पालघर :
३ दिवसापूर्वी वसई विरार महानगरपालिका येथे पत्रकार परिषद सुरू असताना मला हिंदी समजत नाही मी महाराष्ट्राचा आहे मराठीच बोलेल हे हिंदी पत्रकारांना ठणकावून सांगणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव प्रशासकीय अधिकारी आयुक्त गंगाधरण डी. यांचे मराठी एकीकरण समिती संघटनेतर्फे २१ जुलै रोजी आभार मानून सन्मान करण्यात आला, आणि मराठीच्या या भूमिकेला पाठींबा दिला. याप्रसंगी संघटनेचे वसई विरार स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य हे मराठी भाषिक राज्य आहे राज्यात फक्त मराठीच बोलावे असा नियम आहे परंतु अनेक अधिकारी हे १००% नियम पाळताना दिसत नाहीत, सर्रासपणे हिंदी देखील बोलत असतात आणि राज्य द्विभाषिक आहे की काय असे नागरिकांना हल्ली वाटू लागले आहे, यातच काही दिवसापूर्वी राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना हिंदी बोलण्यास नकार दिला होता आणि आता त्यांच्या नंतर हिंदीत बोलण्यास नकार देणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून गंगाधरण डी. हे प्रथम अधिकारी म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्राच्या लक्षात राहील.
इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी देखील फक्त मराठीत बोलावे, हिंदी बोलण्याची जबरदस्ती करणाऱ्या हिंदी पत्रकाराच्या लॉबीला अजिबात घाबरू नये, मराठीवर ठाम राहावे. आजची भेट आणि प्रोत्साहन हे फक्त मराठीसाठी होते आयुक्तांच्या इतर कोणत्याही कारभाराचे समर्थन संघटना करत नाही असे संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले.
हिंदी लॉबीने राज्यात अधिकाऱ्यांना मराठी बोलण्यापासून थांबवणे आणि हिंदीची जबरदस्ती करणे हा गुन्हा आहे आणि मराठीचा अपमान आहे, आयुक्त हिंदीत न बोलता मराठीत बोलल्यामुळे अनेक हिंदी संघटना, पत्रकार काही हिंदीधार्जिन पक्ष यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे खोट्या तक्रारी केल्या असून या सर्व हिंदी पत्रकाराविरोधात एकीकरण समितीने मुख्यमंत्री व मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे असे कार्याध्यक्ष प्रदीप सामंत यांनी सांगितले.
0 टिप्पण्या