गड्यांनो मुठी आवळण्याची वेळ आली आहे...
प्रज्ञासुर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर काही अज्ञान गुंडांनी मंगळवारी 7 जूलै रोजी सायंकाळी हल्ला केला. हे धक्कादायक , अत्यंत घृणास्पद आणि निषेधार्ह आहे. दादर हिंदू कॉलनी येथे राजगृह हे बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या कष्टातून उभारलेले निवासस्थान आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी इमारतीच्या आवारात शिरून मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि नासधूस केली. घराच्या काचांवर दगडफेक केली. सीसीटीव्ही कॅमेर्यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटत आहेत. या घटनेचा करावा तीतका निषेध थोडाच आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण भारतीय समजाचे श्रद्धास्थान आहे. राजगृहच्या वास्तूवर झालेला हल्ला हा आमच्या प्रज्ञास्थळावरचा हल्ला आहे.
आपला ग्रंथखजीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणार्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असे आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होतो आहे. बाबासाहेबांचे मुंबईतले निवासस्थान म्हणजे दादरच्या हिंदू कॉलनीतले राजगृह. मला या वास्तूची ओळख 1986 नंतर झाली. त्याचा थोडाफार इतिहास मी वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेजचे तत्कालीन प्रिन्सीपल पी. एम. गायकवाडसर यांच्या तोंडून ऐकला होता. बाबासाहेबांनी सिद्धार्थ विहार वसतिगृहाचे बांधकाम होईपर्यंत विध्यार्थ्यांना राजगृहात रहायला जागा दिली होती, असे त्यांनी सांगितले होते, त्यानंतर जेव्हा भारिप बहुजन महासंघाचा निवडणूक प्रचार करण्याच्या धांदलीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मोटारीचा विदर्भात अपघात झाला तेव्हा त्यांना मी भेटायला राजगृहात गेलो होतो तेव्हा खर्या अर्थाने प्रत्यक्ष राजगृहाचे आतून दर्शन मला घडले होते. तेव्हा मी आज दिनांक या वर्तमानपत्रात रिपोर्टर होतो, बाळासाहेबांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. ते पाहून मला खूपच दुःख झाले होते. ती वास्तू म्हणजे आंबेडकरांना मानणार्या अनूयायांचे शक्तीस्थळच.
बाबासाहेबांनी मुंबईमध्ये स्थायिक व्हायचे ठरवल्यानंतर दादरमधली ही वास्तू बांधून घेतली होती. बाबासाहेबांकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता आणि त्यांनी या पुस्तकांसाठी हे घर खास बांधून घेतले होते. त्याठिकाणी ते सहकुटुंब रहायला आले. त्यांनी आपली लायब्ररी परेलच्या दामोदर हॉलमधून हलवून राजगृहात आणली. राजगृहाच्या तळमजल्यावर बाबासाहेबांचं वास्तव्य होतं. आज राजगृहाच्या तळमजल्यावरच्या दोन खोल्यांमध्ये वस्तुसंग्रहालय आहे. डॉ. आंबेडकरांनी आणि रमाबाईंनी वापरलेल्या विविध वस्तू इथे ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांच्या वापरातले फर्निचर, पितळेची भांडी, बाथटब या गोष्टी आहेत. या सगळ्यासोबतच बाबासाहेब ज्या खोलीत बसून काम करत तिथे त्यांचे टेबल, त्यांच्या संग्रहातली काही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. राजगृहातल्या याच संग्रहालयात बाबासाहेबांचा अस्थिकलशही आहे. दादरच्या हिंदू कॉलनीतल्या याच राजगृहावर बाबासाहेबांचे पार्थिव आणण्यात आले होते. ज्या राजगृहाच्या पोर्चमध्ये बाबासाहेबांची गाडी दिमाखात शिरायची, तिथेच त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आणि नंतर इथूनच 7 डिसेंबरच्या दुपारी बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी ते चैत्यभूमिवर नेण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लायब्ररीचे वेगवेगळे खास विभाग केले होते. अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, धर्म, कायदा, संरक्षण, राज्यशास्त्र, चरित्रे व आत्मचरित्रे, परदेश नीती, बालशास्त्र, भूगोल, तत्वज्ञान, युद्ध, राज्यघटना, चलन, मानववंशशास्त्र असे वेगवेगळे विभाग बनविण्यात आले होते. शिवाय विविध अहवाल, नियतकालिके, वृत्तपत्रे इत्यादि साठी स्वतंत्र व खास विभाग लायब्ररी मध्ये करण्यात आले होते. निरनिराळ्या एन्सायक्लोपीडीयांना तर त्यात दर्जेदार स्थान होते. शेल्फवर त्या त्या विषयांची नावे वळणदार अक्षरांनी लिहून चिकटवून ठेवण्यात आली होती. पहिल्या माळ्यावरील तीन ते चार ठिकाणी टेबल-खूर्च्यांची सोय करण्यात आलेली होती. प्रत्येक विषयाच्या शेल्फ मध्ये ज्या त्या ग्रंथात संबंधित ग्रंथाच्या लेखकाच्या नावाची दोन दोन कार्डे ठेवण्यात आली होती. अनेक टोकदार पेन्सिली आणि फाउंटन पेन्स टेबल स्टॅन्डवर असत. त्याचप्रमाणे विजेच्या दिव्याचे स्टॅन्डही असत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलेल्या पुस्तका मध्ये टिपणे काढून ठेवत. ही टिपणे वेगवेगळ्या प्रकारची असत, असे बाबासाहेबांबातच्या लिखाणात आढळून येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लायब्ररीस एखाद्या पॉवर हाऊसचे स्वरुप आणले होते. जगातील अस्सल ज्ञानभांडार त्यांनी राजगृहात मोठ्या काळजीने संग्रहित केले होते. जगात जेवढे लहान मोठे पुढारी किंवा राज्यकर्ते होऊन गेले त्या सर्वांची चरित्रे आणि आत्मचरित्रे त्यांनी राजगृहात ठेवली होती. पंडीत मदनमोहन मालवीय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लायब्ररी पाहिली. आणि ते आश्चर्य चकित झाले. त्यांनी ती लायब्ररी कित्येक लाख रुपयांना मागितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नकार देताना म्हणाले, तुम्ही तर माझी शक्तीच विकत मागत आहात, ती मी कशी देईन? इतका जीव त्यांचा पुस्तकांवर होता.
महाराष्ट्र सरकारने आता या ठिकाणी 24 तास पोलिस पाहारा ठेवण्याची घोषणा केली आहे. तर केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राजगृहावर जावून आनंदराज आंबेडकर यांची भेट घेतली आणि आपण राजगृहाच्या तसेच आंबेडकर कुटूंबियांच्या सोबत असल्याच्या भावणा व्यक्त केल्या आहेत. आता या प्रकरणाचा तपास होत राहील, गुन्हेगार पकडलाही जाईल त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. पण मुद्दा उरतो तो मानसिकतेचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या एका समाजापुरते मर्यादीत असे नाव नव्हते. त्यांनी समग्र स्त्री जातीच्या कल्याणासाठी आणि हज्जारो जाती उपजातींच्या कल्याणासाठी भारतीय राज्यघटनेत तरतूदी करून ठेवल्या. सर्व समाज घटकांना समान पातळीवर आणण्याचा विचार त्यांनी मांडला आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी अमुल्य कामगिरी केली. अनेक विषयांवर त्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. केंद्रातील मंत्री म्हणून त्यांनी विविधि क्षेत्रात मैलाचा दगड ठरावा अशी कामगिरी केली आहे. मग अशा महान राष्ट्रपुरूषाच्या वास्तूवर हल्ला करण्याची हिम्मत कोणत्या मानसिकतेतून होते. या पाठिमागे कोणाचा मेंदू आहे, हे शोधण्याची गरज आहे. त्याचा हेतू शोधण्याचीही गरज आहे. नेमके हे करण्यामागे त्यांचा डाव काय आहे, हे ओळखायला हवे. आपले राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी आंबेडकरी समाजाच्या आस्मितेला ठेच पोहचवण्याचे काम कोणितरी करत असावे, अशी शंका मनात येते. आंबेडकरी समाजाला चिथावण्यासाठी आजवर अनेक ठिकाणी पुतळ्याची विटंबणा करण्याचे प्रकार घडले. घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीतील आंबेडर पुतळ्याची विटंबना प्रकरण महाराष्ट्राच्या राजकिय इतिहासाला कलाटणी देणारे ठरले होते. हे आपणा सर्वांना ज्ञात आहे.
महाराष्ट्रात आंबेडकरी समाज हा अत्यंत संवेदनशील आणि जागरूक मानला जातो. त्यामुळे त्या समाजाच्या भावणा दुखावण्याचा त्याला चिथावण्याचा प्रकार वारंवार घडला जातो. आजही महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात दलित अत्याचाराच्या घटना सर्रासपणे सुरू आहेत. कधि प्रेमप्रकरणातून तर कधि जमिनीच्या अतिक्रमणातून हत्याकांड घडवले जाते. ही मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. निषेध किती दिवस करत राहायचे आणि न्यायाची भीक किती दिवस मागत राहायची असा विचार मग संतापलेल्या आंबेडकरी तरूणांच्या डोक्यात येत राहतो. अशाच अत्याचारांचा कळस झाला म्हणून बुध्दीमान आंबेडकरी तरूणांनी एकत्र येवून 1972 ते 1989 हा काळ गाजवला. महाराष्ट्रात दलित पँथरने इतिहास निर्माण केला. मात्र प्रस्थापित राजकारण्यांच्या राक्षसाने ती चळवळ गिळंकृत केली. रस्त्यावरची लढाई हवी की नको? संसदीय राजकारणाने आपल्याला काय दिले? अन्याय अत्याचाराला थेट प्रत्युत्तर देणारा फोर्स उभा करणे म्हणजे शासनयंत्रणेच्या विरोधात बंडखोरी करणे, अशा चर्चा आता व्हायला लागल्या आहेत. लेखण्याही बोथट व्हायला लागल्या आहेत. तळागाळातल्या समाजाच्या मुलांनी शिकावे, संघटीत व्हावे, संघर्ष करावा आणि राज्यकर्ती जमात व्हावे, असे बाबासाहेबांचे स्वप्न होते. परंतू संघर्ष करणार्या आणि चळवळीत उतरणार्या आंबेडकरी तरूणांवर आता सरकारने दहशत निर्माण केली आहे. त्यांना थेट नक्षलवादी ठरवून तूरूंगात डांबले जाते आणि वर्षानूवर्षे सडत ठेवले जाते. निर्दोश म्हणून निकाल लागण्यासाठी त्यांना सहा-सात वर्षे जेलमध्ये काढावी लागतात. नेहमीच घडणारे बलात्कार, हत्या, जळणार्या वस्त्या आता निमूटपणे पाहाव्या लागत आहेत. त्याची जंत्री देत राहलो तर जागा पुरणार नाही. अशा दहशतीला जोपर्यंत संघटीत शक्तींने छेद दिला जाणार नाही तोवर तरूणांच्या मनात नव्याने विश्वास निर्माण होणार नाही. सरकार कोणाचेही असो आंबेडकरी विचारांच्या बुध्दीजिवींनाही त्यांनी सोडलेले नाही. गेल्या 20-22 वर्षातील ही सर्वात चिंताजनक बाब म्हणावी लागेल.
आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला तर काय रौद्र रूप धारण करतो हे या महाराष्ट्राने पाहिले आहे. मग तो पँथर्सचा 1972 चा मोर्चा असो किंवा रिडल्स समर्थनार्थ मुंबईत निघालेला भव्य दिव्य मोर्चा असो. हज्जारो वर्षांपासून अत्याचार सहन करत आलेला समाज पोलिसांच्या लाठ्या अथवा बंदुकीच्या गोळीला आजिबात घाबरत नाही हा इतिहास आहे. परंतू आता लढाई कोणत्या मुद्यावर आणि कोणाच्या विरोधात आणि कोणाच्या नेतृत्वाखाली हा वाद न करता पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करण्याची आणि संघटीत होण्याची गरज आहे. जीथे बाबासाहेबांच्या नावाचा आणि विचारांचा प्रश्न येतो तीथे पक्ष, गट, तट या झुली बाजूला सारून एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. मनूवादी विचारांच्या बुरसटलेल्या प्रवृत्ती जागीच ठेचल्या नाहीत तर भविष्यात पुन्हा अंधाराकडे जाण्याची वेळ येईल, त्यामुळे गड्यांनो पुन्हा मुठी आवळण्याची वेळ आली आहे...
---------------------
राजा आदाटे
पत्रकार
0 टिप्पण्या