना अवगत अशा कलेच्या सर्व माध्यमांचा उपयोग सामाजिक कार्यासाठी केला. त्यांनी नर्मदेच्या दर्‍या , खोर्‍यात आदिवासी वस्तीत राहून त्यांच्या खडतर जीवनाचा, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन, तो त्यांच्या तैलचित्रात अतिशय जिवंतपणे मांडला. त्यांची ही तैलचित्रे इतकी बोलकी आहेत की नर्मेदेच्या खोर्‍यात चालू असलेल्या आदिवासींच्या आंदोलनाची संपूर्ण वस्तुस्थिती नुसत्या चित्रातून व्यक्त होते. या बरोबरच त्यांनी या आंदोलनामागची भूमिका आणि आदिवासींची विषण्ण करणारी वास्तविकता आपल्या अभिवाचनातून अनेक शहरात, महाविद्यालयात जावून स्वतः मांडली. ही त्यांची समाजातील वंचितांबद्दलची संवेदनशीलता आणि साहित्यिक बांधिलकी यांच्या संयोगातून वंचितांच्या रंगमंचाच्या चळवळीची निर्मिती झाली आणि वंचित मुलांच्या मुक्त अभिव्यक्तीची वाट मोकळी झाली. ही चळवळ फक्त ठाण्यात सीमित न राहता अनेक शहरातील वस्त्यात तसेच खेड्यापाड्यात, आदिवासी वस्तीत पसरवण्याचे काम आता कार्यकर्त्यांनी हाती घेण्याची गरज आहे.

      मतकरी सरांनी त्यांच्या चित्रकलेतील नैपुण्याचा समाजातील वस्तुस्थिती दाखवण्यासाठी योग्य वापर केला. याच पासून प्रेरणा घेऊन ‘मतकरी स्मृती माला’ उपक्रमाच्या प्रथम पुष्पासाठी साठी ‘चित्रकला’ ही कला निवडली आणि वस्तीतील मुलांना भविष्यातील माझी वस्ती, निसर्ग व तंत्रज्ञान या पैकी विषयावर चित्रे काढून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत केले. मुलांनी भरभरून प्रतिसाद देऊन, या लॉकडाउनच्या काळातही मर्यादित साधने आणि बिकट आर्थिक परिस्थितीतही विविध लोकवस्तीतील वेग वेगळ्या वयोगटातील ७२ मुली - मुलांनी सहभाग घेतला. या चित्रांतून मुलांच्या विलक्षण कल्पनाशक्तीचा आणि त्यांच्या प्रभावी चित्राविष्काराचा प्रत्यय आला. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रकार सुप्रिया मतकरी विनोद आणि जगप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांनी सिद्धू वाघमारे, आयुषी घाणेकर, सई मोहिते, दीपेश दळवी, नयन दंडवते, प्रतिमा भगवाने आदी ११ विद्यार्थ्यांची वेधक आणि वैशिष्ठ्यपूर्ण चित्रे निवडून त्या मुलांशी कार्यक्रमात संवाद साधला.


विजयराज बोधनकर म्हणाले, या चित्रांतून मुलांचा डोळसपणा आणि त्यांच्या विचारांची व कल्पनांची व्याप्ती किती मोठी असते आणि त्यांची सर्जनशीलता आपल्या सर्व चौकटींना पार करून पुढे जाणारी असते हे समजते. त्यांच्या कल्पनांना मुक्तपणे बहरू दिलं तरच असामान्य कलाकृती निर्माण होवू शकते. प्रसिद्ध चित्रकार आणि रंगकर्मी सुप्रिया विनोद म्हणाल्या, माझ्या बाबांना परिस्थिती समोर हारणं माहीत नव्हतं, हाच गुण वंचितांच्या रंगमंचातील मुलांमध्ये रुजवण्यात हा उपक्रम यशस्वी झाला आहे हे आज या मुलांनी कठीण परिस्थितीतही दाखवलेल्या उत्साहाने सिद्ध झाले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्रकार आणि रायगड अॅक्टिविस्टाचे क्युरेटर राजू सुतार यांनी रत्नाकर मतकरी यांनी ‘नर्मदा बचाव आंदोलनावर’ काढलेली चित्रे दाखवून त्यातून सूचित होणार्‍या अर्थावर विवेचन केलं. ते म्हणाले, ’अॅक्टिविस्ट आणि आर्टिस्ट याचं सुरेख मिश्रण मतकरींच्या या चित्रात आहे. त्यांची चित्रे ही एका हेतूने काढलेली आहेत आणि तो हेतु या चित्रांतून स्पष्ट समजतो आहे. ही चित्रे म्हणजे त्यांनी या आंदोलनावर केलेले अतिशय प्रभावी भाष्य आहे. कोणताही कलाकार हा आधी माणूस आणि मग चित्रकार किंवा कलाकार असतो हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. झूम या ऑनलाइन व्यासपीठावर पार पाडलेल्या या कार्यक्रमाच्या तंत्रज्ञानाच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळणार्‍या प्रकेत ठाकुर यांनी काढलेली रत्नाकर मतकरी यांची अप्रतिम डिजिटल चित्रे या वेळी सर्वांची प्रशंसा मिळवून गेली.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad