Top Post Ad

इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे काय 

इतिहासाची पुनरावृत्ति होत आहे काय 
हिटलर हा जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व जर्मनीचा हुकूमशहा होता . त्याचा जन्म ब्राउनाऊ ॲम इन येथे( बव्हेरिया आणि ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर) एलोइस व क्लारा पोलझल या दांपत्यापोटी झाला. हिटलर हा नाझी पक्षाचा प्रमुख नेता कसा झाला आणि जर्मनीचा सर्वे सर्वा कसा  झाला हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे परंतु या ठिकाणी हिटलर नाझी पक्षाचा प्रमुख झाल्यावर जर्मनीत काही काळ ज्या अभूतपूर्ण घटना घडल्या त्या विषयी हा लेख आहे .
 
या लेखातील घटना आणि सध्या जगभर आणि भारतात होत असलेल्या घटनांचा संबंध वाचकांनी स्वतः पडताळून पहावा ..!!


हिटलर हा एक महत्त्वाकांक्षी तसेच मुत्सद्दी नेता होता. 'एक राष्ट्र, एक आवाज, एक नेता, एक ध्वज' हे त्याचे घोषवाक्य होते.१९३३ मधे जर्मनी मधे हिटलर सत्तेवर आल्यावर जर्मनीतील लोकांची एक आशा पल्लवित झाली आणि जर्मनीतील लोकांना खरोखरच वाटले की आता जर्मनीत ‘अच्छे दिन आने वाले हैं ’ जर्मनीतील लोकांच्या मनांत एक ग्रह पक्का करून देण्यात आला की या देशातील ज्यू लोकांच्या मुळे  या देशाची पीछेहाट होत आहे . आणि  ‘राष्ट्र निर्माण’ करण्यासाठी ज्यू लोकांची फार मोठी अडचण आहे. हिटलर रेडियो वरुन  नेहमी जर्मन लोकांशी "मनकी बात" करत होता आणि त्यांनी लोकांची मने जिंकली होती . राष्ट्रीयत्वाची भावना लोकांच्या मनात ठासून भरण्यात हिटलर यशस्वी झाला होता . प्रत्येक जर्मन माणसाला देशासाठी जीव देण्यासाठी तयार करण्यात आले आणि त्याचे बोध वाक्य होते ‘नेशन फर्स्ट ‘म्हणजेच ‘राष्ट्र प्रथम’. त्यांनी जर्मन महिलांना सुद्धा आवाहन करून सांगितले की अधिक मुलांना जन्म द्या म्हणजे आपली संख्या वाढेल आणि राष्ट्राला नव्या रक्ताच्या तरुणाचे पाठबळ मिळेल. पण त्या वेळेला सुद्धा असे काही विचारवंत होते की त्यांना हिटलरची ही कल्पना आवडली नव्हती आणि त्यांनी लेख लिहून आणि परिसंवादातून हिटलरला विरोध करण्यास सुरवात केली .परंतु हिटलरचे भक्त मात्र जर्मनीत हिटलरनी आणलेल्या विकासाच्या गंगेच्या गोष्टी सांगून या विचारवंतांना चूप बसवत असत . ज्यू लोकांना मारण्याच्या आधी हिटलरला एक महत्वाचे काम करायचे होते आणि ते म्हणजे जर्मनीचा विकास घडून आणायचा .म्हणजे मेक इन जर्मनी आणि ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात होत सुद्धा होती .


पहिले  महायुद्ध झाल्यावर जर्मनीचा जो पराभव झाला होता तो लपवण्यासाठी एक बळीचा बकरा पाहिजे होता आणि जर्मनीत असा सूर येवू लागला की आपल्या देशाच्या पराभवासाठी जर कोणी कारणीभूत असतील तर ते ज्यू लोक आहेत. ज्यू लोकांच्या विषयी एक अत्यंत विरोधाचे जनमत तयार होवू लागले .लवकरच पूर्ण जर्मनीत अशी हवा पसरवण्यात आली की ज्यू लोकांनी जर्मनीला पहिल्या महायुद्धात धोका दिला होता .या पूर्ण घटनेत  पाठीत खंजीर खुपसणारी जमात म्हणून ज्यूंकडे बघितले जावू लागले . सत्तेवर आल्यावर हिटलरनी १ एप्रिल १९३३ या दिवशी फतवा काढून ज्यू लोकांना बायकॉट करावे असे लोकांना आवाहन केले . लोकांनी विचार केला ज्याअर्थी हिटलर सांगतोय म्हणजे यात नक्कीच काहीतरी तथ्य असले पाहिजे . तो पर्यंत राष्ट्रवादाची आग जर्मनीच्या लोकांमध्ये चांगलीच लागली होती. हिटलर जे जे सांगत आहे ते ते आपल्या भल्यासाठीच आहे हे  जनमत तयार झाले होते. अधिकाधिक संख्येने भक्तगण तयार झाला होता.


त्यामुळे हिटलरचा प्रत्येक शब्द जर्मन जनता “आदेश” मानत होती . त्यामुळे सर्व ज्यू लोकांच्या दुकानावर आणि इतर व्यवसायावर लोकांनी बायकॉट करायला सुरवात केली. हा द्वेष या थरापर्यन्त पोहोचला की ज्यू न्हावी ,ज्यू धोबी इतकेच काय तर ज्यू डॉक्टर यांच्यावर लोकांनी बहिष्कार टाकला . ज्यू लोक म्हणजे या देशाला लागलेली कीड आहे इथपर्यंत घृणा पसरवण्यात हिटलर यशस्वी झाला. त्यामुळे जागोजागी ज्यू लोकांची दुकाने बंद करण्यात आली ,दुकानांच्या काचा फोडण्यात आल्या ,दुकाने जाळण्यात आली आणि सर्वत्र फार मोठा हिंसाचार देशभर पसरला . लवकरच असा कायदा संमत केला गेला की कुठल्याही ज्यू माणसाला सरकारी महत्वाची पोस्ट देण्यात येवू नये .जर्मनी मधे ज्यू लोकांच्या बद्दल एक अविश्वासाचे वातावरण तयार करण्यात हिटलरची नाझी संघटना फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली .


नाझी संघटना म्हणजे कट्टर राष्ट्रवाद ,नाझी संघटना म्हणजे जर्मनीचे भाग्यविधाते हीच भाषा सर्वत्र पसरू लागली . जर्मनीतले सर्व पत्रकार हिटलरच्या दावणीला बांधलेले होते . त्या काळची सर्व वृत्तपत्रे ,मासिके यांचे मथळे हिटलरच्या कौतुकाने नटलेले असायचे . जी वृत्तपत्रे हिटलरला पाठिंबा न देता टीका करायची ती  विकत घेतली गेली आणि त्यांच्या संपादकपदी नाझी पक्षाचे लोक बसवण्यात आले. जी वृत्तपत्रे विकली जात नव्हती त्यांच्या मालक आणि संपादकांना जेलमधे टाकण्यात आले आणि त्यांच्यावर देशद्रोहाचे घटले भरण्यात आले .


१९३६ मधे जर्मनीत अंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे,समर ऑलिंपिक आयोजन हिटलरने केले होते . जगभरातील पत्रकार   क्रीडा प्रेमी आणि क्रीडापटू यात सामील होणार होते .रातोरात ज्यू विरोधी पोस्टर्स शहरातून हटवण्यात आली. उलट ज्यू अभिनेते आणि खेळाडूंची  मोठी छायाचित्र शहरात लावण्यात आली आणि ज्यू लोकांच्या वर केलेल्या अत्याचाराची कुणकुण जगाला लागू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली . स्पर्धा आटोपताच पुनः जैसे थे .


दरम्यानच्या काळात ज्यू शिक्षक शाळेतून हटवण्यात आले. शाळेतील अभ्यासक्रम बदलण्यात आला . ज्यूंच्या इतिहासात  मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला. ज्यूंच्याबद्दल जनमत विषारी तयार केल्यानंतर त्यांना देशात दुय्यम दर्जाचे नागरिकत्व देण्याचे कायदे केले गेले. “जर्मन ज्यू “ या शब्दा ऐवजी ज्यूज इन जर्मनी हा शब्द प्रयोग रूढ करण्यात आला . आता बाहेरील देशातील स्थलांतरित ज्यूंना जर्मनीचे नागरिकत्व देण्याचे पूर्ण बंद करण्यात आले. हा कायदा जर्मनीचे “आर्यन राष्ट्र” बनवण्यासाठी मोठे पाऊल होते. जर्मनीतील डिटेन्शन कॅम्प बद्दलच्या कहाण्या आता सर्व जगाला ज्ञात आहेत परंतु त्या काळात हे कॅम्प अत्यंत गुप्त ठेवण्यात आले.या कॅम्पला Concentration Camp म्हंटले जाऊ लागले . प्रथम नाझी विरोधकांना ,नंतर गुन्हेगारांना आणि नंतर ज्यूंना या कॅम्प मधे ठेवायला सुरवात केली. जे धट्टेकट्टे  सशक्त होते त्यांना १५ -१५ तास राबवून घेण्यात येत होते. जे अशक्त किंवा म्हातारे होते त्यांना मारून टाकण्यात आले .


हिटलर मिडियाच्या शक्तीला अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखत होता .खास करून रेडियो आणि वृत्त पत्रात फक्त नाझी विचारांचाच पुरस्कार होईल यासाठी  अत्यंत कडक धोरण राबवले जात होते . हिटलरची हुशारी ,त्याच्या शूरपणाच्या कहाण्या या रात्रंदिवस लोकांना ऐकवल्या जात होत्या . हिटलरची इमेज तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कसर सोडली जात नव्हती .सर्व शाळा आणि कॉलेजातून हिटलर आणि आर्यन वंश अत्यंत महान आहेत हेच मुलांच्या पचनी पडले पाहिजे ही कटाक्षाने पाहिले जात होते. हिटलरच्या जीवनावर चित्रपट तयार करण्यासाठी नाझी पक्षातर्फे विशेष तरतूत करण्यात आली .हिटलरची स्वतःची एक चित्रपट निर्माती होती तिचे नाव होते Leni Riefenstahi .ती  हिटलरवर चित्रपट तयार करीत असे . ते चित्रपट खूप लोकप्रिय झाले होते . जनतेमधे हिटलर लोकप्रिय करण्यामधे तिचा मोठा हात होता . त्या चित्रपटामध्ये हिटलर मुलांचा खूप लाडका आहे असे दाखवले जात असे . ज्या जर्मन महिलांनी ज्यूं च्या बरोबर लग्न केले होते त्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले त्यांचे नवरे हिटलरच्या जेलमधे गेले होते परंतु त्या जर्मन महिलांनी मात्र कमाल केली त्यांनी बर्लिनच्या रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडले .१६ दिवसाच्या आंदोलना समोर  सरकारला माघार घ्यावी लागली . हिटलरला त्या ज्यूंना सोडून द्यावे  लागले.


१३ जानेवारी १९३५ च्या सार्वमताने सार प्रांत जर्मनीच्या ताब्यात आला. १६ मार्च १९३५ रोजी हिटलरने व्हर्सायच्या तहातील युद्ध-सामग्रीबंदीची कलमे झुगारल्याची घोषणा केली. ह्या सुमारास इंग्लंडशी नाविक करार केला. जपान व इटलीशी तह करून जर्मनीचे परराष्ट्रीय वजन वाढविले. १९३८ मध्ये त्याने संरक्षणखाते स्वतःकडे घेतले आणि तो खऱ्या अर्थाने जर्मनीचा हुकूमशहा झाला. इ. स. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर त्याने सर्वाधिकार आपल्याच हाती ठेवले. युद्धनीतीतही कुशल तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्याचा स्वतःच्या बुद्धि-सामर्थ्यावर फार विश्वास असल्याने लष्करी अधिकारी दुरावले. तो स्वतः संशयी व कपटी असल्याने त्याला सर्वत्र कपटाचा संशय येई. त्याचे ज्यूंविषयींचे धोरण व्यक्तिगत वैफल्यभावनेतून निर्माण झाले होते. हिटलर-कालीन हत्याकांडामध्ये सुमारे साठ लाख ज्यूंचा बळी गेला. त्याच्या आत्यंतिक राष्ट्रवादाला आंतरराष्ट्रीय दृष्टी येऊ शकली नाही. विरोध त्यास सहन होत नसे. जगापासून संरक्षण करण्यासाठी त्याने अहंकाराचे कवच निर्माण केले. त्यातूनच त्याच्या वंशशुद्धीच्या सिद्धांताचा उगम झाला. 
 
दुसऱ्या महायुद्धास हिटलर कारणीभूत होता हे निःसंशय. परंतु त्याची युद्धातील कर्तबगारी विलक्षण होती. त्याने मोठी प्रगती घडवून जर्मनीला समर्थ बनवले परंतु महायुद्धापायी या साऱ्यावर पाणी पडले. महायुद्धातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात येताच तो बर्लिनला परत आला. बर्लिन शहर रशियनांच्या ताब्यात जात असताना त्याने आपली नवपरिणीत पत्नी इव्हा ब्राऊनसह आत्महत्या केली. एका दुराग्रही हेकेखोर ,आत्मकेंद्री हुकूमशाहाचा अंत झाला . जगाच्या इतिहासात हिटलर क्रूर कपटी म्हणूनच कुप्रसिद्ध आहे .


चिंतामणी कारखानीस 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com